esakal | ढिंग टांग : गुढी पाडवा आणि मीटिंगा!

बोलून बातमी शोधा

dhing tang

सकाळ झाली. गुढी पाडवा उजाडला. मोरूचा बाप मोरूला म्हणाला, ‘‘मोऱ्या लेका, आडवा पडून घोरतोस काय? उठ, अंघोळ कर! आज तरी साबण लागू दे अंगाला…

ढिंग टांग : गुढी पाडवा आणि मीटिंगा!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

सकाळ झाली. गुढी पाडवा उजाडला. मोरूचा बाप मोरूला म्हणाला, ‘‘मोऱ्या लेका, आडवा पडून घोरतोस काय? उठ, अंघोळ कर! आज तरी साबण लागू दे अंगाला… अरे, आज गुढी पाडवा! जनलोक केव्हाच बाहेर पडले! ते पहा...’’ त्यावर मोरूने पांघरुण डोकीवरुन अधिकच घट्ट ओढले आणि मंद सुरात तो घोरु लागला. ते पाहून मोरुचा बाप दोनदा रेबीजची लस टोचल्यासारखा चवताळला. या दिवट्याने घेतलेले पांघरुण खसकन ओढुनु, त्यास बखोट धरुनु न्हाणीघरात कोंबुनु ठेवावे, असा इसाळ त्यास आला. परंतु, यातील काहीही न करता तो नुसताच अस्वस्थपणे चुटक्या वाजवीत राहिला. ‘‘मोऱ्या, उठ की रे! अरे, आज गुढी पाडवा! चक्का आणावा, त्याचे श्रीखंड करावे! हलवायाकडून साखरेच्या गाठ्या, शेजारच्या अंगणातील कडुलिंबाचे टहाळे असे निगुतीने आणावे! चांगलेले जरीवस्त्र काढून ते धुणे वाळत घालावयाच्या काठीस लावून त्याची गुढी करावी. तीजवर उलटा चंबू ठेवावा! हे सारे करण्याऐवजी, पाण्यात पडलेल्या म्हशीसारखा तो अंथरुणात लोळत का पडलाहेस?’’ मोरूच्या बापाने एका दमात पुढील पिढीकडून अपेक्षा व्यक्त केली,व तो दमून खुर्चीत बसला.

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
तेवढ्यात दबक्या आवाजात आकाशवाणी झाल्याप्रमाणे खोलीत आवाज घुमला. तो पांघरुणातील मोरूचा होता. तो म्हणाला : ‘‘बाप हो! तुमची अपेक्षा व्यर्थ असून ती पुरी करण्यात तरुण पिढीचे मुळीच हित नाही! किंबहुना, त्यात अहितच आहे! झोपेमुळे निर्बंधांचे आपापत: पालन होते, आणि विषाणूची साखळी मोडावयास साह्य होते! उलटपक्षी चक्का अथवा रेडिमेड श्रीखंड आणावयास बाजारात गेलेल्यास लागणीचे भय असते! तेव्हा मजला सुखाने झोपू दे कसे?’’ मोरूच्या बापाला काय बोलावे हे कळेना. तो हैराण झाला.

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
‘‘मग गुढी पाडवा साजरा करूच नये? परंपरा नावाची काही गोष्ट आहे की नाही?’’ आळसोंड्या पोरट्याच्या अंगावर ओरडण्याचे सत्कर्म करीत मोरूचा बाप करवादला.
‘‘बाप हो! परंपरा दुय्यम आहे! मानवी जीव सर्वोपरी आहे! आणि मीटिंगा हाच विषाणूविरुध्दच्या लढाईचा एकमेव खात्रीशीर मार्ग आहे! ही वेळ सणासुदीची नसून मीटिंगांची आहे! जगातील सर्व युद्धे मसलतीवरच जिंकली गेली आहेत, हे लक्षात घ्या!’’
पांघरुणाच्या आडून मोरूने आपल्या बापांस ज्ञानामृत पाजिले. त्याचे बळे बळेच सेवन करावे लागलेला मोरूचा बाप आणखीनच खवळला. ‘‘मीटिंगा कसल्या मीटिंगा? रोजच्या रोज मीटिंगा करून युद्ध साधते होय? प्रभुरामचंद्राने दशानन रावणाशी मीटिंगा केल्या नाहीत, तेथे रामबाणच कामास आला! म्हणूनच अयोध्येत गुढ्या उभारल्या गेल्या. कळले?’’ हवेतल्या हवेत भक्तिभावाने नमस्कार करत मोरूच्या बापाने युक्तिवाद केला.

- राज्यभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘बाप हो! उदईक एक महत्त्वाची मीटिंग ठेवण्यात आली आहे! ती झाली की अधिक झोपावे की उठावे? याचा निर्णय मी करीन! तोवर शुभरात्री!’’ एवढे म्हणून मोरू कूस वळवून घोरु लागला. कानकोंड्या झालेल्या मोरूच्या बापाने त्यास गदागदा हलवण्याचा इरादा सोडून दिला. म्हणाला, ‘‘कसली डोंबलाची मीटिंग? मीटिंगा करून का कोणी विषाणूवर विजय मिळवील?’’

‘‘बाप हो! उद्या खुद्द विषाणूसोबतच फायनल मीटिंग आहे! कां की, तेवढीच एक मीटिंग बाकी राहिली आहे! ईश्वरेच्छा बलियसी!’’ एवढेच मोरू म्हणाला. त्याच्या घोरण्याची पट्टी बदलली. हतबुद्ध होत्सात्या मोरूच्या बापाने थोडे सॅनिटायझर घेतले व तो मुकाट्याने हात चोळू लागला.