Dhing Tang : सक्त-चरित्र! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang
ढिंग टांग : सक्त-चरित्र!

ढिंग टांग : सक्त-चरित्र!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

‘आपुल्या घरात हाल सोसते मराठी’ ही कविवर्य भटसाहेबांची काव्यओळ गुणगुणत तो घराबाहेर पडला, आणि कोपऱ्यावरल्या ओळखीच्या पानवाल्याने प्रश्नार्थक बनारसी पान उचलले, तेव्हा, तो सवयीने म्हणाला : ‘‘चूना कमती! किवाम डालना!’’

बसच्या रांगेत ढकलत ढकलत त्याने कोंबले स्वत:ला, तेव्हा पुढील बाई म्हणाली की, ‘‘मां भैन है के नई? गधा!’’ मागील ढकलंबाज माणूस म्हणाला : ‘‘आगे खिसको ना यार! कित्ती जग्या हय!’’

‘यहां पेशाब करनेवाला गधा है’ असे लिहिलेल्या भिंतीला डावी घालून तो चालत निघाला, तेव्हा अंगठा तुटलेल्या चपलेला खिळा ठोकू पाहणाऱे अनवाणी गिऱ्हाईक ऐकत होते : ‘भाईसाब, नई ले लो! ये तो गई कामसे!’

फूटपाथवरल्या टेंपरवारी बाजारात चष्मिष्ट पिशवीबाज कारकुनाला घमेल्यातले डोळेवटार मासे दाखवत भय्या आवर्जून सांगत होता : ‘‘कतना अच्छा पापलेट है, साहब! नहीं तो बोंबिल लेलो, सस्ता है!’’

गोलसाडीवाली आदिस्त्री करवादून सांगत होती रिक्षावाल्याला : ‘‘चार बंगला क्यूं नहीं आयेंगा! ऐसा कैसा चलेंगा? कंपलेंट करुंगी!’’ सिग्नलवरची गजरेवाली गोड मुलगी मोटारीच्या काचेवरती दरिद्री बोटे टकटकवत विनवत होती : ‘गजरा लेलो ना ताई के लिए! लेलो, लेलो…लेलो ना!’’

तेवढ्यात, उजव्या बाजूने मोबाइलवर मराठी शिव्या देत येऊन धडकलेल्या एका सुशिक्षित आद्य-गृहस्थाने विचारले : ‘बॉम्बे स्कॉटिश स्कूल यहीच रास्ता है ना? साला भूल गया!’ पिशवीभर बटाटे-टमाटे घेऊन घरी निघालेल्या दोन सुविद्य स्त्रिया एकमेकींना सांगत होत्या : ‘‘आमच्या बेबीला मराठीच धड येत नाही, परवा किनई मला विचारत होती की मम्मा, ‘मन सुद्ध तुझं?’ मीन्स व्हॉट?’ मी म्हटलं, कर्म माझं! हुहुहु!!’ दुसऱ्या पुरंध्रीच्या बंटीला पीनट्सची अलर्जी असल्याने सॅगो खिचडी (‘च’ चहातला) आवडत नाही, असंही कळलं. स्कूल, युनिफॉर्म, ट्यूशन सॅलरी,बोनस, प्रमोशन मॅरेज, वाईफ, सिझेरियन रिटायरमेंट,पीएफ, ग्रॅच्युईटी कोविड, ऑक्सिजन,ॲम्ब्युलन्स फोटोफ्रेम,इन्शुरन्स,नॉमिनी लाईफ, डेथ, लाईफ

चालत चालत तो समोरच्या शाळेत शिरला, खिसे चाचपून घडी केलेला चेक काढून त्यावर पुन्हा पुन्हा शून्ये मोजत फायनल आकडा लिहून त्याने साइन करुन कौंटरला भरली फी मुलांच्या शिक्षणाची. क्लार्क म्हणाली : ‘‘पावती मिळेल चार दिवसांनी, तेव्हा या!’’ ‘पावती मिळेल, चार दिवसांनी, तेव्हा या’ हे एकमेव मराठी वाक्य त्या शाळेच्या वास्तूत कणाकणाने विरुन गेले, त्याचेही मराठीपण तिथल्या तिथे झडून तेही कोळिष्टकासारखे शाळेच्या छताला जाऊन लटकू लागले…

loading image
go to top