ढिंग टांग : ...चालते व्हा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang

‘खामोश!’’ शिवाजी पार्काडाच्या परिसरात एक दमदार आरोळी दुमदुमली.

ढिंग टांग : ...चालते व्हा!

‘खामोश!’’ शिवाजी पार्काडाच्या परिसरात एक दमदार आरोळी दुमदुमली. वळचणीची पाखरे (पक्षी : कबुतरे! मुंबईत पाखरे ही येवढीच!) भर्रदिशी आस्मानात उडून झर्रदिशी परत खाली येऊन बसली. शिवाजी पार्काडाच्या परिसरात उगीचच हिंडणाऱ्या रहिवाशांनी (हेही खूप आहेत!) निमूटपणे आपापल्या घरी जाऊन ‘आज जेवायला काय आहे? कोबीची भाजी का? व्वा’ एवंच सुसंवाद प्रस्थापित केला. प्रसंग पडला तर माणसाला कोबीची भाजीही चवीने खावी लागते. (खुलासा : खवय्यांनी आपापल्या आवडीनुसार भाजी घ्यावी! आम्ही कोबी घेतली येवढेच!) सर्वत्र सामसूम जाहले. ‘शिवतीर्था’वर हवा तापली होती. तेथील गस्तीवरील नवनिर्माणसैनिकाने दुसऱ्यांस ‘सेक्शन गरम असल्या’ची खबर सांकेतिक भाषेत दिली.

‘खबर्दार एक शब्द अधिकउणा बोलाल तर...गाठ माझ्याशीयाय!,’’ साहेब कुणावर इतके भडकले होते? डोळियांतून अंगार पेटला होता. मुठी वळल्या होत्या. जवळपास एखादे धारदार हत्यार असते, तर अनवस्था प्रसंग ओढवला असता. साहेबांच्या जमदग्नी अवताराने संपूर्ण महाराष्ट्र गर्भगळीत जाहला होता...

‘अरे, तुम्हांस पदाधिकारी केले कोण्ही? आम्ही केले! नवनिर्माणाच्या शपथा दिल्ह्या कोण्ही? आम्ही! मग आमचाच अधिक्षेप कसा करता? चालते व्हा!,’’ साहेब जाम म्हंजे जाम भडकले होते.

...‘शिवतीर्थ’गडावरले वातावरण अधिकच गंभीर जाहले. तरी बरे, या गडास टकमकटोंकासारखा येखादा बेलाग कडा नाही. अन्यथा...जाऊ दे. साहेब कोणाला तरी झाप झाप झापत आहेत, येवढी खबर बाहेर फुटली. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी बंद दाराआड होत असणार, हे ओळखावयास वेळ लागला नाही. साहेबांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना जोडे हाणले, ही बातमी ब्रेकिंग न्यूज होऊ शकते, हे ओळखून च्यानलांचे क्यामेरे कान भिंतीला लावून उभे राहिले. पण बंद दाराआड काय चालले आहे, याचा महाराष्ट्रात आजवर कोणांस पत्ता लागला आहे? असो.

‘हा पक्ष आम्ही स्थापिला! आम्हीच त्यायोगे महाराष्ट्राचे नवनिर्माण घडवण्याचे स्वप्न पाहिले! या इथेच...कित्येक मनसुबे रचले. गनिमांच्या जुलमी राजवटीचे प्रतीक ठरलेल्या टोलनाक्यांना जमीनदोस्त करण्याची मोहीम येथेच रचिली!इथेच ‘खळ्ळखट्यॅक’चा नारा घुमला! त्या मोहिमांमध्ये आम्हाला साथ मिळाली ती पृथ्वीमोलाच्या सवंगड्यांची! आणि तुम्ही? तुमचे हात केळी खावयास गेले काये?,’ साहेब ताडताड वाक्ताडन करत होते. शब्दांच्या ठिणग्या उसळत होत्या.

इतक्या की शिवाजी पार्काडात वणवा लागल्याचा फोन कुणीतरी थेट फायर ब्रिगेडला केला! मुंबईत वणवा? क्षणभर च्याट पडून त्या मुंबईकर फायर ब्रिगेडवाल्यांनीही ‘बरं बरं, पाठवतो टँकर’ असे सांगून हातातले केळे संपवले. असो.

‘गेले कित्येक वर्ष मी पक्षबांधणी करतो आहे, नवनवे कार्यकर्ते शोधतो आहे, महाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी खंदे सैनिक ढुंढतो आहे...आणि तुम्ही? मी दिलेला साधा कार्यक्रम राबवता येत नाही तुम्हाला?’’ साहेब बोलत होते. मनातली तळमळ व्यक्त करत होते. ती दुखरी वेदना पाहून प्रत्यक्ष सह्याद्रीचे मन कळवळले असेल...

‘गेले काही दिवस मी गप्प आहे...घशाला आराम देतोय! पण याचा अर्थ तुम्ही हातावर हात बांधोन बसावे, असा होतो काय? बोला, बोला, आता का दातखीळ बसली?,’’ साहेब कडाडले. सारे काही चिडीचूप होते. एका कार्यकर्त्याने अखेर हिय्या करुन दाराच्या फटीस डोळा लावलाच!-

‘माझे ऐकायचे नसेल तर आत्ताच्या आत्ता चालते व्हा!,’’ साहेब कडाडले. पाखरे (पक्षी : कबुतरे हो!) अस्मानात उडाली. बस, कार्यकर्त्याला एवढेच दिसले. इति.