ढिंग टांग : ..सारं काही एकनिष्ठ मावळ्यासाठी

महालाच्या अंत:पुरात राजाधिराज उधोजीमहाराज येरझारा घालत आहेत. मधूनच हवेत तलवारीचे वार काढल्यागत हातवारे करीत आहेत.
Dhing Tang
Dhing TangSakal
Summary

महालाच्या अंत:पुरात राजाधिराज उधोजीमहाराज येरझारा घालत आहेत. मधूनच हवेत तलवारीचे वार काढल्यागत हातवारे करीत आहेत.

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे बुद्रुक.

महालाच्या अंत:पुरात राजाधिराज उधोजीमहाराज येरझारा घालत आहेत. मधूनच हवेत तलवारीचे वार काढल्यागत हातवारे करीत आहेत. भाला खुपसल्यागत पवित्रा घेत आहेत, आणि कुणी बघत नाही, असे पाहून पुन्हा येरझारा कंटिन्यू करीत आहेत. अब आगे…

उधोजीराजे : (करड्या सुरात) कोण आहे रे तिकडे?

संजयाजी फर्जंद : (लगबगीने येऊन मुजरा करत) मुजरा महाराज! आम्ही आहोत!!

उधोजीराजे : (एक भिवई वर चढवत) आम्ही? स्वत:ला आदरार्थी आम्ही म्हणो लागलात? दौलतीचे स्वामी आम्ही, तुम्ही कवण?

संजयाजी : (खांदे उडवत) आदरार्थी नव्हे, अनेकवचनात बोललो! दोन-दोन पार्ट्यांचं काम बघावं लागतं आम्हाला!

उधोजीराजे : (दुर्लक्ष करत) खामोश! गुप्त कामगिरीची सर्व तयारी झाली?

संजयाजी : (खात्री देत) काळजीचं कारण नाही! सगळ्या कोंबड्या व्यवस्थित टोपलीखाली झाकल्या आहेत! कोल्हा येवो, बिबट्या येवो, कोणीही येवो! कोंबडीच काय, अंडंसुद्धा नाही हाताला लागणार!

उधोजीराजे : (कवतिकानं) तसे तुम्ही आहातच हुशार! उगाच का तुम्हांस फर्जंद केलं?

संजयाजी : पेडर रोडवाले मोठे साहेबही हेच बोलले परवा!

उधोजीराजे : (गोरेमोरे होत) कामगिरी तडीला न्या म्हंजे झालं! मग मारा गमज्या!! कोंबड्या झाकल्या म्हणे! फू:!! आम्ही पक्ष चालवतो की पोल्ट्री फार्म, आं? आपल्याच पक्षाच्या शिलेदारांना कोंबड्या म्हणतोस? कालपरवापर्यंत घोडेबाजार म्हणत होतास…

संजयाजी : (खुलासा करत) मी उपमा दिली महाराज!

उधोजीराजे : (गोंधळून) एक मिनिट!..मघाशी कोंबड्या म्हणालास, आता उपमा कुठून आला?

संजयाजी : (अजिबात पत्रास न बाळगता) कोंबड्याच त्या आन काय!...कुणी बॉयलर, कुणी गावरान, कुणी कडकनाथ कुणी इंग्लिश!! वैऱ्याची रात्र आली झाकाव्याच लागतात!!

उधोजीराजे : (नाइलाजाने मान डोलावत) तुमच्यासमोर आम्ही इतकी पड का खातो? कळत नाही! जाऊ दे! कामगिरीत ढिलाई उपेगाची नाही, हे लक्षात ठेवा ! कडेकोट बंदोबस्त ठेवा! मुंगीयेस शिरकाव साधण्यास वाव उरता कामा नये! आपले सरदार- दरकदार गडकोटात स्थानबध्द करोन सर्व दरवाजांना अडसर घाला! येकावर येक सात कुलपे घाला! हरेक दरवाजावर दोनशे मावळा डोळियांत तेल घालोन नामजाद करा! कोणी पळ काढण्याचा यत्न केल्यास त्याची गठडी वळुनु पोत्यात घालुनु उलटा टांगुनु…(पुढले काही न सुचून) जमेल ती कार्यवाही करा!

संजयाजी : (निर्विकारपणे) आपल्या लोकांना आधीच आपण पोत्यात…आय मीन…टोपलीत घालून ठेवलंय, महाराज!

उधोजीराजे : (ताडताड पावलं टाकीत) टोपल्या सुरक्षित करा!! दगाफटका होता कामा नये! फंदफितुरी हा मऱ्हाटी दौलतीला लागलेला पूर्वापारचा शाप आहे! या मऱ्हाटभूमीत कोंबडीचोरांचा काही भरवसा नाही! (सावधपणाने) गनिमाच्या गोटातून काय खबर?

संजयाजी : गनिमानंही तेच केलंय महाराज! त्यांनीही आपल्या कोंबड्या फाइव स्टार खुराड्यात गपचीप कोंडून ठेवल्यात!

उधोजीराजे : (चाणाक्षपणे) आपल्या मित्रपक्षांच्या गोटात काय हालचाली सुरु आहेत?

संजयाजी : (बेफिकिरीनं) काय आयडिया नाही बुवा!!

उधोजीराजे : (छद्मीपणाने) अस्सं?

संजयाजी : (ठणकावून) अगदी अस्संच!...सर्व जय्यत तयारीत खडे आहेत, महाराज!

उधोजीराजे : (कपाळाला मूठ लावत) जगदंब जगदंब! आमची धडपड सार्थकी लागो, म्हंजे मिळवली! शेवटी एवढं सगळं कोल्हापूरच्या एका कट्टर, एकनिष्ठ मावळ्यासाठी चाललंय, हे महाराष्ट्रानं लक्षात घ्यावं!! हर हर महादेव!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com