Dhing Tang
Dhing Tangsakal

ढिंग टांग : अंकल सॅम आणि वारसा!

केलास ना एकदाचा! शेवटी काहीही झालं तरी अमेठीशी आपलं जुनं नातं आहे!!

बेटा : (जोरदार एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण...मम्मा, आयम बॅक!

मम्मामॅडम : (पक्षाच्या चिंतेत व्यग्र...) हं!!

बेटा : (खुशीखुशीत) अर्ज किया है-

मम्मामॅडम : (उजळलेल्या चेहऱ्यानं) केलास ना एकदाचा! शेवटी काहीही झालं तरी अमेठीशी आपलं जुनं नातं आहे!!

बेटा : (पडेल आवाजात) मी शेर अर्ज करणार होतो...निवडणुकीचा अर्ज नव्हे!

मम्मामॅडम : शेरोशायरी जरा बाजूला ठेव! माझं डोकं दुखतंय!!

बेटा : (काळजीच्या सुरात) डोकं दुखतंय? कुछ लेते क्यूं नहीं! मेरे पास डोकेदुखी की अक्सीर दवा है! ठकाठक ठकाठक ठकाठक ठकाठक कपाळ को लगाओ, डोकेदुखीसे फटाफट फटाफट फटाफट मुक्ती पाओ!!

मम्मामॅडम : माझी डोकेदुखी इतक्या सहजासहजी जाणार नाही!

बेटा : (आत्मविश्वासानं) तुझ्या डोकेदुखीचं नाव मोदीजी असं असेल, तर माझ्याकडे औषध आहे!!

मम्मामॅडम : सध्या दिवस युद्धाचे आहेत!! डावपेचांकडे लक्ष द्या! सगळं नीट चाललं होतं, तेवढ्यात तुझ्या सॅम पित्रोडा अंकलनी त्या कमळवाल्यांच्या हातात आयतं कोलित दिलंन!!

बेटा : (सिक्स मारल्याची ॲक्शन करत) ओह, माय डिअर अंकल सॅम? काय केलं त्यांनी?

मम्मामॅडम : (तक्रारीच्या सुरात) आपल्या जाहीरनाम्यातल्या संपत्तीच्या पुनर्वितरणाच्या मुद्द्यावर गदारोळ उठलेला असतानाच तुझ्या अंकल सॅमनं अमेरिकेत वारसाहक्कानं मिळालेल्या संपत्तीवर सरकार ५५ टक्के कर आकारते, असं सांगून टाकलं! केवढा गोंधळ झाला त्यामुळे!!

बेटा : (कौतुकादरानं) अंकल सॅम इज जिनीअस! ते माझे खरे सल्लागार आहेत!!

मम्मामॅडम : (वैतागून) आपला पक्ष सत्तेवर आला की सामान्य माणसाच्या घरचं सोनंनाणं, आणि जमिनी काढून घेणार, असं सांगत हिंडतायत आता कमळवाले!!

बेटा : (दिलासा देत) यू जस्ट डोण्ट वरी!! त्या कमळवाल्यांना काहीही बोलू दे, मी काल महाराष्ट्रात सांगून आलोय की, सत्तेवर आलो की लग्गेच ठकाठक ठकाठक ठकाठक कोट्यवधी लक्षाधीश बनवायला घेणार! खात्यात ठकाठक पैसेच येऊन पडतील!!

मम्मामॅडम : (कंटाळून) कोट्यवधी लखपती कसे करणार? आपण अशी जुमलेबाजी करु नये बेटा! शोभत नाही ते!!

बेटा : (अभिमानाने) माझी एक क्रांतिकारी योजना आहे! ती कार्यान्वित झाली की सगळे लखपती होणार!! देखो भय्या, यही फर्क है हम लोगों में और उन में...वो कुछ अमीर दोस्तों को करोडो रुपये देते है, हम वही करोडो रुपये गरीबों को बांटनेवाले है!! इस देश में धन की कोई कमी नहीं है, मम्मा!!

मम्मामॅडम : (अविश्वासानं) असं असतं तर चाळीस वर्षांपूर्वीच गरीबी नसती का हटली?

बेटा : (खांद्यावर थोपटत) मैं हूं ना!! सगळ्यांना खटाखट नोकऱ्या, नोकरी लागेपर्यंत ठकाठक ठकाठक लाखभर रुपये, नोकरीसाठी फटाफट प्रशिक्षण, नोकरीची सटासट गॅरंटी...पटापट मतं मिळतील बघ आता!!

मम्मामॅडम : (हुरुप येत) खरंच? पण यावेळी अमेठीमधून तू प्रचंड मताधिक्यानं निवडून यायला हवं हं! माझी खूप इच्छा आहे, अमेठीतल्या त्या कमळवाल्यांच्या ओव्हरस्मार्ट उमेदवाराचं डिपॉझिटच जप्त व्हायला हवं! (नाक मुरडत) सास भी कभी बहु थी म्हणे!! हु:!!

बेटा : (आठवून) मला ताबडतोब अंकल सॅमना फोन करायला हवा!

मम्मामॅडम : (नाराजीनं) आता त्यांना फोन कशाला? झालं ते झालं! आता प्रचाराला लागा!!

बेटा : (शंकेखोर मुद्रेने) ते वारसाहक्काने मिळालेल्या संपत्तीवरच्या करआकारणीबद्दल बोलले की पोलिटिकल वारसाहक्काबद्दल हे विचारुन घ्यायचंय मला!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com