esakal | ढिंग टांग : …कृपया राजकारण करू नये!

बोलून बातमी शोधा

Dhing Tang
ढिंग टांग : …कृपया राजकारण करू नये!
sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

सध्याच्या महासंकटात कोणीही राजकारण करु नये, हे सर्वच पक्षाच्या नेत्यांना मान्य असल्याचे आमच्या पाहणीत स्पष्ट झाले आहे. त्याखातर आम्ही सर्व राजकीय पुढाऱ्यांचे हार्दिक आभार मानतो. यासंदर्भात आम्ही काही निवडक राजकीय नेत्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यापैकी ९९.९९ टक्के नेत्यांनी ‘ही राजकारणाची वेळ नाही’ हे आवर्जून सांगितले. कुठल्याही सॅनिटायझर किंवा सुप्रसिध्द साबणाने वारंवार हात धुताना दरवेळी ९९.९९ टक्के किटाणु मरतात, हे आपण जाहिरातीत पाहातोच. राजकारणातसुध्दा असे निर्मळ साबण आहेत हे बघून आम्हाला समाधान वाटले. किंबहुना, ही विवेकबुद्धी बघून आम्ही सद्गदित झालो. झालो म्हणजे झालोच. किंबहुना व्हायलाच पाहिजे. का नाही व्हायचे? असो.

सद्गदित झाल्यामुळे आमचा कंठ रुद्ध झाला. पण नाक शिंकरुन पुन्हा कामाला लागलो! पुढाऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या, त्याचा गोषवारा येथे ठेवत आहो. वाचा, आणि तुम्हीही समाधान पावा.

नानासाहेब फडणवीस (नागपूर गादी ) : आम्हाला राजकारण करायचं नाही, आम्ही पहिल्या दिवसापासून सहकार्याच्याच भूमिकेत आहोत. पण हे सरकारच मुळात सर्व आघाड्यांवर अपयशी असून स्वत:च्याच वजनाने कधीही पडेल, अशा अवस्थेत आहे. आम्ही कशाला राजकारण करु? या सरकारबद्दल जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. वाढीव वीजबिलांमुळे लोक खवळले आहेत. अर्थव्यवस्था कोसळली आहे. हे सगळे एक दिवशी (किंवा एका भल्या पहाटे) कोसळेल आणि…आणि मी पुन्हा येईन!

मा. चंदुदादा कोल्हापूरकर (कोल्हापूर गादी- पुणे पार्टटाइम) : आम्हाला राजकारण करण्याची इच्छा नसतेच. आम्ही कधीच राजकारण करत नाही, पण आम्हाला जनतेची काळजी आहे. हे सरकार भ्रष्ट, विश्वासघातकी, खुर्चीबळकाऊ, सत्तालोलुप असल्याने आम्हाला अधिक काळजी वाटते, आणि ती आम्ही बोलून दाखवतो, इतकंच. कोणीही सध्या राजकारण करु नये, याच मताचा मी आहे. ठीक आहे, दोनेक महिन्यात हे सरकार कोसळेल, ते कसे कोसळेल, हे माननीय दादासाहेब बारामतीकरांना चांगले माहीत आहे!! त्यांना विचारा!

दादासाहेब बारामतीकर ऊर्फ धाकले धनी : कुठल्या गोष्टीचं राजकारण करायचं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. राजकारण करणं हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. त्यावर आपल्याला त्याठिकाणी काही बोलायचं नाही. मी स्वत: राजकारण करत नाही, केलं तर सोडत नाही! निघा आता!!

संजयाजी राऊत : महाराष्ट्रात स्थिर सरकार आहे, ते डळमळीत करण्याची कुणाची शामत नाही. केंद्र सरकार महाराष्ट्राशी वैरभावानं वागतं. हा सरकारला बदनाम करण्याचा कट आहे. हे महागात पडेल! मी रोज सकाळी टीव्हीवर येऊन मुक्त चिंतन करतो, पण कधीही राजकारण करत नाही. जय महाराष्ट्र!

नानाभाऊ पटोलेजी : ही राजकारण करण्याची वेळ नाही, हे कुणीतरी प्रधानसेवकाला जाऊन सांगा! महाराष्ट्राला अडचणीत आणण्याचं गलिच्छ राजकारण केंद्रातील नेते करत आहेत, याचा आम्ही निषेध करतो! आम्ही कधीही राजकारण करत नाही, गेले सहाएक वर्ष तर अजिबातच नाही!

चुलतराजसाहेब (शिवाजी पार्क गादी) : कसलं राजकारण? हॅट! निघा!!

मा. उधोजीसाहेब (मा. मु. म. रा. मुंबई गादी) : केव्हापासून सांगतोय, मास्क लावा, वारंवार हात धुवा आणि सुरक्षित अंतर पाळा! लॉकडाऊन करण्याची आमची इच्छा नाही, पण आम्हाला ‘होण्या’ लॉकडाऊनची इच्छा आहे का? हे विचारलंच पाहिजे. विचारणारच. का नको विचारु?

हुश्श! इतक़्या प्रतिक्रिया पुरेत!