Dhing Tang : तोफा आणि सोफा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : तोफा आणि सोफा!
ढिंग टांग : तोफा आणि सोफा!

ढिंग टांग : तोफा आणि सोफा!

पार्थ म्हणे वैराटे, रथ कुरुकटकासमीप जाऊ दे, भोजन करावयातें आले खट कोण कोण पाहू दे!

नाशकातील एका मंगलकार्याची शोभा वाढवण्यासाठी आणि कार्य सिद्धीस नेण्यासाठी एकत्र आलेल्या दिग्गज नेत्यांनी आपापल्या तोफा रणांगणी सोडून मांडवातला सोफा गाठला, आणि त्या मंगलघटिकेलाच अखिल महाराष्ट्रातील जनतेचा ‘करेक्ट कार्यक्रम’ झाला!!

मांडवातील एका सोफ्यावरती विविध पक्षातील इतक्या नेत्यांनी गर्दी केली, की समस्त वऱ्हाड च्याटंच्याट पडिले, आम्ही तर सपशेल सफाचाट झालो. सोफ्यावरील सौहार्दाची क्षणचित्रे उभ्या महाराष्ट्राने पाहिली. परंतु, तो सौहार्द संवाद काही धड ऐकू आला नाही. आम्ही मात्र ऐकला. तो येणेप्रमाणे :

चंदुदादा कोल्हापूरकर : (झटकन सोफ्याचा एक कोपरा पकडून) है शाब्बास! अब आन देव!

छगनबाप्पा भुजबळ : (मास्कआडून) जय महाराष्ट्र!

चंदुदादा : (तोंड भरुन स्वागत करत) या, या!

छगनबाप्पा : (कमाल आहे या अर्थानं) अहो, नाशकात तुम्ही पाहुणे, आम्ही घरचे!

संजयाजी राऊत : (तडफेने एण्ट्री घेत) मीही घरचाच!

छगनबाप्पा : (हे इथं कुठं? या चर्येने) तुम्ही काय कुठल्याही पक्षाला घरचेच वाटता!

संजयाजी : (चंदुदादांना उद्देशून स्नेहभराने)…काय दादासाहेब, काय म्हणतेय, मानसिक तब्बेत?

चंदुदादा : (हसून साजरं करत) तुम्ही आमची मानसिक तब्बेत तपासा, आम्ही तुमचं डोकं तपासतो!!

संजयाजी : (बेफिकिरीनं) आम्हाला काय धाड भरलीये? तसाही मी नेहमी कंपौंडरकडूनच उपचार करुन घेत असतो!

(इतक्यात विरोधी पक्षनेते…सॉरी…माजी मुख्यमंत्री नानासाहेब फडणवीस प्रविष्ट होतात. नानासाहेब फडणवीस आल्यामुळे पाठोपाठ प्रवीणभाऊ दरेकरही येतातच! हे प्याकेज आहे… )

संजयाजी : (स्वागत करत) या या, बसा बसा!

फडणवीसनाना : (हात फैलावत) बसा काय, बसा? जागा कुठाय सोफ्यावर? जाऊ दे, मी पुन्हा येईन!

प्रवीणभाऊ : (री ओढत) जागा कुठंय?

संजयाजी : (गळ्यात गळे घालत) आपली मैतरकी जुनी आहे! तुम्ही उभे, तर आम्हीही उभे! घ्या नानासाहेब, तुम्हाला जागा करुन देतो!

छगनबाप्पा : (गंभीर होत) एका सोफ्यावर एवढे जण बसलेत, पण मी सोडून कोणीही मास्कसुध्दा लावलेला नाही!

फडणवीसनाना : (थेट मुद्द्याला हात घालत) ते जाऊ द्या, संपादकसाहेब, मेन्यू काय आहे? ते सांगा आधी! तुम्हा लोकांचं झालंच असेल…यथास्थित! (इथं ते उजव्या हाताचा पाचुंदा तोंडाकडे नेऊन भोजनाची खूण करतात…)

प्रवीणभाऊ : (री ओढत) तेच म्हणतो मी! (गिळायची खूण करत) हे झालंच असेल! (इथं विरोधी पक्षनेत्यांचा सवाल हा शुद्ध सवाल होता, की टोमणा होता, की इशारा होता, हे न कळल्याने वातावरणात ताण येतो. पण-)

संजयाजी : (सारवासारव करत) तसं झालंय हो सगळ्यांचं…सगळेच एकदम बसू पंगतीला…इतक्या दिवसांनंतर भेटतोय!!

फडणवीसनाना : (गंभीर होत) भुजबळसाहेब, हे इथं भेटलो हे ठीक आहे, पण वारंवार असं भेटून आपण हास्यविनोद करणं महाराष्ट्राला परवडणारं नाही! लोक काय म्हणतील? यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे!!

संजयाजी : (समजूत घालत) अधून मधून असं पब्लिकला बुचकळ्यात टाकावं हो! तेवढाच जनतेचा करेक्ट कार्यक्रम! काय बरोबर ना?

…एवंच नाशकातील मंगलकार्य सर्वपक्षीय पुण्याईनिशी सिद्धीस गेले. या नेत्यांच्या तोफा खऱ्या की गप्पा रंगवणारा सोफा खरा, हे न कळल्याने जनता मात्र कंप्लीट चक्रावली आहे.

loading image
go to top