ढिंग टांग : थोडे बंद, थोडे चालू!

स्थळ : मातोश्री हाइट्‌स, बांद्रे (बुद्रुक)
ढिंग टांग : थोडे बंद, थोडे चालू!

ढिंग टांग : थोडे बंद, थोडे चालू!

ब्रिटिश नंदी

स्थळ : मातोश्री हाइट्‌स, बांद्रे (बुद्रुक)

चि. विक्रमादित्य : (धडाक्‍यात खोलीत शिरत) हाय देअर बॅब्स! मे आय कम इन?

उधोजीसाहेब : (वैतागून) कुणाच्याही खोलीत शिरताना दार ठोठावावं, हा शिष्टाचार आहे! कितीदा सांगायचं तुला?

विक्रमादित्य : (बुचकळ्यात पडत) उघडंच तर आहे दार! (छताचा पंखा चालू करत) छ्या, केवढं उकडतंय इथं!

उधोजीसाहेब : (किंचाळून) पंखा बंद कर आधी! पंखा अलाऊड आहे का, हे आधी चेक कर!!

विक्रमादित्य : (गोंधळून पंखा बंद करत) पंखा नॉट अलाऊड? व्हाय?

उधोजीसाहेब : (भानावर येत) नाही...तसं नाही, पण... निर्बंध पाळले पाहिजेत, या मताचा मी आहे!

विक्रमादित्य : (हतबुद्ध होत) बॅब्स, धिस इज

टू मच हं!

उधोजीसाहेब : (घाईघाईने) मुळात मी म्हणतो की, इतक्‍या रात्री कशाला इथं यायचं पण! आठनंतर नाइट कर्फ्यू लागतो माहितीये ना?

विक्रमादित्य : (गोंधळून) एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जायलासुद्धा नाइट कर्फ्यू?

उधोजीसाहेब : (गंभीर मुद्रेने) हो, कारण नाइट वैऱ्याची आहे! संकट घोंघावतंय! हो, भयंकर संकट घोंघावतंय! एवढं मोठं संकट माझ्या महाराष्ट्रानं कधीही पाहिलं नसेल! किंबहुना नाहीच पाहिलेलं!! माझ्या महाराष्ट्राला वाचवायचं असेल तर आपण सर्वांनी सावध राहायला हवं!

विक्रमादित्य : (निरागस सुरात) तुम्ही पुन्हा लॉकडाऊन करणार का?

उधोजीसाहेब : (आवंढा गिळत) आत्ता साडेआठ वाजता ‘लाइव’वर मी शिळोप्याच्या गप्पा मारल्या का?

विक्रमादित्य : (उजळलेल्या चेहऱ्यानं) ओह, दॅट वॉज लॉकडाऊन अनौन्समेंट? मला वाटलं की तुम्ही जनरल नॉलेज सांगताय! बाय द वे, फार टॉप होतं हं तुमचं स्पीच! मला खूप जनरल नॉलेज मिळालं! आयॅम इम्प्रेस्ड!!

उधोजीसाहेब : (बुचकळ्यात पडून) म्हंजे?

विक्रमादित्य : (इंटलेक्‍चुअली) मला कळलेले मुद्दे असे : एक, गेल्या वर्षी गुढी पाडवा आला होता, या वर्षी पण आला! दोन, ऑक्‍सिजन म्हणजेऽऽ प्राणवायूऽऽऽ! तीन, ईशान्येकडली राज्ये आपल्यापासून एक हजार किलोमीटर दूरवर आहेत! चार, कंटेनरची वाहतूक वैशिष्ट्यपूर्ण असते. तिकडून इकडे कंटेनर येतो, पण तो इकडून तिकडे जावा लागतो. थेटसुद्धा येऊ शकतोच! आणि पाच, उन्हाळा आला की पाठोपाठ पावसाळा येतो!!...

उधोजीसाहेब : (संशयानं) तू चेष्टा करतोयस माझी?

विक्रमादित्य : (भान हरपून) हे एवढं जीके मला आधी मिळालं असतं तर मीच यूपीएससीला

बसलो नसतो का?

उधोजीसाहेब : (निर्णायक सुरात) चहाटळपणा पुरे! आता रात्री नाइट कर्फ्यू आणि दिवसा डे कर्फ्यू! कोणीही घराबाहेर पडायचं नाही! कोणालाही खोलीत घ्यायचं नाही! पंधरा दिवस कोणीही कोणाच्या खोलीतसुद्धा जायचं नाही!

विक्रमादित्य : (उद्वेगाने) याला काय अर्थय? निर्बंध कडक असतील, पण सगळं सुरू राहील. सगळं सुरु राहील, पण लोकांनी घराबाहेर पडू नये! घाबरुन जाण्याचं कारण नाही, पण लोकांनी गर्दी करु नये! बस, गाड्या, रिक्षा, टॅक्‍सी सुरु राहील, पण उगीचच हिंडू नये! निर्बंध कडक आहेत, पण सगळं उघडं आहे! सगळं उघडं असलं म्हणून जमाव करण्याचंही कारण नाही! रात्री आठपर्यंत सगळं उघडं आहे, पण दुकानंबिकानं बंद राहतील... (कळवळून) अरे भाई, कहना क्‍या चाहते हो?

उधोजीसाहेब : (खचून खाली बसत) ते मला तरी कुठं धड समजलंय बाळा?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com