esakal | ढिंग टांग : ऑल इज वेल!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing-Tang

काय बोलू? बोलण्यासारखं खूप काही आहे, पण कुठून सुरवात करू? मला एवढंच सांगायचं आहे, की आपलं...खरं तर तुमचं असंच म्हटलं पाहिजे...सरकार अगदी खंबीर आणि सुरक्षित आहे. अगदी व्यवस्थित चाललं आहे. अर्थातच चाललं आहे. चालणारच. कारण हे तुमचं सरकार आहे. लोकांचं काम करण्यासाठी आलेलं सरकार आहे.

ढिंग टांग : ऑल इज वेल!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

काय बोलू? बोलण्यासारखं खूप काही आहे, पण कुठून सुरवात करू? मला एवढंच सांगायचं आहे, की आपलं...खरं तर तुमचं असंच म्हटलं पाहिजे...सरकार अगदी खंबीर आणि सुरक्षित आहे. अगदी व्यवस्थित चाललं आहे. अर्थातच चाललं आहे. चालणारच. कारण हे तुमचं सरकार आहे. लोकांचं काम करण्यासाठी आलेलं सरकार आहे. पण मला दु:ख होतं असं नाही म्हणणार मी...पण वाईट वाटतं की विरोधक हे सरकार पाडण्यासाठी देव पाण्यात बुडवून बसले आहेत. पण हे मर्द मावळ्यांचं सरकार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

होय, मावळ्यांचंच सरकार आहे. मर्दांचं आहेच. अर्थातच आहे. कितीही संकटं आली तरी त्याला शिंगावर घेण्याची तयारी असणारं सरकार आहे. ते असं पडणार नाही. खरं तर आपण सगळेच संकटाशी लढत आहोत. कोरोनाच्या मागे हात धुऊन लागलो आहोत. अशा परिस्थितीत सहकार्य करण्याचं सोडून विरोधक देव पाण्यात बुडवतात, याला काय म्हणायचं? 

पावसाळा आलाय. पाऊस म्हटलं की हिरवळ दाटे चोहीकडे असं चित्र दिसू लागतं. पावसाबरोबर आपण अनलॉकसुद्धा करतोय. हो, करतोय आपण अनलॉक! अर्थातच करतोय. किंबहुना, करतोच आहोत. पण असं खाडकन कुलूप उघडून दारं सताड उघडून चालणार नाही. हळूवारपणे उघडावं लागेल. उकडीचा मोदक हळूवारपणे उघडून त्यात तूप घालतात, तसं! 

आपण सध्या अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यात आहोत. आज हॉटेलं उघडली, उद्या उपाहारगृह उघडतील. परवा मॉल्स आणि चित्रपटगृहं उघडतील. अर्थातच उघडतील. पण मी हे जे आज-उद्या-परवा असं म्हणतोय, त्याचा अर्थ कृपाकरून खरोखर आज-उद्या-परवा असा घेऊ नका! आपला उद्या आणि परवा काही महिन्यांनीही उजाडू शकतो. अनलॉकच्या काळात आपण अधिक काळजी घेतली पाहिजे. आपण कोरोनाला कंटाळलो असलो, तरी कोरोना आपल्याला अजून कंटाळलेला नाहीए. नाहीच कंटाळलेला. किंबहुना त्याला आपलं राज्य आवडतंय! या काळात मी घरातून बाहेरच पडत नाही, मंत्रालयात जात नाही, सारं काही नोकरशाहीवर सोडून रिकामा घरात बसलो आहे, असा अपप्रचार सुरू आहे. करणाऱ्यांना त्यांचा तो अपप्रचार लखलाभ असो! पण माझं विरोधकांना सांगणं आहे की बाबांनो, तुम्ही कितीही देव पाण्यात बुडवलेत, कितीही डिवचण्याचा प्रयत्न केलात, तरी मी घराबाहेर पडणार नाही म्हंजे नाही!! अर्थातच नाही पडणार. का पडायचं? मीच जर लॉकडाउनचे नियम मोडायला लागलो तर जनतेने कुणावर विश्वास ठेवायचा? किंबहुना, लोकांपुढे ‘आदर्श लॉकडाउनपुरुष’ उभा करण्याचा माझा प्रयत्न आहे. माझं विरोधकांना सांगणं आहे, की तुम्हीही घराबाहेर पडू नका! प्रकृती सांभाळा! तुम्ही घराबाहेर पडून हे सरकार काही पडणार  नाही. ते अभेद्य, चिरेबंदी किल्ल्यासारखं भक़्कम आहे. या मराठी किल्ल्याला हात लावायची कोणाची बिशाद आहे?

पारनेरच्या आमच्या पाच मावळ्यांना चकवा लागल्याने त्यांची दिशाभूल झाली होती. ते रस्ता चुकून आमच्याच मित्रपक्षाच्या गोटात गेले. पण ते आता परत आमच्याकडे आले आहेत. काळजीचं काही कारण नाही. अशा किरकोळ घटना हे जिवंतपणाचं लक्षण आहे. बिघाडीचं नाही! पण विरोधकांना हे कोण सांगणार? 

थोडक्‍यात, छातीवर हात ठेवून म्हणूया, ऑल इज वेल! येणारं कुठलंही संकट हसत हसत, पण मास्क लावून परतवून लावू या. घरात राहूया आणि महाराष्ट्राच्या विकासाला हातभार लावूया. जय महाराष्ट्र.
(वरील मजकूर लिहिलेला कागद आम्हाला बांदऱ्याच्या कलानगरच्या सिग्नलपाशी चुरगळलेल्या अवस्थेत मिळाला. लेखक अज्ञात आहे.)

loading image