ढिंग टांग : खर्मरित खलिता!

ढिंग टांग : खर्मरित खलिता!

प्रति, मा. पाटील चंदुदादासाहेब, (प्रदेश कमळाध्यक्ष) आणि/ किंवा फॉर दॅट म्याटर कमळ पार्टीतले कोणीही-

तसे पाहो गेल्यास तुम्ही आमचे येकेकाळचे जीवश्‍च कंठश्‍च मित्र. दोघांमधले नाते अभेद्य आणि अभंग... परंतु गत काही दिवसांत आपली बुद्धी फिरल्याचे दिसो लागले आहे. घर फिरले की घराचे वासेदेखील फिरतात, तैसी स्थिती. अधिक काय बोलावे? जो तो आपल्या कर्माची फळे भोगतो, हेचि खरे. परंतु आता अगदीच मस्तकावरोन पाणी वाहो लागले, म्हणोन आपणांस हा खर्मरित खलिता धाडीत आहो. शब्दांचा मार पुरेसा न ठरला तर अन्य मार्ग अवलंबिण्यास पुढती वा मागुती पाहणार नाही, हा आमचा शब्द समजावा!

...गेले काही दिवस आम्ही बघतो आहो, की जनतेच्या पुढाकाराने आणि लोकशाही मार्गाने महाराष्ट्रभूमीत स्थापित झालेले पवित्र त्रिदंडी सरकार पाडण्यासाठी आपण सारे देव पाण्यात बुडवोन बसलाहा! दिवसरात्र कटकारस्थाने रचीताहा!! ‘सर्कार पडेल...पडेल...पडेल...पऽऽडले!’ ऐसी आरोळीवजा भूमका उठवीताहा!! हे सर्वथा गैर आहे, व त्याचा मुलाहिजा राखला जाणार नाही, हे बरे समजोन असा. बऱ्या बोलाने ह्या नस्त्या उठाठेवी थांबवोन नवनिर्वाचित सरकारास रयतेची चार कामे नीट करो द्यावी, ऐसी समज आम्ही येथे देत आहो! तुमचे उटपटांग उद्योग नच थांबल्यास पुढील कारवाई करण्यास आम्ही (सगळे हं) समर्थ आहो!!

गेले दोनेक महिने पाहातो आहे की आमचे सरकार आपापत: पडावे, यासाठी आपण दर दिवसाआड नवस बोलताहा!! तोडगे करीताहा!! परवाचे दिशी आमचें बंगल्याचे आवारात कुंकूसिंचित लिंबू-मिरची आढळोन आली. दारावेरी मेलेला सर्प आणोन टाकिलेला दिसोन आला! हे काय चालिले आहे? ऐसी जारणमारण विद्या आम्ही मानीत नसतो. पूर्वसूरींचे पुण्याईच्या पायावर आमचे सरकार डुगडुगत का होईना, परंतु उभेच्या उभे आहे! 

आमचे सरकार यावे, ही तर श्रींची इच्छा होती. तद्‌प्रमाणे ते आले! ईशकृपेने आम्ही कारभाऱ्याच्या खुर्चीत निर्ममभावाने बसलो आहो. आम्ही सत्तेस चिकटलो नसोन, सत्ता आम्हांस येवोन चिकटली, हे ध्यानी धरावे! ईश्‍वरेच्छा बलियसी, दुसरे काय? मुंगळा गुळाच्या ढेपेशी न जाता आख्खी गुळाची ढेपच्या ढेप मुंगळ्याकडे चालोन आली!! असो.

इतप्पर आपण सरकारपाडकामात निमग्न राहोन दर दिनी अष्टौप्रहर धमक्‍या, दरडावण्या देवोन आमच्या शिलेदारांस जेरीस आणताहा, ऐसे निदर्शनास आले आहे. आपल्या धमक्‍यांमुळे आमचे मंत्री व सरदार कामे करण्यास काचकुच करीत असल्याने रयतेची चार कामे धड न झाल्यास त्यास आपणच जबाबदार असाल, याची समज आम्ही आपणास देत आहो! 

आम्हास सत्रांदा शाप देण्याच्या नादात आपली खुर्ची डगमगली हे आपल्या लक्षात आले असेलच. इनोसंट माणसाच्या मागे लागले की देव अशी शिक्षा देतो, हे ध्यानी ठेवावे. असो.

आमचे सरकार पाडण्यासाठी आपण जंग जंग पछाडीत असता, ऐसे कळाले. सरकारच्या पाडकामासाठी उदईक येणार असाल, तर आजच या! जेवत असांल, तर पानावरोन उठोन हात आंचवावयास येथ या!! निद्रेत असाल तर तडक अंथरुणावरोन उठोन तोंड खंगाळण्यास येथ या!

उठता बसता सरकार पडण्याच्या धमक्‍या कोणाला देता? हे सरकार अभेद्य आणि चिरेबंदी आहे. नव्या तंत्रज्ञानाने युक्‍त असे बांधकाम आहे. तुमच्या धमक्‍यांनी ते पडणे नाही!! तेव्हा या असे सामोरे!

आता कशाला उद्याची बात? बघ, निघून चालली रात!!

ता. क. : आमच्या त्रिदंडी सरकारच्या अभेद्य आणि चिरेबंदी बांधकामाचे मॉडेल पाठवीत आहो! बघून घ्या!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com