esakal | ढिंग टांग : गांधारीचे अश्रू!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang

ढिंग टांग : गांधारीचे अश्रू!

sakal_logo
By
-ब्रिटिश नंदी

नगरातील सुनसान रस्ते

चोरुन न्याहाळताना तिला

अनावर कढ आला...

दूरवर स्फोटकांचे ध्वनि

ऐकू येत होते...

सैनिकांच्या उन्मत्त आरोळ्या

आणि घायाळांच्या आकांतात

मिसळून गेलेले किनरे,

असहाय स्त्रीस्वर...

आसुडांच्या फटकाऱ्यांचे,

हस्तींच्या चित्कारांचे,

फुंफाटत फुटणाऱ्या अग्निकाष्ठांचे,

विटंबितांच्या वेदनेचे विविध ध्वनी

तिच्या अंत:करणाच्या

चिंध्या चिंध्या करुन गेले...

अंत:पुरातील अंधारात पावले वाजली...

पडेल खांद्यांचे ओझे कसेबसे

ओढत स्वत: गांधारनरेश सुबल

पराभूत पावलांनी प्रविष्ट झाले...

‘‘कन्ये, अखेर हरलो मी...पूर्णत: हरलो!

कुरुकुलश्रेष्ठ देवव्रताने माझ्यासमोर

धनांच्या राशी ओतल्या, आणि

दुसऱ्या हातात त्याचे ते सुप्रसिद्ध खड्ग...

तो म्हणाला, ‘सुबला, तुझे नाव बदल!

दुर्बल हे ठीक नाव दिसेल!!

गांधारातल्या प्रसिद्ध मेषांप्रमाणे

तूही एक मेषपात्र आहेस,

निमूटपणाने तुझी उपवर कन्या

माझ्या रथात आणून उभी कर,

आणि मग तुझा हा भिकार गांधारदेश,

तुलाच लखलाभ!’

गांधार नगरी कुरुकुलाची

बटिक झाली, गांधारी!

...अगदी माझ्या डोळ्यासमोर!’’

एवढे बोलून सम्राट सुबल

असहायपणे रडू लागला.

आपल्या पित्याच्या खांद्यावर

हात ठेवून गांधारीने हळूवारपणे म्हटले :

‘‘तात, माझ्यामुळे हा संहार थांबणार असेल,

तर मी आनंदाने जाईन त्या देवव्रत भीष्मासह.

तो सांगेल, त्याच्या गळ्यात माळ घालीन.

उतणार नाही, मातणार नाही,

घेतला वसा टाकणार नाही...

तुमचं राज्य अबाधित ठेवीन!’’

आवेगाने सुबल म्हणाला :

‘‘पोरी, तुझा हात तो मागतोय

त्या आंधळ्या धृतराष्ट्रासाठी!

आंधळा पती स्वीकारशील?’’

...गांधारीच्या ओठांवर पसरले

एक चिरंतन कडवट हसू.

मंचकावरल्या वस्त्राची चिंधी

फाडत तिने तत्क्षणी बांधली

डोळ्यांना, आणि म्हणाली :

‘‘घ्या, तात, तुमच्या कन्येला

तरी कुठं डोळे आहेत? यापुढे

ती युगानुयुगे अंधच राहील!’’

...पुढे महाभारत घडले,

अजूनही घडतेच आहे!

गांधारीच्या डोळ्यांवरची

पट्टी ना कधी सुटली,

ना कधी भिजली.

loading image
go to top