ढिंग टांग : पक्षी-सप्ताह : एक ‘पक्षीय’ दृष्टिकोन! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : पक्षी-सप्ताह : एक ‘पक्षीय’ दृष्टिकोन!
ढिंग टांग : पक्षी-सप्ताह : एक ‘पक्षीय’ दृष्टिकोन!

ढिंग टांग : पक्षी-सप्ताह : एक ‘पक्षीय’ दृष्टिकोन!

सर्वप्रथम बिलेटेड हॅप्पी बर्ड डे टु आमचे डिअर चितमपल्लीसाहेब! गेला आठवडा ‘पक्षीय’ आठवडा म्हणून साजरा झाला. आठवडाभर प्रचंड काम पडले. पाहुण्यांची रेलचेल होती. दरवर्षी पाच ते बारा नव्हेंबर या काळात महाराष्ट्रामध्ये पक्षी सप्ताह आयोजित करण्यात येतो. पक्ष्यांशी संबंध असला तरी याचा राजकारणाशी मात्र काहीही संबंध नाही. आमचे परममित्र आणि ऋषितुल्य मा. चितमपल्लीसाहेबांचा पाच नव्हेंबरला वाढदिवस असतो,

आणि त्यांचे परात्पर गुरु मा. डॉ. सलिम अली यांचा १२ नव्हेंबरला. या दोघांच्या ‘बर्थ डे’ची दोन टोके धरुन आपल्या (सवयीने ‘माझ्या’ म्हणणार होतो! किंबहुना जवळजवळ म्हटलेच…) महाराष्ट्रात ‘बर्ड वीक’ साजरा केला जातो. मी एक ‘यलो क्राऊण्ड वूडपेकर’ म्हंजेच ‘मराठा सुतार’ पक्षी आहे. (हे खरोखर माझे नाव आहे!) हरियाल किवा होला नावाचे एक बारके कबुतर सध्या महाराष्ट्राचा राज्य पक्षी म्हणून सिलेक्ट झाला असला तरी आमचे स्टेटस वेगळे आहे.

पक्षीसप्ताहाच्या निमित्ताने आमच्या जंगलात विविध कार्यक्रम पार पडले. हौशी पक्षीमित्रांच्या अनेक सहली आल्या. त्यांना सुतार पक्षी झाडाचे खोड कसे टोकरतो, याचे प्रात्यक्षिक दाखवण्याचे काम माझ्याकडे सोपवण्यात आले होते. सध्या चोच भयंकर दुखत आहे. ‘चोच बर्फाने शेका, आत्ता थांबेल’ असा सल्ला हरियाल ऊर्फ होल्याने दिला. पण आम्हाला कुठला बर्फ? आणि कोण आम्हाला मऊ भात खिलवणार? जाऊ द्या…चितमपल्लीसाहेबांकडेच तक्रार गुदरायला हवी.

चितमपल्लीसाहेबांना आम्ही (पाहिजे तर) नाचूनही दाखवू…कारण ते आमचे आहेत!! पण बाकी हौशी पक्षीमित्रांचे मनोरंजन करण्यात आमची चोच जायबंदी झाली. आठवडाभर पक्षी सप्ताह चालू आहे. आज संपेल! या निमित्ताने आमच्या जंगलात खूप मानवप्राणी आले होते. दुर्बिणी, बूट, बर्म्युडा आदी सामग्रीनिशी जंगलात दाखल झालेले मानवांचे कळप जंगलात शिरुन पक्षीनिरीक्षण करुन निघून गेले. इडल्या, सँडविचच्या वासाने डोके उठले होते. ही माणसे डब्यातून असले पदार्थ (जंगलात) का आणतात? अशाने एक दिवस एखादा उडपी ऐन जंगलात डोश्याचे तवे लावेल!! आणि कुणीतरी पावभाजीची गाडी लावेल. अशाने पक्ष्यांचे विश्व कसे वाचणार? एका हौशी पक्षीमित्राने मला सँडविचचा तुकडा देऊ केला, तेव्हा, दुसऱ्या एका पक्षीमित्राने त्याला अडवले. म्हणाला, ‘‘ सँडविच हे सुतार पक्ष्याचे अन्न आहे का? नाही! तो आळ्या आणि किडे खातो. (हे साफ खोटे आहे! आम्ही फक्त बुधवारी आणि रविवारी आळ्या खातो!!) त्याला सँडविच देणं गैर आहे!’’ चार-सहा टोचा त्या पक्षीमित्रालाच माराव्यात अशी उबळ आली होती. संतापाच्या भरात मी बरीच झाडे टोकरल्याने पक्षीमित्रांनी माझे खूप फोटोबिटो काढले. हरियाल पक्ष्यांनी थव्या थव्याने येऊन बराच भाव खाऊन दाखवला. मला मुळात कबुतरे- मग ती कुठलीही असोत- फारशी पसंत नाहीत. अतिशय लोचट आणि निर्लज्ज जात आहे!!

पक्षीमित्रांचे कळप जंगलभर फिरत होते. पक्षी दिसला रे दिसला की दुर्बिण रोखून त्याचे नाव (चितमपल्लीसाहेबांच्या किंवा सलीम अलींच्या पुस्तकातून) हुडकून काढायचा सपाटा लागला होता. त्यात अनेक पक्ष्यांची नावे बदलली,असे कळते! पुढल्या वर्षी काहीतरी नीट नियमावली करावी, असे पर्यावरणमंत्र्यांना सुचवणार आहे. आपले पर्यावरणमंत्री पेंग्विनप्रेमी आहेत. पर्यावरणाच्या बाबतीत तरी दृष्टिकोन ‘सर्वपक्षीय’ असावा, असे वाटते.

जय महाराष्ट्र.

loading image
go to top