ढिंग टांग : सेल्फ ३ : सफल जीवनाची त्रिसूत्री!

ब्रिटिश नंदी
Thursday, 25 February 2021

यशस्वी जीवनाचा गुरुमंत्र बसल्याजागी मिळणे अतिदुर्लभ असते. आम्हाला तो खुर्चीत बसल्या बसल्या मिळाला, हे आमचे अहोभाग्य. वास्तविक महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात कुणी आम्हास जीवनविषयक तत्त्वज्ञान ऐकवू लागले, तर आम्हाला इसाळ येतो.

यशस्वी जीवनाचा गुरुमंत्र बसल्याजागी मिळणे अतिदुर्लभ असते. आम्हाला तो खुर्चीत बसल्या बसल्या मिळाला, हे आमचे अहोभाग्य. वास्तविक महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात कुणी आम्हास जीवनविषयक तत्त्वज्ञान ऐकवू लागले, तर आम्हाला इसाळ येतो. डोळे लालंलाल होतात व मनात हिंस्त्र भाव जागे होतात. कां की या काळात कडकीचा अंमल सुरु झालेला असतो. उधार-पाधारासाठी सावज शोधण्याचा काळ तो हाच. खोटे कशाला बोला? चोरीचकारीचे विचारही मनात डोकावून जातात. मनाच्या अशा कातर अवस्थेत जीवनविषयक सल्लेबिल्ले ऐकणे सहनशक्तीच्या बाहेरचे असते. परंतु, अहो आश्‍चर्यम! या सर्व नकारात्मक विचारांपासून आम्ही मुक्त झालो आहो. ‘हर्षखेद ते मावळले, अश्रू पळाले, कंटकशल्ये बोथटली...’ अशी अवस्था झाली आहे. खिशात दमडी नसताना आम्हाला यशस्वी जीवनाचा गुरुमंत्र मिळाला, आम्ही धन्य धन्य झालो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अखिल विश्वाचे गुरु ब्रह्मांडनायक श्रीश्री नमोजी यांनी हुबेहूब स्वत: स्वप्नात येऊन आम्हाला दृष्टांत दिला, आणि कनवाळू आवाजात आमच्या कानात आत्मसिद्ध गुरुमंत्र उच्चारला. : ‘‘सांभळ्यो वत्स... सेल्फ अवेअरनेस, सेल्फ कोन्फिडन्स अने सेल्फलेसनेस! आ त्रण शब्द ध्यान मा राखजो! एने सोसल मीडिया मां व्हायरल करजो! कल्याणमस्तु!’’... 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एटले बोलून मा. नमोजी अंतर्धान पावले. कां की आम्हालाच दचकून जाग आली! वाचकहो, तोच मंत्र आम्ही तुमच्याकडे फार्वर्ड करणार आहो! यापुढील तुमचेही आयुष्य हे कमालीचे आनंदी, सुखी, समाधानी आणि यशस्वी होवो, ही सदिच्छा आहे.
काय आहे हा गुरु मंत्र? सेल्फअवेअरनेस, सेल्फ कॉन्फिडन्स आणि सेल्फलेसनेस!! अर्थात... 

आत्मभान, आत्मविश्वास आणि आत्मनिरपेक्षता!
गुरुमंत्रातील हे तीन शब्द फार्फार महत्त्वाचे आहेत. प्रत्येक शब्दात जादू आहे, जादू! काही अज्ञ लोकांना या शब्दांचे इंग्रजी वा मराठी अर्थ कळणार नाहीत. त्यांच्यासाठी थोडे तपशीलात सांगणे भाग आहे.
१. आत्मभान : हे मिळवणे थोडे कठीण आहे. दिवसातून आठ-दहा वेळा मोबाइल फोनचा क्‍यामेरा सर्सावून सेल्फी घेत राहावे. आधार कार्डावरील आपल्या फोटोशी ताडून पाहावे. मग डिलीट करावे! आपण डिलीट केले नाही, तर कुणीतरी ते करीलच! येणेकरुन आत्मभान लौकर येईल.
२.आत्मविश्वास : हा प्रत्येकात थोड्याफार प्रमाणात असतोच. खिश्‍यात दमडी नसताना, आणि घरी फाके पडत असतानाही कोटी कोटींचे आकडे फेकत भविष्याच्या गप्पा माराव्यात. सेल्फीमुळे आत्मभान ऑलरेडी आलेले असतेच. त्याच्या जोरावर आपला आत्मविश्वास वाढीला लागतो.
३.आत्मनिरपेक्षता : इथे थोडा घोळ आहे. आत्मभान आले की तिथे आत्मनिरपेक्षता टिकाव कशी धरणार? असा प्रश्न कुणाला पडेल. सेल्फ अवेअरनेस आला की सेल्फलेसनेस दुर्बळ होतो. पण आत्मविश्वासाच्या जोरावर हे साधता येते! सेल्फी घेण्याचा उपक्रम चालू ठेवावा. त्याने आत्मनिरपेक्षता आपोआप येते.

...उपरोक्त त्रिगुण आत्मसात केले की मग कडकी, नोकरी, पीकपाणी, भूक असले भंपक प्रश्न सतावत नाहीत. माणसाची आत्मानंदी टाळी लागते. यशस्वी जीवनासाठी आणखी काय हवे असते?
या तिन्ही गुणांचा समुच्चय जयाचे ठायी जाहला, त्याला देवत्त्व प्राप्त होते, तर या त्रिगुणांपासून भरकटलेल्या तमोगुणी जनांची रवानगी नरकात होते, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आम्ही फार्वर्डलेला उपरोक्त मजकूर एका व्यक्तीने दहा जणांना फार्वर्डला. त्याला त्याच दिवशी भर रस्त्यात पैशाने भरलेले पाकिट सांपडले! एकाने डिलीट केला, त्याला ईडीची नोटिस आली!!
कल्याणमस्तु!

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Editorial Article Dhing Tang