esakal | ढिंग टांग : मरणकळा!
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : मरणकळा!

ढिंग टांग : मरणकळा!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

मरणकळेला नाही
थारा मानवतेचा
फिकीर नाही विज्ञानाची,
संस्कृति किंवा तत्त्वांचीही.
बुकेचोपड्यांमधले चिंतन
सारे सारे थिटे पडावे, 
संतमहात्मे, किंवा प्रेषित
देवदूत वा स्वामी मन्मथ
क्षणार्धातहि फिके ठरावे,
असले असते तिचेच वर्तन. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

मरणकळेला ठाऊक नसते,
जातपंथ वा धर्म काहीही,
नकाशातल्या सरहद्दींचे
झगडे किंवा धनवंतांच्या
धनराशींची पर्वा नाही.

मरणकळेला ती, तिला कशाला
लळा असावा मानवतेचा?

अमंगळाच्या रूपामध्ये
चोरपावली हलके हलके
मरळकळा ती हळूच येते,
बघता बघता जिभल्या चाटीत
दबेपांव अन्‌ दबकत दबकत
नख्या परजुनी, जिव्हा लासत
कराकरा अन्‌ दाढा रगडत
वस्तीमधुनी अशी हिंडते...
...जणु अवसेला काळोखाच्या 
गल्लीमधुनी, श्रमुनी झोपल्या
वाड्यावस्त्या, पाड्यांमधुनी
नि:शब्दाने पसरत जाते
लावसटीची अभद्र छाया...
बघता बघता उचलत जाते
देह मुटकुळे, कृशांग आत्मे,
भुकारलेल्या चेटकिणीसम
कलेवरांचे घास कोंबुनी
नरड्यामध्ये हांसत हांसत
पोटावरती हात फिरवुनी
भयंकराची ढेकर देते...

जणू विषारी सर्प निघावा,
विष शिंतोडे उडवत केव्हा,
जाळत जाई
अगीनघाईत विषार वणवा

अशीच असते मरणकळा ती,
तिला कशाला लळा असावा
तुमच्या आमच्या मानवतेचा?

विज्ञानाची गर्वमाळ अन्‌
गळ्यात मिरवून
प्रगतपणाचा उगीच डंका
त्रिखंडातहि किंवा पिटवून
पृथ्वीनामक ग्रहखडकावर
शेवाळासम तग धरणाऱ्या
मानवनामे क्षुद्र जीवाची
हबेलहंडी उडवून जाते
उग्र, विकारी मरणकळा ती...
तिला कशाला मानवतेचा
लळा असावा?

तसे पाहता मरणकळेचे 
बीमार काही नवीन नाही...

कधि युद्धातील नरसंहाराचे,
कधि क्रांतीच्या अवताराचे,
कधि आतंकी रूपामधल्या
घातक त्या बंदूकनळीचे,
कधि घाताचे, कधि पाताचे
कधि नैसर्गिक आपत्तीचे
रूप लेवुनी मरणकळा ती


वेळअवेळी उभी राहते
माणुसकीच्या उंबरठ्यावर, 
भेसुर किंचाळुनी अन्‌ तेव्हा
बळी मागते चौकामध्ये,
तिठ्या-तिठ्यांवर...

मरणकळेची कितीक रुपे
मानवतेला असती परिचित,
तिची अमानुष ताकदसुद्धा
शस्त्रासम वापरतो मानव.

अशी अवकळा, 
अशी अवदसा
विषाणू होऊन तुटून पडते,
लोळागोळा
होऊन पडतो,
विज्ञानाचा, प्रगतपणाचा
नक्षा तेव्हा उतरून जातो

अथांग तारांगणात तेव्हा
उरतो एकुटवाणा
हतबलतेची जाणीव होऊन
अधिक एकटा
होऊन जातो...

loading image