esakal | ढिंग टांग : चेक द ब्रेन आणि ऑपरेशन डीटीएच!

बोलून बातमी शोधा

Dhing Tang
ढिंग टांग : चेक द ब्रेन आणि ऑपरेशन डीटीएच!
sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

महाराष्ट्र हृदयसम्राट मराठी माणसाचे तारणहार महाराष्ट्राच्या गळ्यातील ताईत श्री. रा. रा. मा. उधोजीसाहेब, मा. मु. म. रा. यांशी, माजी उपशाखाप्रमुख व कडवट कार्यकर्ता बंटी बाबलगावकर ऊर्फ भाऊचा मानाचा मुजरा व लाख लाख दंडवत. पत्र लिहिणेस कारण कां की, ‘ब्रेक द चेन’ मोहिमेअंतर्गत आपन कामाला लागलो आहे. कडक णिर्बंध लावूनही लोक जाम ऐकत नाहीत, असे दिसून आले. इनाकारनी लोक रस्त्यावरती फिरताना दिसतात. मी अशीच सहज चक्कर मारायला बाहेर पडलो असता, बरीच पब्लिक उगाचच हिंडताना बघितली. आपले डोके कामातून गेले. चम्याला बोललो का, ‘‘जा रे, दांडकं घेऊन ये!’’ हातात दांडके घेऊन रस्त्यावर उतरलो. दिसेल त्याला हान हान हानल्यावर गर्दी जरा कमी झाली!! चम्या बोलला का, ‘भाऊ, ऐसाच करना सही है. लातों के भूत बातों से नई मानते!’

येकाला इच्यारले, कुटे चालला? तर म्हनाला, ‘जीवनावश्यक वस्तूची खरेदी करायला चाललो हाहे!’’ मी इच्यारले, ‘‘कुटली जीवनावश्यक वस्तू?’’ त्याने चुन्याची चेपलीली नळी दाखवली, आनि हसला. थितल्या थिते त्याचे कांडात काहाडले. रिकामी फिरनाऱ्या पब्लिकमधले निम्मे तरी तंबाकू-शिगरेटच्या शोधात असतात, असे आमच्या पाहाणीत आढळून आले आहे. तरी त्याचा बंदोबस्त करावा, ही रिक्वेष्ट आहे. मानसाला एका टायमाला खायला नाही भेटले तरी चालंल, पुडी मिळणे गरजेचे असते. पुडीशिवाय मानूस रिकामा वेळ काढू शकत नाही. परिनामी, तो ऑटोम्याटिक रस्त्यावर फिरु लागतो. नावाला भाजीची पिशवी हातात घेतो, पन त्याला पुडीच हवी असते. असल्या लोकांसाठी वेगळी ‘चेक द ब्रेन’ नावाची मोहीम चालवावी, अशी आपली सरकारला विणम्र रिक्वेष्ट आहे.

या नव्या मोहिमेअंतर्गत गर्दी करनाऱ्या पब्लिकसाठी खालील उपाय करावेत, असे वाटते -

१. जो भेटेल तो मानूस हातातली पिशवी दाखवत भाजी आनायला जात असल्याचे सांगतो. खरे तर येवढी भाजी नेहमी कोनीही खात नसते. रोज फुलवर, कोबी, पडवळ, शिराळी, भेंडी कोन खानार? या भाज्यांवरच बंदी आनल्यास काम होऊन जाईल! मुळावर घाव! (मुळ्यावर नव्हे!)

२. पुडी, मावा, तंबाकू (चुन्याच्या नळीसहित) शिग्रेट आदी बेकार गोष्टी पार्सलद्वारे डायरेक घरी पाठविन्याची सोय ठेवावी. त्याने घरी पार्सल आल्यावर संबंधित व्यक्तीची बायको त्या व्यक्तीचे कांडप काढंल! अनेक लोकांची शिग्रेट-तंबाकूचे व्यसन यामुळे सुटेल, असे वाटते.

३. शिवभोजन हे बाहेर हिंडन्यासाठी सांगितले जानारे मोठे कारन आहे. अनेक लोक शिवभोजन आनायला चाललो असे सांगून पुढे सटकतात असे दिसून आले आहे. तेथे कुपन सिस्टम सुरु करावी.

४. हल्ली बंदोबस्तावरील पोलिसांची अवस्था फार वायट झाली आहे. एक बिनमास्काच्या हिंडनाऱ्याची कालर पकडून हवालदाराने दंडाचे पावतीबुक खिश्यातून बाहेर काढले. तेव्हा किती दंड भरु? शंभर कोटी पुरतील का?’ असे खोचकपने बिनमास्काच्याने इच्यारले. हवालदाराच्या डोळ्यात पानी आले!!

५. ही लाष्ट : पोलिसांनी बळाचा वापर सुरु करनेची वेळ आली असून आप्रेशन ‘डीटीएच’ पोलिसदलाने हाती घ्यावे. दोनचार दिवसात पब्लिक ताळ्यावर येईल, याची ग्यारंटी आपन घेतो. ‘आप्रेशन डीटीएच’ म्हंजे रस्त्यावर ‘दिसेल त्याला हाना’!! ही मोहीम राबवल्यास यश मिळेल व महाराष्ट्रावरील संकट टळेल. कळावे. आपला विणम्र. बंटी बाबलगावकर ऊर्फ भाऊ.