ढिंग टांग : राया, तुम्ही या ना पुन्हा पुन्हा!

Dhing-Tang
Dhing-Tang

चार चांदाचे मानकरी सरदार मा. नानासाहेब ऊर्फ (आमचे) मालक यांच्या चरणी दाशी सत्तासुंदरीबाईचा शि. सा. न. विनंती विशेश. आहे का वळख? मी सत्तासुंदरीबाई! तुमची एकेकाळची फेवरिट दाशी!! किती दिसांनी काल रोजी दुपारची टीव्ही लावून (लवंग चघळत) पडले होत्ये, तेवा अचानक तुमचे दूरदर्शन झाले! बघून किती बरे वाटले म्हणून सांगू? ‘मी पुन्हा येईन’ असे वचन देऊन तुम्ही एका भल्या पहाटे निघून गेलात, ती पहाट माझ्या आविश्यात उगवूच नये, असे वाटत होते. पण तुम्ही गेला, ते गेलाच! तुमच्या वचनाची वाट बघत मी आपली बसून ऱ्हायल्ये! आपले मालक ‘आज येतील, उद्या येतील’ असे मनातल्या मनात घोकत होत्ये. पण एक दिवस नवेच मालक दारात येऊन उभे राहिले…त्यांना विडा दिला, बसा म्हटले! तर बसले नाहीत. वर म्हणाले, ‘‘बाई, हात पुढे करा!’’ मी हात पुढे केला. म्हटलं आल्या आल्या हातावर बिदागी ठेवणारे हे नवे मालक लईच उदार दिसतात.

पण…त्यांनी माझ्या हातावर दोन थेंब सॅनिटायझर टाकले, आणि निघून गेले. नवे मालक फारच जंटलमन आहेत. बांदऱ्याच्या घरातून निघता निघत नाहीत. मी त्यांना धा निरोप पाठवते, तेव्हा येकदा उभ्या उभ्या येतात, आणि जातात. तुमची भारी आठवण येते. काल रोजी टीव्हीवर तुम्हाला हौसमध्ये भाषण करताना बघितले, आणि होश उडाला. जुन्या आठवणी उफाळून आल्या…
तुझ्यासंगती गोड जाहले,
साखर झाली ही ध्याईऽऽ
ढेप गुळाची मीच सख्या रे,
हा मुंगळा कोण गं बाईऽऽ?
हलवायाच्या दारी अशी गंऽऽ, 
केव्हाची मी खडी
राया, तुम्ही जिलबी अन मी रबडी!
…ही लावणी मी पूर्वी रचली होती, आठवत्ये का? खूप गाजली होती. तुम्ही मला बक्षीस म्हणून एक कमळाचे फूल पण दिले होते. पण…काल तुमचे दूरदर्शन घेतल्यावर नवा मुखडा आपोआप व्हटांवर आला. ऐका-
किती दिसांऽऽऽनी दिसलाऽऽऽ कान्हाऽऽ, नजर निवली म्हनाऽऽऽ,
…राया, तुम्ही या ना पुन्हा पुन्हाऽऽ…!

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मालक, मालक, किती वाळलात! तब्बेतीची जरा काळजी घ्या. काजूबदाम खा, फळे खा! माझ्या ताब्यात होता, तेव्हा पाच वर्षे मी तुम्हाला कसे निगुतीने ठेवले होते ते आठवा. आपल्या मालकांची तब्बेत दाशीनेच राखायची असते. हो ना? मी राखली, पण काय उपेग झाला? तुम्ही आम्हाला सोडून गेलात. मालक, हात जोडून पुन्हा पुन्हा विनवणी करत्ये की या ना पुन्हा!!
हौसमध्ये तुम्ही तडफेने लढत होता, ते बघून क्षणभर मला वाटले, नव्या मालकांची साथ सोडून पुन्हा तुमच्याकडे धाव घ्यावी. पण तुम्ही अपोझिशन लीडर म्हणून शोभता! इतके शोभता की तुम्ही तिथेच कायम राहावे, असे वाटू लागते. विरोधी पक्षनेता म्हणून तुम्ही खरंच आदर्श आहात! खूप वर्षांपूर्वी तुमचे (आता त्यांचे) मा. नाथाभाऊ खडसे अपोझिशन लीडर म्हणून असेच जोरात भाषण द्यायचे, आणि मागे बसून तुम्ही त्यांना कागुद पुरवायचे. आता तुम्ही भाषणाचा भडिमार करता, आणि (आपले) मा. शेलारमामा तुम्हाला कागदाचा खुराक पुरवत असतात. त्यांच्यापासून सांभाळून राहा!!
काळजी घ्या राया…मी तुमची हिते वाट पाहात्ये आहे. आपकी अपनी. सत्तासुंदरी मलबारहिलकर

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com