esakal | ढिंग टांग : पुरानी हवेली!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang

ढिंग टांग : पुरानी हवेली!

sakal_logo
By
-ब्रिटिश नंदी

ध्रुवतारा समोर ठेवून, चाला सरळ रेष

तेव्हा सुरु होतो आमचा लाडका उत्तरप्रदेश

उत्तरेतल्या विशाल मुलखात दूधदुभते, ऊस

देवादिकांच्या भूमीमध्ये, वेगवेगळे उरुस

लेकुरवाळया यूपीमध्ये होती मस्त हवेली

जणू भरल्या घरामध्ये सून नवी-नवेली

सवती-सुना, जावा-नणंदा, थोरल्या वन्सबाई

थोरली पाती, धाकली पाती, ऐतोबा जमाई

जमीनदाराच्या हवेलीमध्ये मोठा बारदाना

शंभर पानं रोज उठतील एवढा भटारखाना!

भला गोठा परसदारी, त्यात गायवासरु

जाफराबादी म्हैशींची धार काढणं सुरु

शेतशिवारात राबण्यासाठी चार बैलजोड्या

पैपाहुणे येजा करती, पंप मोटारगाड्या

नोकर चाकर, घोडागाडी, टांगा ऐसपैस

चौसोपी वाड्यामधले खानदान आहे रईस

डौलदार नक्षीचे उंच चोवीस खांब

टोपीवाला दरवान सांगे, अबे थोडा थांब!

वळणदार जिने जातात गोल दोन मजले

संगमरवरी सज्जामध्ये संगीत मसाज चाले

हुकूम आडवे बाजेवरती, चेले आसपास

मसाज चालू असताना न्याय देतात खास

जमीनदाराला म्हणती ‘हमारे बाहुबली!’

डोळे मिटून आज्ञा, ‘‘बंदे को मारो गोली’’

हवेलीचा मालक असला, होता तालेवार

आसपासच्या गावांमधला मोठा जमीनदार

दहा हजार एकर शेती, येतंय महामूर पीक

शेकडो पोती धान्यधुन्य नाही कमी अधिक

दारापुढे हत्ती झुले, तबेल्यात अरबी घोडे

जमीनदारापुढे साऱ्यांची तारांबळ उडे

बारोमास सुगी नांदे, भरुन वाहे खळं

शेतामध्ये राबत होती, हजारभर कुळं

बाहुबलीचा चाले शिक्का, बडा किंगमेकर

ज्याच्या हाती सत्ता त्याचे तगडे लावलष्कर

एक दिवस अचानक, उल्टं सुल्टं झालं

नशिबाचे फिरले वासे, होतं नव्हतं गेलं

भिंत खचली, खांब ढळले, चूलही मुकी

भरलं घर उजाड झालं, सगळं फुकाफुकी

कायद्यात जमिनी गेल्या, नोंदी सातबारा

तलाठ्याची बुद्धी फिरली, वाजले की बारा

काप गेले, उरली भोकं, घर पोकळ वासा

थंड चुलीपुढति आता उगीच बघत बसा

जमीनदार हल्ली हल्ली असतो गमगीन

म्हणतो मनाशीच की माझी हाय जिमिन!

जिथं फुलं वेचली तिथं वेचतो गोवऱ्या

बसल्याने पायात येतात मुंग्या धावऱ्या

जमीनदार होता त्याचा, झाला गणपत वाणी

बिड्या फुकत म्हणतो दिवाळ्याची गाणी

loading image
go to top