esakal | ढिंग टांग : आमची(ही) म्यारेथॉन मुलाखत!
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : आमची(ही) म्यारेथॉन मुलाखत!

मुलाखत अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात झाली. कां की सुरुवातीलाच आम्ही वाढदिवसाच्या (आगाऊ) शुभेच्छा दिल्या. साहेब ‘थॅंक्‍यू’ म्हणाले. या ऐतिहासिक मुलाखतीचा सारांश वाचकांसाठी देत आहो! :

ढिंग टांग : आमची(ही) म्यारेथॉन मुलाखत!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

माननीय साहेब साठीत पदार्पण करीत आहेत. त्याच्या पूर्वसंध्येला आम्हीही त्यांची दीर्घ आणि ऐतिहासिक मुलाखत घेतली. घेणे भाग होते. मुलाखत अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात झाली. कां की सुरुवातीलाच आम्ही वाढदिवसाच्या (आगाऊ) शुभेच्छा दिल्या. साहेब ‘थॅंक्‍यू’ म्हणाले. या ऐतिहासिक मुलाखतीचा सारांश वाचकांसाठी देत आहो! :

आम्ही : (टाळ्या वाजवत सुरात) हॅप्पी बऽऽड्डे ट्यू यूऽऽ...हॅपी बऽऽड्डे टू डिअर साऽऽहेऽऽब! हॅपी बड्डे टू यूऽऽऽ...मे गॉऑऑऑड ब्लेस युऽ...

साहेब : (कंटाळून) पुरे झालं! कामाला लागा!!

आम्ही : (गोंधळून) कसल्या?

साहेब : (डाफरून) मुलाखत घ्यायला आलाय ना तुम्ही? मग घ्या ना! हा मी इथे बसलोय!!

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

आम्ही : (सावरून बसत) सध्या काय चाललंय?

साहेब : कुठे काय चाललंय? घरीच तर आहे!!

आम्ही : (प्रश्न सुधारून घेत) सॉरी! घरात काय चाललंय?

साहेब : (संतापून) तुम्हाला कशाला नसत्या चौकश्‍या? प्रश्न विचारा! नेहमीसारख्या शिळोप्याच्या गप्पा नकोत! 

आम्ही : (सावरून बसत) कसं चाललंय तुमचं सरकार?

साहेब : (खवळून) कसंही चाललं असेल! तुम्ही मास्क न लावता आलात कसे? हात तरी धुतलेत का?

आम्ही : (गोरेमोरे होत्साते) ऱ्हायलं! सॉरी!!

साहेब : (समजूत घालत) असं वागू नये! कोरोनासोबत राहायला आपण शिकलं पाहिजे! काढा वगैरे पिता की नाही? महिन्यातून एकदा आर्सेनिक आल्बम घेता की नाही? वाफारा घेता की नाही? माणसानं कसं सगळं नीट जपून करायला हवं! (वैद्यकीय सल्ला देत) तुम्ही होमेपाथी ट्राय करा! गुण येतो!!

आम्ही : (अतीव आदराने) साहेब, साहेब, तुम्ही डागतर का नाही हो झालात?

साहेब : (काहीसे लाजत) डॉक्‍टरच होणार होतो, पण-

आम्ही : पण? पण काय डॉक्‍टर...आपलं...साहेब?

साहेब : कुणाला काही व्हायला लागलं की मला सहनच होत नाही! मग डॉक्‍टर होण्याऐवजी मी फोटोग्राफर झालो!  

आम्ही : (अतिशय नमून) तुम्ही घरात बसून कोरोनावर डॉक़्टरेट तरी मिळवा! केवढा अभ्यास आहे तुमचा! कमाल आहे!! तुम्हाला औषधंही माहीत आहेत! उगीच नाही, ‘डब्ल्यूएचो’नं आपलं कौतुक केलं! मला तर डाऊट आहे की जागतिक आरोग्य संघटना हल्ली तुमचाच सल्ला घेते!

साहेब : (काहीसे लाजत) लहानपणापासून मला दोन आल्बम ठाऊक आहेत! एक आर्सेनिक आल्बम आणि दुसरा फोटोंचा आल्बम! 

आम्ही : (तक्रारीच्या सुरात) आम्हालाही तपासा ना!  अहो, हल्ली आमच्या पोटात काही ठरत  नाही! थेट ओठातच येतं! काय असेल हो प्रॉब्लेम!! आऽऽऽ...

साहेब : (क्‍लिनिकमध्ये बसल्यागत) जीभ नका दाखवू हो! (विचारात पडत) काय गडबड आहे कळत नाही, हल्ली माझ्याकडे पोटदुखीचे फार पेशंट येतात! परवा ते आपले नानासाहेब फडणवीस असेच पोटदुखीने कळवळत  आले होते! म्हणाले ‘गेले सहा महिने जाम पोटात दुखतंय!’

आम्ही : (आश्‍चर्याचा धक्का बसून) काय सांगताय काय? खरंच?

साहेब : (ठणकावून) खोट बोलत नाही मी कधी! मी त्यांचा फ्यामिली डॉक्टरच होतो बरीच वर्षे!!

आम्ही : (उत्सुकतेने) मग उपाय काय सांगितलात त्यांना, डॉक्टर...आपलं ते हे...साहेब?

साहेब : (गालातल्या गालात हसत) ते आमचं डॉक्‍टर आणि पेशंटमधलं गुपित आहे! समजलं?

(उत्तरार्ध उद्या किंवा परवा  किंवा पुन्हा कधीतरी!)

loading image