ढिंग टांग : आ...रा…रा…रा…राफेल!

बेटा : (नेहमीपेक्षा दुप्पट उत्साहात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण! मम्मा, आयम बॅक!!
ढिंग टांग : आ...रा…रा…रा…राफेल!
Updated on

बेटा : (नेहमीपेक्षा दुप्पट उत्साहात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण! मम्मा, आयम बॅक!!

मम्मामॅडम : (पक्षकार्याचे दस्तऐवज चाळण्यात व्यग्र स्वत:शीच…) हंऽऽ…अशी भानगड आहे तर…

बेटा : (कुतुहल चाळवून) कसली भानगड?

मम्मामॅडम : (स्वत:शीच) अडलंय आमचं खेटर! मुळ्ळीच कमी करणार नाही किंमत!!

बेटा : (कुरकुरत) कमॉन मम्मा! कसल्या भानगडीचे कागद चाळते आहेस?

मम्मामॅडम : (तंद्रीमध्येच…) गेले उडत!

बेटा : (चुटकी वाजवत) राफेल ना? गेले उडत म्हटल्याबरोब्बर मी ओळखलं! राफेलच असणार! अखेर मी खरा ठरलो! भानगड निघालीच बाहेर!!

मम्मामॅडम : (अखेर लक्ष जात)ओह, तू कधी आलास? भूक लागली असेल तर फ्रीजमध्ये...

बेटा : (घाईघाईने) इनफॅक्ट मी फ्रान्सला जाऊन येण्याचा विचार करतो आहे!!

मम्मामॅडम : (दचकून) पुन्हा परदेश दौरा? एकदा गेलास की महिना महिना येत नाहीस! सगळ्यांना उत्तरं देत बसावं लागतं मला!!

बेटा : (दुर्लक्ष करत) त्या राफेल विमानात काहीतरी पाणी मुरतंय खास! स्वत: जाऊन काही तहकिकात करावी असं वाटायला लागलंय!

मम्मामॅडम : (सुस्कारा सोडत) राफेलच्या भानगडीत तू न पडलेलंच बरं! त्यात काहीही गैरव्यवहार झालेला नाही, असा निर्वाळा दिलाय सगळ्यांनी! उलट आपल्याच काळात ६५ कोटींची दलाली दिल्याचा नवा आरोप झालाय! लेने के देने पड जाएंगे! उगीच विषाची परीक्षा नको!!

बेटा : (निरागसपणे) असं कसं? आपल्या काळात कुठे होती राफेल विमानं? काहीही सांगतात! याच कमळवाल्यांनी घोटाळा केल्याचे पुरावे फ्रान्सच्या एका मीडियापार्ट नावाच्या संकेतस्थळावर दिले आहेत! मी त्याच मीडियाचा पार्ट आहे!!

मम्मामॅडम : (थंडपणे) त्याच संकेतस्थळावर आता आपल्यावर शेकवलंय प्रकरण!! ही दलाली यूपीएच्या काळातच दिल्याचं सांगताहेत मेले!!

बेटा : (ठामपणाने) इंपॉसिबल! काहीही खोटं छापतात लेकाचे!! हा काय मीडिया आहे? पार्ट नि पार्ट सुटा करुन ठेवीन!! सगळे विकले गेले आहेत!!

मम्मामॅडम : (बजावून सांगत) शिवाय मागल्यावेळेला राफेल प्रकरणाचा आपल्याला काहीही फायदा झाला नव्हता, हे लक्षात ठेव!

बेटा : (भूतकाळात रंगून जात) कसलं घाबरवलं होतं मी त्यांना! हाहा!!

मम्मामॅडम : पुन्हा तुझं ते ‘चौकीदार चोर है’ नको हं! एकदा माफीवर भागलं, तेवढं पुष्कळ झालं!!

बेटा : (सपशेल दुर्लक्ष करत) मी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलंय! डरो मत, थको मत, रुको मत! जब तक सच अपना साथी है, तबतक लडते रहेंगे!! ‘ट्विटर’वर टाकलंय मी!!

मम्मामॅडम : (कपाळाला हात लावत) तो ट्विटरचा टिवटिवाट काय कामाचा?

बेटा : (दर्पोक्तीने) एक दिन ट्विटर की चिडियाही गरुड बनते हुए दिखाई देगी, मम्मा! तुम देखते रहना!! बस, कुछ और समय की बात है, यह जनता अपने आपही मोदीजी की सरकार को उठाकर फेंक देगी!!

मम्मामॅडम : (सबुरीचा सल्ला देत) जे काही करायचंय ते जपून करा, म्हंजे झालं!! मागल्या खेपेसारखं माफीची वेळ आली नाही म्हंजे मिळवलीन! हल्ली माफीवर भागत नाही, छापेच टाकतात ते!!

बेटा : (स्वत:वर खुश होत) शेवटी माझंच खरं ठरलं! राफेलमध्ये पाणी मुरतंय हे मी आधीपासूनच सांगत होतो! ते त्यांच्या काळात असो किंवा आपल्या काळात! शेवटी भानगड निघालीच! हो की नाही?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com