ढिंग टांग : नक्की काय घडतंय?

इतिहासपुरुष जागा होता. नियतीने त्याला नेमून दिलेले इतिहास लेखनाचे कार्य पुढे नेण्यासाठी तो सदैव सज्ज होता.
dhing tang
dhing tangsakal

इतिहासपुरुष जागा होता. नियतीने त्याला नेमून दिलेले इतिहास लेखनाचे कार्य पुढे नेण्यासाठी तो सदैव सज्ज होता. इतिहास घडला रे घडला की इतिहासपुरुष ते जसेच्या तसे लिहून काढण्यास तय्यार होता. डोळियांत तेल घालोन, जीवाची कुर्वंडी करोन, दिवसरात्र जाग्रणे करोन इतिहासपुरुषाने कधीही आपला वसा सोडिला नाही. कधीच नाही, कधीच नाही!! पण...

...पण इतिहास घडतच नसेल तर इतिहासपुरुषाने काय करावे? काय लिहावे? कसे लिहावे? चौसष्टावी जांभई देऊन इतिहास पुरुष सर्सावोन बैसला.

नेमकी तीथ सांगावयाची तर फाल्गुन कृष्ण प्रतिपदेचा दिवस. टळटळीत दुपार होती. टळटळीत हे वास्तविक उन्हाचे विशेषण. परंतु, ऐतिहासिक लेखनात ते दुपारलाच लागते. मुंबईतली सकाळ असेल तर तेव्हाही लागते. मुंबईत काय, मार्च महिन्यात रात्रदेखील टळटळीत असते. असो.

अशा टळटळीत दोन प्रहरी राजियांनी अचानक आपल्या अष्टप्रधानांस बलाऊ धाडिले. ‘आसेल तसे या, जेवत असाल तर आंचवावयास या! जेवण बाकी असेल, तर भोजनास या’ ऐसा सांगावा घेवोन एक महाराष्ट्रसैनिक रवाना जाहला. ‘जेवण बाकी असेल तर भोजनास या’ हा आदेश आहे की निमंत्रण हे अनेकांना आकळले नाही. तरीही महाराष्ट्र दौलतीच्या नवनिर्माणाचा वसा घेणारे सारे येकनिष्ठ पाईक विद्युतवेगाने ‘शिवतीर्थ’गडावर हाजिर जाहले.

‘राजे, कशापायी याद केलीत? निस्ते खाकरला असता तरीही आलो असतो, दूत पाठवण्याची काये गरज पडली?,’ अतिविनम्रतेने बाळाजीपंत नांदगावकरांनी पृच्छा केली. राजेसाहेब गुमसुम खिडकीबाहेर बघत बसले होते. त्यांनी मुखातून सबूददेखील काढला नाही की, आपल्या सरदार-दरकदारांची दखल घेतली नाही.

...राजियांच्या मनात काही मनसुबा तयार होतो आहे खास! काही तरी खचितच घडले असणार!! राजियांची विचारमग्न मुद्रा बघून बाळाजीपंतांच्या कानात सरनोबत नितीनाजी सरदेसाई पुटपुटले, ‘‘दयाऽऽ, कुछ तो गडबड है!’’

‘राजे, काही मसलत समोर आली आहे काये? गनिमाच्या गोटातून काही उलटसुलट खबर आली आहे काये?’ धीर करोन बाळाजीपंतांनी विचारिले. राजेसाहेबांनी नकारार्थी मान हलवली. येक दीर्घ सुस्कारा सोडिला. ओठांची भेदक हालचाल केली. दिल्लीश्वरीदेवी कमळाबाईच्या संदर्भात ते काहीतरी पुटपुटले असावेत. त्यातील फक्त ‘चायची कटकट’ येवढेच दोन शबूद ऐकू आले...

‘येत्या चैत्र शुद्ध प्रतिपदेला काय बेत आहे?,’ राजियांनी व्यग्र मुद्रेनेच विचारले. ‘हेच ते आंबाडाळ वगैरे!,’ बेसावध नितीनाजी सरदेसायांनी उत्तर दिले. राजियांची मुद्रा कठोर जाहली.

‘खामोश! गुढी पाडव्याच्या मेळाव्याचे कुठवर आले, असे विचारतो आहो, आम्ही! आंबाडाळ कसली खाताय?,’ राजियांनी क्षोभयुक्त विचारणा केली. सरनोबत नितीनाजींची मुद्रा आंबडाळ खाल्ल्यागत आंबट जाहली.

औंदा सर्वांना गुढीपाडव्याच्या मेळाव्याचं आवतण द्या! म्हणावं, काय घडलंय, काय चालू आहे, ते सांगायचंय...शिवतीर्थावर या!’ राजेसाहेबांनी भराभरा सूचना केल्या. याचा अर्थ काहीतरी खास घडले आहे, एवढे उपस्थितांनी अचूक हेरले. बाळाजीपंतांचा उत्साह तर गगनात मावेना! इतिहासपुरुषानेही कान टवकारले. त्याने लागलीच टाक-दौत आणि कागुद पुढ्यात ओढले...शेवटी इतिहास घडणार तर!

‘खरंच काही घडतंय का, राजे?,’ बाळाजीपंतांनी अगदीच न राहवून विचारले. काय घडलंय, काय चाललंय, हे दोन यक्षप्रश्नांच्या उत्तरात महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचे भविष्य दडले होते...लौकरच ऐलान होवोन शत्रूच्या गोटात हबेलंडी उडेल, या कल्पनेने खलबतखान्यात खळबळ उडाली.

राजेसाहेब उठोन उभे राहिले. त्यांणी येरझारा घातल्या, मग खिडकीबाहेर बघत कंटाळलेल्या सुरात सांगितले, ‘छे, काऽही घडत नाहीए, आणि काऽऽहीही चालू नाहीए...हेच सांगायचंय आम्हाला तिथं! कळलं? जय महाराष्ट्र!’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com