ढिंग टांग : आता उठवू सारे रान...!

मातोश्री हाइट्‍स, वांद्रे. वेळ : सकाळची कोवळी उन्हे.
Dhing Tang
Dhing TangSakal
Updated on

स्थळ : मातोश्री हाइट्‍स, वांद्रे. वेळ : सकाळची कोवळी उन्हे.

चि. विक्रमादित्य : (दार ढकलून खोलीत शिरत) हाय देअर, बॅब्स…गुड मॉर्निंग!

उधोजीसाहेब : (ममतेनं) शुभ सकाळ म्हणावं, मुला! तुलाही सकाळच्या शुभेच्छा हं!

विक्रमादित्य : (गोंधळून) बॅब्स, आर यु ओके? काही होतंय का? कुछ लेते क्यूं नहीं?

उधोजीसाहेब : (मऊ मेणाहुनी...) नाही रे बाळा! मी अगदी ठीक आहे, काळजी करु नकोस हं! बस ना, उभा का?

विक्रमादित्य : (नखशिखांत हादरुन) बॅब्स, मी…मी…मी कोणाला तरी बोलावू का?

उधोजीसाहेब : (दिलासा देत) नको रे बाळा! मला काहीही झालेलं नाही! उगीच कोणाला कशाला त्रास द्यायचा?

विक्रमादित्य : (रडकुंडीला येत) कालपासून तुम्ही असंच वागताय!

उधोजीसाहेब : (पिकलेल्या मिशीत हसून) असं म्हणजे कसं?

विक्रमादित्य : (खांदे उडवत) आय डोण्ट नो, पण काहीतरी विचित्र वागताय! ताडोबाच्या जंगलात फिरताना एखादा पट्टेदार वाघ आरामात लस्सी पीत बसलाय, असं दिसलं तर काय होईल? तसंच काहीतरी!!

उधोजीसाहेब : (कळवळून) नको रे ते वाघबिघ! त्या गर्जना नकोत, कोथळे, खंजीर, आईचं दूध, औरंग्याची औलाद, गद्दार, खुद्दार, मर्दमावळा... काही काही नको!! ते सगळं मी मागे सोडून पुढे आलो आहे!!

विक्रमादित्य : (चक्रावून) पुढे म्हंजे नेमकं कुठे?

उधोजीसाहेब : (निर्धाराने) मला क्रांतीची पावले दिसू लागली आहेत! तिच्या पावलांची चाहूल लागली आहे! आता खरीखुरी क्रांती घडणार! आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान...

विक्रमादित्य : (हतबलतेनं) ...काल एमआयजी क्लबमध्ये त्या समाजवादी साथींसोबत मीटिंग करुन आलात, आणि तुमचं हे…हे…हे…असं झालंय, बॅब्स!

उधोजीसाहेब : (स्वप्नाळूपणाने) महाराष्ट्रात आता समाजवादी क्रांती घडणार! आणि पहिला क्रांतिकारक म्हणून मी सर्वांच्या पुढे असणार!!

विक्रमादित्य : (आश्चर्याचा धक्का बसून) काय सांगताय काय?

उधोजीसाहेब : (दुर्लक्ष करत स्वप्नामध्ये रमून जात…) समाजवादी साथींनी माझं नेतृत्त्व स्वीकारलंय! सानेगुरुजी, एसेम, मधु दंडवते, मधु लिमये, मृणालताई…आणखी किती नावं घेऊ? त्या दिग्गजांच्या यादीत माझंही नाव समाविष्ट होणार!!

विक्रमादित्य : (निरागसपणे) आपल्या पक्षाचं नाव आता समाजवादीसेना असं ठेवणार ना, बॅब्स?

उधोजीसाहेब : (तत्त्वज्ञवृत्तीने) नावात काय आहे? क्रांती महत्त्वाची! पुन्हा एकदा रान उठवायचं…ती कलापथकं, ते वसंत बापट आणि लीलाधर हेगड्यांचे पवाडे, गाणी! तशीच क्रांती पुन्हा घडवून आणायची! आपल्या समाजवादी साथींकडे विचार आहे, आपल्याकडे केडर आहे! केडर असेल तर मग डर कशाला?

विक्रमादित्य : (बुचकळ्यात पडून) मग ते फडतूस, गद्दार, दळभद्री…वगैरे यापुढे काहीही बोलायचं नाही?

उधोजीसाहेब : (विलक्षण मृदूतेने नकारार्थी मान हलवत) त्यांना का मन नाही? त्यांना का भावना नाहीत? त्यांना का हृदय नाही!!

विक्रमादित्य : (हृदय पिळवटून) बॅब्स, आता मला रडू येतंय!!

उधोजीसाहेब : (सांत्वन करत) रडू नकोस बाळ! रात्र वैऱ्याची आहे! आता रडायचं नाही, लढायचं! समाजवादी परिवारातले एकवीस पक्ष आज आपल्या मागे ठामपणाने उभे आहेत!

विक्रमादित्य : (अविश्वासाने) इतके पक्ष खरंच आहेत? मला कल्पनाच नव्हती…

उधोजीसाहेब : (खुदूखुदू हसत) मलाही नव्हती! मलाच काय, समाजवादी साथींनाही कल्पना नव्हती!!

विक्रमादित्य : (च्याटंमच्याट पडत) मग आता त्या कमळाबाईचं काही खरं नाही…नै?

उधोजीसाहेब : (नाव उच्चारताक्षणी स्फोट होत) मरो ती कमळाबाई!...आमच्या मागे इडीची पीडा लावणारे नतद्रष्ट लेकाचे, विश्वासघातकी, महाराष्ट्रद्रोही…हिंदुत्ववादी कार्टी!!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com