esakal | ढिंग टांग : सुलभ अर्थसंकल्प!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing-Tang

नमो नम:! कश्‍शाचेही सोंग आणता येते; पण पैशाचे सोंग आणता येत नाही, अशी एक म्हण आहे. आमच्यामते ती कालबाह्य आणि काहीशी असत्य किंवा अपुरी आहे. कारण, हल्ली पैशाचे सोंग आणणे सहज शक्‍य आहे, हे उघड उघड दिसते आहे. पैशाचे सोंग आणण्याचे एक शास्त्र असते. त्यात पदवी, उच्च पदवी किंवा अगदी एखादे नोबेल प्राइजदेखील मिळवता येणे शक्‍य असते. या शास्त्राला अर्थशास्त्र असे म्हणतात.

ढिंग टांग : सुलभ अर्थसंकल्प!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

नमो नम:! कश्‍शाचेही सोंग आणता येते; पण पैशाचे सोंग आणता येत नाही, अशी एक म्हण आहे. आमच्यामते ती कालबाह्य आणि काहीशी असत्य किंवा अपुरी आहे. कारण, हल्ली पैशाचे सोंग आणणे सहज शक्‍य आहे, हे उघड उघड दिसते आहे. पैशाचे सोंग आणण्याचे एक शास्त्र असते. त्यात पदवी, उच्च पदवी किंवा अगदी एखादे नोबेल प्राइजदेखील मिळवता येणे शक्‍य असते. या शास्त्राला अर्थशास्त्र असे म्हणतात.

ताज्या बातम्यांसाठी करा ई-सकाळचे ऍप 

अर्थतज्ज्ञ नावाचा एक तज्ज्ञांचा प्रकार असतो, तो प्रकार या शास्त्राच्या क्षेत्रात वावरत असतो. अर्थशास्त्र नसते, तर पैशाचे सोंग आणणे कठीण झाले असते. पूर्वीच्या काळी तज्ज्ञांचा हा प्रकार उपलब्ध नव्हता. अर्थशास्त्रच नव्हते, तर अर्थशास्त्री कुठून आणणार? त्यामुळे त्या काळात पैशाचे सोंग आणता येत नव्हते. आता येत्ये!

अर्थसंकल्प हे अर्थशास्त्राचे एक अविभाज्य असे अंग आहे. ढोबळ मानाने अर्थसंकल्प तीन प्रकारचे असतात. एक, खासगी किंवा वैयक्‍तिक अर्थसंकल्प. दुसरा, स्थानीय स्वराज्य संस्था किंवा राज्य वा राष्ट्राचा अर्थसंकल्प आणि तिसरा, जागतिक अर्थसंकल्प... यापैकी तिसरा जो अर्थसंकल्प आहे, तो सोपा विषय आहे. त्यात काहीही फेकले, तरी चालते. या तिसऱ्या प्रकारात अर्थविषयक चर्चेपेक्षा सुभाषिते, सुविचार, तत्त्वज्ञान, अशा अनेक गोष्टींचा अंतर्भाव होतो. उदाहरणार्थ, जागतिक संपत्तीचे असमान वाटप किंवा पर्यावरणबदलानुरूप बदलणारे अर्थचित्र किंवा चीनच्या आर्थिक धोरणाचा जगतावरील परिणाम वगैरे... यातले कुणालाही काही कळत नसल्याने काहीही ठोकले तरी चालते. तेव्हा हा विषय तूर्त बाजूला ठेवू.

पहिला जो वैयक्‍तिक अर्थसंकल्प आहे, त्याला तसा काही अर्थ नाही. कडकी हा त्याचा केंद्रबिंदू असतो. हा काहीसा उदास करणारा विषय असल्याने तो पुन्हा केव्हातरी चर्चेला घेऊ. (अहो, पाच तारीख आली... अजून पगार नाही! असो!!) राहता राहिला विषय राज्याच्या अर्थसंकल्पाचा. तो मात्र अतिशय गहन, क्‍लिष्ट आणि गुंतागुंतीचा विषय आहे.

राज्याचा अर्थसंकल्प कळायला कठीण असतो. तो सुलभ करून सांगण्याची लोकांना गरज असते. सर्वसाधारणपणे त्याला बजेट असे म्हणतात. ते एका चामड्याच्या ब्यागेत ठेवलेले असते. राज्याचे अर्थमंत्री तो विधिमंडळात वाचून दाखवतात. त्यात थोडेफार आकडे आणि बरीचशी शेरोशायरी असते. किंबहुना शेरोशायरीशिवाय अर्थसंकल्प अपुराच असतो. एकवेळ (राज्याच्या तिजोरीत) पैसा नसला तरी चालेल; पण अर्थसंकल्पी भाषणात शेरोशायरी हवीच!! किंबहुना, तिजोरीत जितका खडखडाट तितकी शेरोशायरी ज्यास्त राहते!! याला अनेक पुरावे आहेत. किती देणार? जागेअभावी आम्ही एकच (स्वरचित हं! गालिबचा नव्हे!!) शेर सांगू. अर्ज किया है-

गुलशन में फूल नहीं, फिर भी इश्‍क पर जोर है,
पीछे से देखा तो कुछ और, आगेसे तो मोर है!

...असो! जडजंबाल अर्थशास्त्रीय परिभाषा समजणे एकंदरीत कठीणच जाते. परंतु, त्याचे भय बाळगायचे कारण नाही. जिज्ञासूंनी आता ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ हे मराठी गाइड वाचावे! थोर अर्थतज्ज्ञ  डॉ. देवेनबाबू फडर्जी यांनी हा ग्रंथ खास मराठी सामान्यजनांसाठी लिहिलेला आहे. डॉ. देवेन फडर्जी हे बंगाली नाव वाचून तुम्हाला आश्‍चर्य वाटेल! परंतु, अर्थशास्त्राच्या क्षेत्रात बंगालीबाबूलोकांचा दबदबा फार! नोबेल प्राइज वगैरे मिळवतात! त्यांची मक्‍तेदारी संपवण्यासाठी एका अस्सल नागपुरी गृहस्थाने हे टोपणनाव घेतलेले आहे, हे लक्षात घ्यावे!! ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ या ग्रंथामुळे त्यांच्याकडेही पुरस्कार चालत येईल, याची आम्हाला खात्री आहे. इति.