आजची तिथी : विश्वावसु संवत्सर श्रीशके १९४७ भाद्रपद शु. एकादशी. आजचा वार : बुध्दिवंत वार! आजचा सुविचार : जे का रंजले गांजले। त्यांसी म्हणे जो आपुले । तोचि साधु ओळखावा । देव तेथेची जाणावा ॥.नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) काल रात्री अतिशय गाढ झोप लागली. समाधानाचे जेवलो होतो, समाधानाने झोपलो आणि सकाळी उठलो तेव्हा समाधानाने तृप्त झालो होतो. समाधानाने दोन बश्या कांदेपोहे खाल्ले. आणखी थोडे समाधान व्हावे म्हणून पुन्हा एक बशी मागवली.खानसामा घाबरला. म्हणाला, ‘स..स…साहेब, प…प…पोहे संपले हो!’ मी हसून म्हटले, ‘अरे, ठीक आहे, घाबरु नकोस. पोहेच ते, संपणारच. आपण पुन्हा घमेलंभर करु…काय? मी समाधानी आहे!’ त्याने आतमध्ये जाऊन समाधानाने पुन्हा कढई ग्यासवर चढवली असणार!.माझ्याकडे सगळे अतीव आदराने बघत आहेत, या भावनेने मी थोडा संकोचलो आहे. गिरीशभाऊ महाजन तर हात जोडून उभे होते. मी जवळ येताच म्हणाले, ‘तुस्सी ग्रेट हो! एवढा गुंतागुंतीचा प्रश्न किती कुशलतेनं सोडवलात! तेदेखील कुणाचंही नुकसान न करता! आज लाखो लोक तुम्हाला दुवा देत असतील! जय हो!’मी हसून म्हणालो, ‘अरे, असं काय करता? आपण इथं सेवा करायला आलो आहोत. राजकारणं करायला कोणाकडे वेळ आहे? येणारा प्रत्येक क्षण मी लोकसेवेसाठीच मोजणार, अशी शपथ घेऊनच मी इथवर आलोय. माझ्या हातून चांगली कामं घडावीत ही ईश्चरी योजनाच असावी!’.बरेच लोक येऊन आज नमस्कार करुन जात होते. थोड्या वेळाने मीच मखरात जाऊन बसलो आहे, असे मला वाटू लागले. लोक माझेच अभिनंदन करत होते. मी ते विनम्रपणे स्वीकारले. लोकसेवेचे मला जणू वेडच आहे. जिथे म्हणून लोकसेवेची संधी दिसते, तिथे मी जातोच. राहावतच नाही. दिल्लीहून फोन आला, ‘शुं थयुं?’‘पती गयो! सगळे आंदोलक मुंबई सोडून गेले!’ मी फोनवर सांकेतिक भाषेत सांगितले. त्यांनी शाब्बास या अर्थाचे काहीतरी म्हटले..आमच्या पक्षात (आलेले) ज्येष्ठ नेते विखेपाटीलसाहेबांना मी म्हटले, ‘अभिनंदन!’ त्यांनी इकडे तिकडे पाहिले. मी पुढे म्हणालो, ‘तुमचंच करतोय अभिनंदन! एवढा मोठा प्रश्न सोडवलात! हायकमांड खुश आहे तुमच्यावर!’ त्यांच्या डोळ्यात टचकन पाणीच आले. हा सगळा तिढा आपणच सोडवला, यावर अजून त्यांचाच विश्वास बसत नाही. मी तरी काय करु? लोक मलाच उगीच श्रेय देतात. वास्तविक मी तर एक निमित्त आहे.आमचे ठाण्याचे मित्र कर्मवीर भाईसाहेब आले आणि गप्प उभे राहिले. शेवटी मीच विचारले, ‘अभिनंदन करायला आलात का? करु नका. हे काम गेल्या वर्षी तुम्हीच केलंय. श्रेय तुमचंच आहे!!’ ते खुश होऊन निघून गेले..थोड्या वेळाने आमचे दुसरे बारामतीचे मित्र दादासाहेब आले, तेही येऊन गप्प उभे राहिले. मी म्हटले, ‘बोला! काय काम काढलं?’‘अभिनंदन करु का नको करु, काही कळंना झालंय!! जाऊ दे, करतोच अभिनंदन! चांगला प्रश्न मार्गी लावला, हे बरं झालं! उगाच काट्याचा नायटा होत होता..’ बोलताना त्यांच्या शब्दांतून वेदना मला जाणवत होती…मी ममतेनं त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणालो, ‘दादासाहेब, खट्टू होऊ नका! मागल्या वेळेला प्रश्न भाईसाहेबांनी सोडवला, यावेळी मी सोडवला…पुढल्या वर्षी तुम्ही सोडवा! त्यात काय एवढं?’…दादासाहेबांनी प्रेमभराने माझा हात दाबला!.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.