ढिंग टांग : पीए तो पीए…ऐसे!

काल रात्री उशीरापर्यंत पत्रकारांना घेऊन बसलो होतो!...लिंबूपाणीच सांगा! डोकं उतरेल तरी!!
Dhing Tang
Dhing Tangsakal
Updated on

पीए : (बाअदब बामुलाहिजा…) गुड मॉर्निंग, साहेब! चहा सांगू?

मंत्रिमहोदय : (कपाळ चोळत) नको! काल रात्री उशीरापर्यंत पत्रकारांना घेऊन बसलो होतो!...लिंबूपाणीच सांगा! डोकं उतरेल तरी!!

पीए : (चपळाईने फोनला लागत) अरे, चहा सांगा रे एक! सोबत बिस्किटंही…हो आणि काय आहे? कांदेपोहे? सांग एक प्लेट…लिंबू सेपरेट आण जास्त! सोडाही सांग जरा..!

मंत्रिमहोदय : (कंटाळून) काय आज कार्यक्रम?

पीए : (लिस्ट बघत) नथिंग ग्रेट, साहेब! आमदार शेरेकर येताहेत शिष्टमंडळ घेऊन तीन वाजता! पालघरचे कामगार बसलेत सकाळपासून, ते बंगल्यावरसुद्धा जाऊन आलेत! दोन पक्षप्रवेश आहेत, आणि एक पक्षकार्यालयाचं उद्घाटन…पण ते संध्याकाळी सातला आहे! रात्री अकरानंतर आपला राखीव वेळ आहे, साहेब!

मंत्रिमहोदय : (डोकं हलवून) मी जरा ॲण्टीचेंबरमध्ये आहे…अर्जंट असेल तरच पाठवा!

पीए : (इथून पुढे सगळं एकपात्री स्वगत) हलोऽऽ…हां, काय? बोललोय मी! साहेब बिझी आहेत जरा! हो, बराच वेळ लागेल! शुक्रवारनंतर करा फोन!...-हलो, शत्रुघनभाई, अरे आपको कैसे भूलेंगे? बताओ, क्या हाल है? अरे, यार हमारी हॅरिअर कभी आयेगी? तुम्हीच मर्सिडिझ घ्या आता!! आणखी एक…! नाहीतर चॉपर घ्या…हाहाहा!! हां, हां, फाइल दिल्ली में है…क्या? हांहा, मेरे पासही देना है…येस, येस, फाईल भी!!

-हॅलो, हां, बोला! एक मिनिट मी विचारतो! (फोन बाजूला ठेवून शांतपणे पोह्यांचा बकाणा भरून झाल्यावर फोन उचलून) विचारलं मी साहेबांना! सहीला पाठवा तुम्ही, बघून सांगतो म्हणाले!! हो, हो, तेही सांगितलं! काही बोलले तरी नाहीत बुवा!!...ओके, थँक्यू, पण बोलू आपण!!

-जीवन, भाषण झालं का लिहून? नको लिहू! कार्यक्रम कॅन्सल आहे!!

- नमस्कार, शेरेकरसाहेब! काय? नेहमीचीच गडबड हो! तुम्हाला तर माहीतच आहे!! हंऽऽ…दुपारचं काही जमण्यासारखं दिसत नाही! तुम्ही पोस्टपोन केलेलं बरं! उगीच कशाला घाई करता? ओके, मी सांगतो!! अच्छा, साहेब, ठेवू?

-हलो, अरे, राजू ड्रायवरला सांग, बंगल्यावरुन साहेबांचा डबा आणायचाय!! - हल्लो, मेधा..बंटीला सोडलं का शाळेत? काय? स्कॉर्पिओला काय झालं? पालिकेची गाडी बोलावून घे मग! बरं, कुठं? राणावत ज्वेलर्स? बरं, मी बघतो!..डबा नको पाठवू आज आणि हो, आजही मला उशीर होईल पुन्हा!

-हलो, तेरे को हजार बार बोला यार, वो सीआरझेड में आता है! ऐसा कैसा होएगा? भाजीमूला काम है क्या? रुक…बाद में बोलता हूं!

- बागवेसाहेब, आज कांदिवलीचा कार्यक्रम थोडा कठीण आहे! तुम्ही अतिरिक्त सचिवांना बोलवा ना! ते रिकामेच असतात!! बराय!

-जलालभाई, क्या हाल है? जरा शामको राणावत ज्वेलर्स को फोन करना, कुछ जरुरत है उसको! हां, हां! बिलकुल! शुक्रिया!!

-प्रीतमभाई, शाम को तुम्हारी नई ‘व्हेलफायर’ भेजो! हां, साहब को जाने का है! रात को!!

-हल्लो, मेधा, रात्री पुण्याला जातोय, सकाळी येईन!! खरंच मीटिंग आहे, बाबा! घरी आल्यावर बोलू! औषधं घेतलीस?

मंत्रिमहोदय : (ॲण्टिचेंबरमधून बाहेर येत) आत्ता डोकं उतरलं! कुणाचे काही निरोप?

पीए : (सहजपणे) नथिंग ग्रेट साहेब! सीएमसाहेब दिल्लीला चाललेत! डीसीएमसाहेब बारामतीहून आलेलेच नाहीत अजून! मोठे साहेब शिलाँगच्या दौऱ्यावर रवाना झाले! शेरेकरांनी आज नको असं कळवलंय! कांदिवलीचा कार्यक्रम कॅन्सल झाल्याचा निरोप आहे!

मंत्रिमहोदय : (शहाजोगपणे) गाडीचं काय झालं?

पीए : (तत्परतेनं) गाडी रेडी आहे, साहेब! निघायचं?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com