ढिंग टांग : ग्रह, पूर्वग्रह आणि दुराग्रह!

शनै: शनै: शनै: शनै:... जातकहो, फलज्योतिषाला थोतांड म्हणणाऱ्याकडे बघून आम्ही फक्त गूढ स्मितहास्य करतो. बिचारे!
Dhing Tang
Dhing TangSakal

सिद्धांतसंहिताहोरारूपस्कंधत्रयात्मकम।

वेदस्य निर्मलं चक्षु: ज्योतिषशास्त्रमकल्मषम।।

(इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने सुरू केलेल्या ज्योतिष विभागाचे संस्कृत घोषवाक्य)

शनै: शनै: शनै: शनै:... जातकहो, फलज्योतिषाला थोतांड म्हणणाऱ्याकडे बघून आम्ही फक्त गूढ स्मितहास्य करतो. बिचारे! हे ग्रहांनो, त्यांना माफ करा, कां की ते काय करीत आहेत, ते त्यांस ठाऊक नाही! कुंडलीतील ग्रहांच्या विशिष्ट रचनेमुळेच ती किंवा तो असे म्हणतो आहे, हे आम्हाला अचूक कळते. कारण आम्हाला ‘त्यातले’ बरेच काही कळते. पण आम्ही बोलत नाही. (सध्या ग्रह बरे नाहीत.) असो.

ज्योतिष हे एक पूर्ण शास्त्र आहे. त्याला गणिताची जोड असून भौतिकशास्त्राचाही दांडगा अभ्यास करावा लागतो. खगोलशास्त्र तर त्यासाठी कोळून प्यावे लागते. हस्तसामुद्रिकाचा अभ्यास करताना मानसशास्त्राचे ज्ञानही कामी येते. शिवाय कुंगफू, कराटेचे जुजबी ज्ञान असणेही फायदेशीर ठरते. उदाहरणार्थ : फार्फार्पूर्वी प्राचीन काळी आम्ही एका अडल्या नारायणास भविष्य सांगितले होते. भविष्य सांगताना अचानक काही कारण नसताना चिडून त्याने आमच्यावर हल्ला केला. परिणामी, आम्हाला पंधरा दिवस इस्पितळात पडून राहावे लागले. हे कां घडले? आमच्या कुंडलीतील केतुची बाधा! नेमक्या त्याचवेळी केतुने घर बदलल्याने जातकाचे मस्तक फिरले व तो हिंसक झाला. आमच्या कुंडलीत इस्पितळयोग होताच. त्यामुळे आम्ही भविष्य सांगताना पुरेशी काळजी घेत असतो. विशेषत: अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांची भविष्ये अंधकारमय असतात, त्यांना भविष्य सांगायच्या फंदात कोणी पडू नये! फलज्योतिषाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु केल्याची घोषणा झाल्यावर अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांचा संताप होईल, हे भाकित आम्ही तीन वर्षांपूर्वीच केले होते. पुन्हा असो.

सांगावयास अतिशय आनंद होतो की, ज्योतिष या विषयातले आम्ही खरेखुरे पहिले पीएचडी आहोत - ‘डॉक्टरेट ऑफ पामिस्ट्री आणि होरोस्कोप’! आमच्या प्रबंधाचा विषयच मुळी ‘फलज्योतिष : ग्रहांचा मेंदूमस्तिष्कावरील परिणाम आणि इलेक्ट्रिक करंटचे प्रयोग’ हा होता. या विषयाच्या भरपूर प्रॅक्टिकल आम्ही येरवडा आणि ठाणे येथील प्रयोगशाळांमध्ये केल्या, तेव्हा कुठे हे गुह्य आम्हाला उलगले. पीएचडी करण्यापूर्वी आम्ही इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून (पक्षी : इग्नु) ‘मास्टर्स इन आर्ट ज्योतिष’ (पक्षी : एमएजेवाय) ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली होती. हा अभ्यासक्रम सुरु झाला कारण ‘इग्नू’च्या कुंडलीतील साडेसातीचे शेवटचे अडिचके संपुष्टात आले. अन्यथा, हा थोर अभ्यासक्रम अजूनही दप्तरात अडकून पडला असता.

फलज्योतिषाचे उच्चशिक्षण घेतल्याने अर्थार्जनाच्या उत्तम संधी चालून येतात. याची कैक उदाहरणे आमच्यासमोर आहेत. आमच्या वळखीच्या एका बाबाजींनी निव्वळ भविष्ये सांगून नवे घर, गाडी घेतली. अर्थात त्यांच्या कुंडलीत शुभग्रहांची दाटी झाल्यामुळेच असे घडले. तथापि, त्यांच्या कुंडलीत ईडीयोग असल्याचे आम्ही पाहून ठेवले आहे. ईडीयोग हा अतिशय अशुभ आणि अनिष्ट असा योग आहे. हल्ली बऱ्याच राजकारण्यांच्या कुंडलीत तो आढळून येतो. हे सारे कुंडलीतील अनिष्ट ग्रहांचेच प्रताप! त्यामुळे ईडीपीडा टळो, अशी प्रार्थना ते राजकारणी करीत असतात. परंतु, त्याबद्दल पुढे कधीतरी!

सरळ मार्गाने हल्ली काही होत नाही. कर्ज काढून शेती करणे, दुकान काढणे, उद्योगधंदा काढणे अशक्य झाले आहे. नौकरी मिळणे तर दुर्मिळच झाले आहे. शिक्षणाचीही पूर्णत: वाट लागली आहे. अशा परिस्थितीत अन्य कुठल्याही भंपक शास्त्रामागे न लागता पालकांनी आपल्या पाल्यास ज्योतिषविद्येने विभूषित केले तर त्याचे भविष्य उज्वल राहील, याची खात्री वाटते. इति.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com