ढिंग टांग : लाट आली, लाट आली, लाटले लल्लाटीचे…! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang

ढिंग टांग : लाट आली, लाट आली, लाटले लल्लाटीचे…!

कोरोनाच्या लाटेमुळे देशभरातील मोदी लाट फुटून विखरल्याचे ऐकून आमचे पाय लटलटले. वृत्त भयंकरच होते. कानांवर विश्वास बसेना! असे कसे शक्य आहे? एका किर्कोळ लाटेपुढे गगनचुंबी मोदी लाटेने नांगी टाकावी, हे आमच्या विवेकी मनाला काही केल्या पटले नाही. एका मोदी लाटेने अवघ्या देशाच्या ललाटीच्या रेषा बदललल्या. भले भले नेते सपशेल फलाट झाले! दिग्गज लोक खलाटीला गेले!

...यामागे काही षडयंत्र तर नाही ना? सत्तेपासून वंचित राहिलेल्या आणि देशाचे पिढ्यानपिढ्या वाटोळे करणाऱ्या कुण्या (आंतरराष्ट्रीय) शक्तीचा यात काही हात तर नाही ना? हा कोठल्या राष्ट्रव्यापी ‘टूलकिट’चा भाग तर नाही ना? अनेक शंकाकुशंकांच्या लाटा मनाच्या खडकावर आदळून गेल्या. पण मनाचा खडक अभेद्य राहिला. परंतु, मनातील शंकाकुशंकांच्या या लाटांची आदळआपट थोडी कमी व्हावी, या हेतूने आम्ही आमचे परममित्र व मार्गदर्शक मा. चंदुदादा कोल्हापूरकर यांना घाईघाईने भेटलो. ते कमळ पार्टीच्या मुख्यालयात बसून चष्म्यावरचे धुके पुसत होते...

‘आलाट? या!’ आमच्याकडे बघून ते म्हणाले.

‘शतप्रतिशत प्रणाम! आपले परमप्रिय विश्वनेते मा. नमोजी यांच्या लोकप्रियतेचे रेटिंग २२ अंकांनी घसरुन ६३ वर आल्याचे एका आंतरराष्ट्रीय रेटिंग संस्थेने जाहीर केले आहे...,’ आम्ही थेट विषयालाच हाट घातला.

‘हॅट!! त्यांना म्हणावं, गेलाट उडत!,’ (चष्मा पुन्हा नाकावर ठेवून) ते म्हणाले. आमच्या दादांचे हे आम्हाला भारी आवडते. एखादी गोष्ट ठामपणे मनाशी ठरवली की त्यात बदलनाही. आंतरराष्ट्रीय रेटिंगचा लाटेचा मुद्दा त्यांनी किती फाटकन उडवलान!

‘वाटलंच मला...,’ आनंदाच्या भरात आम्ही म्हणालो. आमच्या मनाच्या खडकावर आदळलेली सुखाची लाट गुदगुल्या करुन गेली. (खुलासा : काही लाटा पायांना गुदगुल्या करुन जातात, असे आम्ही कुठेतरी वाचले आहे. आम्हाला अनुभव नाही. रंकाळ्यावर तो अनुभव मा. दादा कोल्हापूरकरांनी वारंवार घेतला असावा. असो.)

‘उद्या निवडणुका घ्या, मोदीजी किमान चारशे सीटा जिंकतील!’’ त्यांनी पुन्हा धुकेभरला चष्मा पुसायला घेतला. असे करताना त्यांची मुद्रा कायम विजयीवीरासारखीच असते.

‘चारशे?’’ समुद्र किनाऱ्यावर बेसावध बसलेल्या माणसाच्या खालून भरतीच्या लाटेचे पाणी जावे, आणि संपूर्ण प्यांट ओली होऊन सदरील व्यक्ती टाणकन उठून उभी राहावी, तसे आम्हाला झाले.

‘करेक्ट! चारशे! फोर हंड्रेड!’ चष्मा नाकावर ठेवून चार बोटे नाचवत मा. दादा म्हणाले. त्यांच्या चेहऱ्यावर लाटांची पर्वा न करणाऱ्या देवमाशाचा आत्मविश्वास होता.

‘चारशे म्हंजे जरा जास्तच होतात. नाही का?’ आम्ही वाटाघाटी करायला सुरवात केली.

‘वीसेक जास्तच...कमी नाहीत!’ ते म्हणाले.

‘ते कसं काय? जरा विस्कटून सांगा की!,’ आम्ही म्हणालो. मा. चंदुदादा फावल्या वेळात हात, कुंडली वगैरेही बघतात. त्यांचा एकही अंदाज आजवर चुकलेला नाही.

‘जास्त खोलाट जाऊ नका!’ गूढ आवाजात त्यांनी बजावले.

‘म्हंजे कोरोना लाटेनं मोदी लाट फुटवली, हे खरं नाही तर...?’ आम्ही.

‘नेमकी उलट स्थिती आहे...मोदी लाट इतकी उंच होती की त्याच्या पुढे कोरोनाची लाट फुटकळ ठरली!,’ त्यांनी पुन्हा चष्मा पुसायला घेतला.

एकंदरित, आंतरराष्ट्रीय रेटिंग संस्थेने खोटाच अहवाल दिल्याचे आम्हाला एकदाचे पटले.

मनात म्हटले, तुम्ही असाल कोणीही लाटसाब! पण लाटा येतात, आणि जातात. लाटांच्या लाटालाटीत ललाटी लिहिलेले असेल, ते उरतेच.

loading image
go to top