
ढिंग टांग : म. फ्या. डॉ. : एक क्लिनिकल ओळख!
उपरोक्त शीर्षक उद्धटपणाचे आहे, असे कोणी म्हणेल. ‘महाराष्ट्राचा’ नव्हे, तर ‘महाराष्ट्राचे’ फ्यामिली डॉक्टर असे म्हणायला हवे! आदर किंवा शिष्टाचार नावाची काही गोष्ट आहे की नाही? पण बरं का माझ्या भावांनो, भगिनीनों, आणि मातांनो, इथे आदरभावापेक्षा आपुलकी ज्यास्त आहे हे लक्षात घ्या. देवाला आणि मित्राला आपण एकेरीभावानेच हांक मारतो की नाही? तसेच.
कुटुंबात डॉक्टर असला की बरे पडते. आजारपणाची बिले देण्याची कटकट वाचते. घरातच डिस्पेन्सरी असल्याने पेशंटही घरचाच, आणि डॉक्टरही घरचाच! व्हिजिट फीचा ताप नाही. (खुलासा : येथे ताप हा मनस्ताप याअर्थी घ्यावा.) महाराष्ट्राचे सुदैव असे की, घरात जागतिक कीर्तीचा डॉक्टर जन्मां आला. आता महाराष्ट्रास दीर्घायुरारोग्य लाभणार हे सांगावयास कोणा भविष्येवेत्त्याची गरज का आहे? मुळीच नाही. महाराष्ट्राच्या फ्यामिली डॉक्टरांची प्राक्टिस अमूप आहे. पेशंट खुर्च्यांवर बसून असतात. नंबर पुकारला की आत जातात, हसत हसत बाहेर येतात! पार्टिशनच्या पलीकडे कंपाऊण्डर बसलेला असतो. त्याचा चेहरा कोणीही अद्याप पाहिलेला नाही, पण बरेच पेशंट त्या कंपाऊण्डरकडूनच औषधे परस्पर नेतात, म्हणे! ‘फ्या. डाँ.’चा कंपाऊण्डरसुद्धा धन्वंतरीच असणार यात संशय तो काय?
बाहेरील राज्यांकडे इतका हुशार फ्यामिली डॉक्टर नसल्याने त्यांची फार्फार पंचाईत होते. बाहेरील राज्येच कशाला? खुद्द केंद्र सरकारच महाराष्ट्राचा हेवा करते! त्यांच्याकडे एक डॉ. हर्षवर्धन म्हणून आहेत, पण ते इम्युनिटी वाढवायला ‘काढा प्या नाहीतर चाकलेट खा’, असले सल्ले देतात. चाकलेटे खाऊन का कुणी बरे होते? तसे असते, तर कोपऱ्यावरच्या ‘शा. शामजी मुळजी ॲण्ड सन्स- किराणाभुसार व्यापारी’ यांच्याकडे गिऱ्हाईकांची नव्हे, पेशंटांची रांग लागली असती!
महाराष्ट्राच्या फ्यामिली डॉक्टरांना सारे जग मानते. ‘डब्ल्यूएचो’ ऊर्फ जागतिक आरोग्य संघटनेचा तर ‘फ्या. डॉ.’वर कमालीचा विश्वास आहे. अमेरिकेचे वैद्यकीय सल्लागार डॉ. टोनी फौची हे तर त्यांना गुरुसमानच मानतात. परवाच ‘फ्या. डॉ.’ यांनी फौची यांना दिवसातून ‘तीन वेळा वाफ घ्या’ असा फोनवरुन सल्ला दिल्याचे आम्ही ऐकले! खुद्द पंतप्रधानसुद्धा काही दुखले-खुपले तर त्यांनाच पहिला फोन करतात. न्यायाधीशांनासुद्धा त्यांच्या रोगनिदानाचे कौतुक वाटते. नीती आयोगालासुद्धा त्यांच्या वैद्यकीय ज्ञानाबद्दल अचंबा वाटतो. इतकी प्रसिद्धी मिळूनही ‘फ्या. डॉ.’ यांचे पाय (महाराष्ट्राच्या) जमिनीवरच आहेत. त्यांची रुग्णसेवा अहोरात्र सुरु आहे.
होमेपाथी म्हणू नका, आयुर्वेद म्हणू नका, अल्लोपाथी, नॅचरोपाथी, अशा बऱ्याच पाथ्या ‘फ्या. डॉ.’ यांनी अक्षरश: कोळून प्यायल्या आहेत. त्यांना बघून पेशंटांचे निम्मे दुखणे पळून जाते. कित्येक पेशंट तर त्यांनी केवळ दृष्टिक्षेपाने बरे केले आहेत, अशी एक वदंता त्यांच्याच कंपाऊण्डरच्या मुखातून आम्हाला समजली. पेशंटकडे नुसते पेशंटली बघून त्यांना त्याच्या रक्तामधील प्राणवायू (उच्चार : प्राऽऽण वाऽऽ यूऽऽ...!) ओळखता येतो म्हणे! म्हंजे चालता बोलता ऑक्सिमीटरच म्हणा की! नुसत्या नजरेने ते पेशंटाचा एचआरसीटी स्कोर काढून देतात म्हणे... आता बोला!
‘फ्या. डॉ.’ हे एक अग्रणी कोविडॉलॉजिस्ट म्हणून सुविख्यात आहेत. त्यांना आमचे वंदन असो. आम्ही त्यांना हक्काने जीभ काढून दाखवतो, याचा आम्हाला मराठी माणूस म्हणून खूप खूप अभिमान वाटतो. असे ‘फ्या. डॉ.’ सर्वांना मिळावेत, हीच प्रार्थना. इति.
Web Title: Editorial Article Dhing Tang
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..