
तुम्ही हे पत्र वाचत असाल तेव्हा मी फ्लोरिडातील माझ्या इस्टेटवर मस्त उन्हे खात पडलेला असेन. आपली भेट होऊ शकली नाही.
व्हाइट हाउस,
पेनसिल्वेनिया, वॉशिंग्टन डीसी.
फ्रॉम द ऑनरेबल प्रेसिडेण्ट्स डेस्क-
डिअर जो, हे पत्र तुमच्या टेबलावरच ठेवलेले आहे. टेबलावरचा पेपरवेट उचलावा, मिळेल!! मावळत्या अध्यक्षाने उगवत्या अध्यक्षासाठी असे एक गोपनीय पत्र लिहून ठेवण्याची आपली अध्यक्षीय प्रथा असल्याचे मला सांगण्यात आले. त्याप्रमाणे मी तसे पत्र लिहून ठेवले, पण ते तुम्हाला मिळणार कसे? बरेच डोके खाजवून शेवटी आणखी एक पत्र लिहून ते अध्यक्षीय सैपाकघरातील अध्यक्षीय फ्रिजमध्ये अध्यक्षीय अंड्यांपाशी ठेवलेले आहे. अध्यक्षीय आमलेट करण्याच्या हेतूने तुम्ही अंडी उचललीत की आधी मी लिहिलेले पत्र मिळेल! त्यात डेस्कावरील पत्राबाबत क्लू दिला आहे. आहे की नाही मी हुशार? लोक उगीच मला नावे ठेवतात. असो.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
तुम्ही हे पत्र वाचत असाल तेव्हा मी फ्लोरिडातील माझ्या इस्टेटवर मस्त उन्हे खात पडलेला असेन. आपली भेट होऊ शकली नाही. मी सकाळीच सामान भरले आणि फ्लोरिडाला आलो. तुमच्या शपथविधी कार्यक्रमाला मी उपस्थित राहिलो नाही, कारण मला शपथ घेता येणार नाही, असे मला सांगण्यात आले. मी म्हटले, ‘कमॉन, मी शपथ घ्यायची नसेल तर जायचेच कशाला?’ माझ्या टर्ममध्ये मी भरपूर चांगले काम करुन ठेवले असल्याने तुम्हाला फार अडचण पडणार नाही. मी अध्यक्ष झालो तेव्हा ओव्हल ऑफिसचा फोन सारखा वाजत राहायचा. मी ती कटकट बंद करुन टाकली. आता कुणीही फारसा त्रास देत नाही. व्हाइट हाऊसच्या दारावर उभे असलेले दारवान अत्यंत चापलूस आहेत, त्यांच्यापासून जपून राहावे. मी आलो, तेव्हा मला न चुकता सलाम करत होते. परवा व्हाइट हाऊस सोडताना लेकाच्यांनी चक्क दुर्लक्ष केले. मग मीदेखील दुर्लक्षच केले!! सरळ हेलिकॉप्टरमध्ये बसून ‘फ्लोरिडा की तरफ लेना’ असे सांगितले.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
जागतिक राजकारणातल्या एका व्यक्तीपासून तुम्ही सावध राहायला हवे. ते इंडियात राहतात, आणि माझे फ्रेंड आहेत. (नाव नंतर सांगीन!) गृहस्थ चांगले आहेत, पण मला एकदोनदा ‘डोलांडभाई’ म्हणाले, ते मला तितकेसे आवडले नाही. शिवाय ते भयंकर जोरात शेकहॅंड करतात. तुम्ही अध्यक्ष झाल्यामुळे तुम्हालाही ते भेटायला येतील, तेव्हा हात आखडता ठेवा- खांद्यापासून निखळेल!! त्यांनी मला इंडियात बोलावले होते, तुम्हालाही बोलावतील. तेव्हाही सावध रहा. इंडियामध्ये ताजमहाल नावाची एक जुनी प्रॉपर्टी त्यांनी मला दाखवली होती. वेल, मला काही ती फार इंप्रसिव वाटली नाही. इंडियात एक प्रकारचा खारट केक लोकप्रिय आहे. त्याला ढोकळा असे म्हणतात. तो लागतो टॉप, पण जरा जपूनच खा! तुमच्या वयात जास्त ढोकळा पोटाला बरा नाही!!
डिअर जो, व्हाइट हाऊसमध्ये राहाणे तितकेसे सोयीचे नाही, हे तुम्हाला लौकरच कळेल. मुळात येथे दूधवाला, पेपरवाला, सफाईवाला असे कोणीही फिरकत नाहीत. सगळीकडे प्रचंड शांतता असते. मला तर सुरवातीला आपण लायब्ररीत राहातोय, असेची फीलिंग येत होते. असो. उत्तरेकडील बाजूच्या शय्यागृहाचा वापर मुळीच करु नये. तिथे प्रचंड गळते!! आणखी काय लिहू? सर्व महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला मी दिल्याच आहेत. मी पुन्हा येईनच!!
कळावे. बाय बाय बायडेन. तुमचा कधीही नसलेला, ट्रम्पतात्या.
ता. क. : अध्यक्षीय फ्रिजमधील दूध व अंडी दोन्ही संपली आहेत. आणून ठेवण्यास सांगणे!
Edited By - Prashant Patil