esakal | ढिंग टांग : एकजुटीकडून स्वबळाकडे!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang

ढिंग टांग : एकजुटीकडून स्वबळाकडे!

sakal_logo
By
-ब्रिटिश नंदी

मा. दादासाहेब, जय महाराष्ट्र. मला हल्ली आपल्या महाविकास आघाडीची चिंता वाटू लागली आहे. दीड-पावणेदोन वर्षापूर्वी मी ‘ही आमची गरीबांची तीनचाकी रिक्षा आहे’ असे म्हटले होते. या रिक्षाची तीन चाके तीन दिशांना जाणारी असल्याची टीका काही विध्वंसक वृत्तीच्या विरोधकांनी केली होती. सध्या नेमके तेच चालले आहे की काय, असे वाटू लागले आहे.

दीड-पावणेदोन वर्षे झाली असतील, आपण साऱ्यांनी एका पंचतारांकित हाटेलाच्या दालनात बसून ‘पंचवीस वर्ष एकजुटीने राहण्याची’ आणभाक घेतली होती. बेलभंडारा उचलला होता. जे लोक विडे खातात, त्यांनी विडेही उचलले होते. (मी खात नाही, मी उचलला नव्हता!) पण सध्या पंचवीस वर्षे काय पुढले पाच दिवससुद्धा अवघड वाटू लागले आहेत.

आपल्या महाआघाडीतील एका दुय्यम पक्षाचे अध्यक्ष जे की, मा. नानाभाऊ पटोलेजी यांनी नुकताच स्वबळाचा नारा दिला. ते हल्ली दर दोन दिवसांआड नवनवे नारे देत असतात. खरे तर त्यांचा पक्ष तिसऱ्या क्रमांकाचा आहे. त्यांचे स्वबळ असून असून किती असणार? पण दिला नारा!! पुढली निवडणूक आपण स्वबळावर लढवायची असून तयारीला लागा, असा संदेश त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना एका मेळाव्यात दिला, अशी खात्रीलायक खबर आहे. ही घटना घडली तेव्हा कार्यकर्ते कोणीच नव्हते, सगळे नेतेच उपस्थित होते, असेही कळते. या पक्षात कार्यकर्तेच कोणी शिल्लक नसल्याने तसे घडले असेल. पण म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, काळ सोकावतो.

माझी सूचना अशी आहे की, पुन्हा एकदा त्याच पंचतारांकित हॉटेलाच्या दालनात आपण तिन्ही पक्षांनी एकत्र जमून पुन्हा एकदा विडे उचलावेत, असे वाटते! कृपया कळवावे.

आपला. उधोजी (मा. मु. म. रा.)

वि. सू : काहीही असो, हात वारंवार धुवा, मास्क वापरा आणि अंतर पाळा हं! किंबहुना पाळलंच पाहिजे!!

मा. साहेब, नमस्कार, या ठिकाणी कुणी काय बोलावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, आणि घटनेने तसा अधिकार प्रत्येकाला दिला आहे. नानाभाऊंना बोलू दे! आपण कशाला उगाच त्याकडे लक्ष द्या? तुम्ही स्वत:देखील स्वबळाची भाषा केलीत, आम्ही काही बोललो का? माणूस वेळवखत पाहून काहीही बोलतो, सगळेच मनावर घेऊ नये!

आपण सरकार चालवायला एकजूट झालो आहोत, पक्ष चालवायला नव्हे! तुम्ही आमचा पक्ष चालवू नये, आम्ही तुमचा! (आपण दोघे मिळून तो तिसरा पक्ष जमेल तसा चालवू!!) ते रिक्षाबिक्षा तुम्ही बघून घ्या! आपल्याला तसं काही बोलणं जमत नाही. तरीही तुमची दुसरी सूचना बरी वाटते. पुन्हा त्याच हाटेलात शपथविधी समारंभ करावाच! पंचवीस नव्हे, चांगली पन्नास वर्षांची आणभाक घ्यावी. बाकी ठीक. आपला. दादासाहेब बारामतीकर (मा. उ. मु. म. रा.)

ता. क. : नानाभाऊंना पंचतारांकित पार्टीचं कळवून टाकतो.

मा. उधोजीसाहेब आणि मा. दादासाहेब, आपणां दोघांचेही निरोप कम निमंत्रण मिळाले. काही अपरिहार्य कारणास्तव पंचतारांकित हॉटेलातील पार्टीला आमच्यापैकी कुणीही येऊ शकणार नाही. अपरिहार्य कारण म्हंजे मी चार दिवसांपूर्वी इंधन दरवाढीविरुद्ध सायकल आंदोलन केले. अंग आंबून गेले आहे! आमचे दुसरे काही नेते बैलगाडीवर चढले होते!! पुढले काही विचारु नका! करुण कहाणी आहे! भेटी अंती बोलू.

आपला. नानाभाऊ.

loading image