esakal | ढिंग टांग : दहीहंडी आणि सोशल डिस्टन्सिंग!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang

ढिंग टांग : दहीहंडी आणि सोशल डिस्टन्सिंग!

sakal_logo
By
- ब्रिटिश नंदी

माझ्या तमाऽऽऽम महाराष्ट्रातल्या बंधूंनो, भगिनींनो आणि मातांनो, माझ्या महाराष्ट्रात सध्या बरंच काही घडतंय. घडायला हवं ते तर मी घडवतोच आहे, जे घडायला नको, तेही मी घडू देत नाहीए. पण तरीही काही नको त्या गोष्टी घडतायत, आणि येत्या काही दिवसात घडणार आहेत. त्यातली सर्वात भयंकर गोष्ट कुठली? तर तिसरी लाट! होय, तिसरी लाट!!

पहिली झाली, दुसरी झाली, आता ही तिसरी लाट येणार आहे. ती आली तर माझ्या महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लावावा लागेल. पुन्हा सगळं बंद. दुकानं बंद, मॉल बंद, रस्ते बंद, वाहतूक बंद…सगळं बंदच बंद! चालणारेय का? पण माझ्या महाराष्ट्राच्या दुर्दैवानं काही लोकांना हे कळत नाही.

मा. त. म. बं. भ. मा., दहीहंडीचा उत्सव तोंडावर आला आहे, म्हणून काही लोक उतावीळ झाले आहेत. यात उतावीळ होण्यासारखं काय आहे? श्रावण-भाद्रपद म्हटले की असले सणवार आलेच. सणवार आले की गर्दी आलीच. गर्दी आली की पाठोपाठ तिसरी लाट!

बोला, मग काय करायचं? फोडायची का हंडी? करायचा का गणेशोत्सवातल्या मिरवणुकीत नाच? करायची का गर्दी? ओढवून घ्यायची का तिसरी लाट? मुळात दहीहंडी हा उत्सव अतिशय डेंजरस आहे. सोशल डिस्टन्सिंगचा एवढा फज्जा कुठेही उडत नसेल. एकावर एक आठ-नऊ थर लावायचेच कशाला? उत्सवाच्या नादात मराठी माणसाने इतक्या थराला जाणं बरं नव्हे. दहीहंडी फोडणाऱ्या अनेक गोविंदांचे हातपाय मोडले आहेत. वरुन कोसळणारा गोविंदा खालच्या गोविंदाच्या ऊरावर कोसळला की दोघांचे हातपाय जायबंदी होतात. मानवी मनोरे मुंबईतल्या बेकायदा बांधकामांसारखे बदाबदा कोसळतात. शिवाय काही उत्साही लोक कारण नसताना वरल्या मजल्यावरुन बादल्याच्या बादल्या पाणी ओतत असतात. तेही थंड पाणी! हो, थंड पाणीच!! निदान गरम पाणी तरी ओतायचे. इतक्या थंड पाण्याने सर्दी होते. सर्दीचा विषाणू आणि कोरोनाचा विषाणू ही भावंड आहेत, हे लक्षात ठेवा!

मला कल्पना आहे, की यंदा दहीहंडी फोडायला काही बोके खूप उत्सुक आहेत. कधी एकदा आठ-नऊ थर लावतो आणि चौथ्या मजल्यावर लावलेली दहीहंडी फोडून दहीपोहे खातो, असं त्यांना झालंय! हंडीची खापरी घरी नेऊन फडताळात ठेवली, की दूधतूप वाढतं असं म्हणतात. माझ्या महाराष्ट्राला अशा अनेक खापऱ्यांची सध्या गरज आहे, बोक्यांची नाही. दूधतूप वाढलं की प्रतिकारशक्ती वाढते, आणि प्रतिकारशक्ती वाढली की कोरोना काय करणार? जगभरात सर्व देशांमध्ये दहीहंड्या लावा, असा सल्ला मी डब्ल्यूएचओला दिला होता. (मी त्यांचा सल्लागार आहे ना!) पण सामूहिक प्रतिकारशक्ती वाढवण्याचा मी सुचवलेला उपाय ऐकून डब्ल्यूएचओच्या अधिकाऱ्यांनी अमोनिया हुंगायला मागवलान!! मंडळी, थोडी कळ सोसायला हवी. काळजी घ्यायला हवी. किंबहुना घ्यावीच! का नाही घ्यायची काळजी? माझा महाराष्ट्र काळजी घेणारा आहे. काळजीत टाकणारा नाही! सगळ्या गोविंदांनी आधी आपापले विमे काढावेत, पीपीइ किट घालावं. लसीचे दोन्ही डोस घेऊन चौदा दिवस झाल्याचं प्रमाणपत्र सादर करावं. खिशात सॅनिटायझरची बाटली ठेवावी, आणि…आणि…मनातल्या मनात दहीहंडी फोडावी!! आता तुम्ही विचाराल, मनातल्या मनात हंडी कशी फोडणार? तर ते सहज शक्य आहे. मनातल्या मनात महाराष्ट्राचा कारभार करता येतो, तर दहीहंडी का फोडता येणार नाही?

जय महाराष्ट्र.

loading image
go to top