ढिंग टांग : तू चीज बडी है मस्क...!

इव्हीएम ऊर्फ मतदानयंत्र हे अत्यंत धोकादायक यंत्र असून ते वापरणे ताबडतोब बंद करायला हवे. एकदम दबं!! कां की, ते सहज कोणीही हॅक करु शकते.
British Nandi
British Nandisakal

इव्हीएम ऊर्फ मतदानयंत्र हे अत्यंत धोकादायक यंत्र असून ते वापरणे ताबडतोब बंद करायला हवे. एकदम दबं!! कां की, ते सहज कोणीही हॅक करु शकते. आजवर कुणी ते हॅक करु शकले नाही, कारण केवळ इव्हीएमद्वारे जिंकणारे पक्ष सत्तेवर बसतात, आणि हॅक करायला आलेल्यांना हॅक हॅक करतात. इव्हीएम नावाचे हे दळभद्री यंत्र म्हणजे लोकशाहीला असलेला शाप आहे, शाप!

भारतातील इव्हीएमच्या डबड्याचे कुठलेही बटण दाबले तरी अगम्य आवाज येऊन मत मात्र कमळालाच जाते, हे तीन वेळा सिद्ध झाले. आणखी किती वेळा सिद्ध करायला हवे? सर्वच्या सर्व इव्हीएम यंत्रे खोल समुद्रात फेकून दिली पाहिजेत, या मताचे आम्ही आहोत, पण आम्हाला विचारतो कोण? पण वाचकहो, आधुनिक जगताचा नवविश्वामित्र जे की टेस्लाकार (पक्षी : टेस्ला कारचे निर्माते!) इलॉनदादा मस्क यांनी अखेर आपल्या प्रज्ञेनेच इव्हीएमबद्दल संशय व्यक्त करुन ते सहजी हॅक करता येते, असे स्वच्छ शब्दात सांगितल्यामुळे आमच्या जीवात जीव आला….इलॉनदादा मस्क झिंदाबाद! इव्हीएम मुर्दाबाद!!

अमेरिकेतील टेक्सस प्रांतातील बोका चिका नावाच्या ठिकाणी एका चिमुकल्या घरात इलॉनदादा राहतात. आम्ही इव्हीएमचे टमरेल घेऊन त्यांच्याकडे जाऊन धडकलो. (लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही कुठेही जाऊ शकतो.) इलॉनदादा जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांना सगळ्याच विषयातले सगळे काही आपोआप कळते. प्रत्येक बुद्धिमान व्यक्ती श्रीमंत असतेच असे नाही. (उदा. आम्ही!) पण प्रत्येक श्रीमंत व्यक्ती बुद्धिमान असतेच असते.

इलॉनदादांच्या समोर आम्ही इव्हीएम आपटून म्हणालो, ‘हेच ते भिकार डबडे, ज्याने लोकशाही धोक्यात आणली!’

‘अरे बापरे!’ इलॉनदादा म्हणाले. हातातल्या रिमोटची बटणे दाबून त्यांनी इव्हीएम दूरस्थ पध्दतीने चालवण्याचा प्रयत्न केला. ढिम्म एकही दिवा पेटला नाही. त्याऐवजी एक काळीशार आलिशान मोटार मात्र दारात येऊन उभी राहिली.

‘मी रिमोटची बटणे दाबून आमची टेसला बोलावली,’ इलॉनदादांनी खुलासा केला, ‘आमची टेसला फार गुणी आहे हो! पेट्रोल संपलं की स्वत: जाऊन पंपावर पेट्रोल पिऊन येत्ये!’

टेसला ही फार अत्याधुनिक कार असून ती इलॉनदादांनी स्वत: निर्मिली आहे. म्हणूनच त्यांना टेसलाकार असे म्हणतात. (जसे की ‘पानिपत’कार विश्वास पाटील…) असो.

‘अहेब्बुवा! चंगळच आहे एका माणसाची! पण आमच्या इव्हीएमची कटकट मिटवून द्या की!’ आम्ही मुद्दा सोडला नाही.

‘मुंबईतल्या निवडणुकीत काय भानगड झाली हो? मी आमच्या ‘एक्स’वर वाचलं!! तिथं इव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचं कळलं!,’ इलॉनदादांनी विचारले. बाय द वे, पूर्वाश्रमीचे जे की ट्विटर, आता ‘एक्स’ या नावानिशी इलॉनदादांच्याच मालकीचे आहे. श्रीमंत माणूस!

‘तुम्ही एक्सकर असाल तर तिथं वायकर आहेत, म्हणून घोटाळा झाला!’’ आम्ही छपरी विनोद केला. इलॉनदादा हसले नाहीत. असो.

‘तुमच्या लोकांनी मला च्यालेंज दिलाय! इव्हीएम हॅक करुन दाखवा, आणि पाचशेएक रुपये मिळवा!,’’ इलॉनदादांनी माहिती दिली. आम्ही च्याट पडलो.

‘घ्या च्यालेंज, आणि कमवा बख्खळ!,’ आम्ही डोळा मिचकावून प्रोत्साहन दिले.

‘नको, उगीच काय पैजा लावायच्या?,’ एवढे बोलून त्यांनी हातातला रिमोट दाबून मोटारीचा दरवाजा उघडला.

मोटारीत बसता बसता इलॉनदादा म्हणाले : चांगला टाइमपास चाललाय तुमच्या देशात, त्यात मी थोडी भर घातली, इतकंच! मनाला काय लावून घेता?’

…तेवढ्यात टेसला मोटार बंद पडली. बॉनेट उघडत इलॉनदादा डोके खाजवत म्हणाले : हॅक झाली बहुतेक! बोंबला!!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com