esakal | ढिंग टांग : शाळेचा पहिला दिवस…!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang

ढिंग टांग : शाळेचा पहिला दिवस…!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

सकाळ झाली. सोमवार उजाडला. मोरुचा बाप मोरुला म्हणाला, ‘‘मोऱ्या, उठ, साळेत नाही का जायचे? आज तुझ्या साळेचा पहिला दिवस....दांत घास, आंघोळ कर, गणवेष परिधान कर आणि दप्तर उचलून चालायला लाग कसा!’’

इदमत्यर्थ मोरुच्या बापाची टकळी सुरु जाहली, तेधवा मोरुने देहाचे ‘त’ अक्षरात रुपांतर करुन पालथ्या अवस्थेत स्वप्नभूमीत सहल सुरु केली होती. शाळकरी वयातील मुलेदिखील मोठ्या माणसासारखी भयंकर घोरतात, याचा साक्षात्कार होवोन मोरुच्या तीर्थरुपांस भारी विषण्ण वाटले. बराच वेळ वाट पाहोन मोरुच्या जन्मदात्याने अखेर मोरुदेहावरील पांघरुण खस्सकिनी खेचले आणि त्यास अक्षरश: उघड्यावर पाडले. अखेर मोरुने तोंड उघडले…

‘बाप हो, आज साळेत जाणे कठीण आहे. कां की, माझे भौतिकशास्त्राचे पुस्तक, कुमारभारतीची फाटकी प्रत आणि गणिताच्या गृहपाठाच्या वह्या आदी शालोपयोगी सामग्री तूर्त गायब आहे. दप्तरात भरण्याजोगे काहीही नसल्याकारणाने आज रोजी साळा नाही…,’’ मोरोबांनी तीर्थरुपांकडे सबबीचा पहिला पाढा अर्धवट झोपेत वाचोन दाविला. तीर्थरुपांनी मनोमनी शिव्यांची लाखोली उच्चारिली.

‘मोऱ्या, तुजला काही लज्जा? दोन संवत्सरे लोळून काढिलीस, आता प्रभुकृपेने साळा सुरु होताहे, तेव्हा त्वां गेलेले बरे! विद्यार्जनाची तुजला आस म्हणून ती कशी नाही?’’ मोरुपिता सात्त्विक संतापाने म्हणाला.

‘बाप हो, माझा गणवेष नेमका कोणत्या रंगाचा आहे, हेच मी विस्मरलो आहे! दोन वर्षांपूर्वी शिवलेला गणवेष आता मजला होत नाही…साळेत जावे कसे? विनागणवेष साळेत प्रवेश करणे जिकिरीचे होणार नाही काय?,’’ चलाख मोरुने सबबीचे पुढले पाढे म्हणायास प्रारंभ केला.

‘अरे मूढा, शेजारील पाजारील मुले सकळिक उठोन दप्तर भरोन, टापटीप होवोन साळेकडे निघालीदिखील, आणि अजून त्वां हातरुणातच! हात रे, मेल्या!!,’’ मोरुच्या वडिलांनी त्रागा केला. रागरंग पाहोन मोरुने आपला निष्क्रिय पवित्रा किंचितसा बदलोन ‘ऑनलाइन शिक्षणाचे महत्त्व’ या विषयावर वडिलांचे महाबौद्धिक घेतले. देशात संपर्कक्रांती होत असून मोठमोठाले अभ्यासक्रम रग्गड शुल्क आकारुन ऑनलाइनच शिकवले जातात, किंबहुना शिक्षणासाठी शाळेची वास्तू उभारणे, तासिकांची योजना करणे, घंटा बडवणे आदींची आता आवश्यकताच उरली नसून तो निव्वळ वायफळ खर्च आहे. विद्यार्जनासाठी विद्यासंकुले उभारणे हा अपव्यय आहे. किंबहुना, शाळा हा शिक्षणातील फार मोठा अडसर आहे, अशा आशयाची मौलिक मांडणी मोरुने केली. ती ऐकोन मोरुचा बाप काही काळ निपचित पडला…

‘बाप हो, केवळ तुमचा आग्रहो आहे, म्हणोन मी साळेत जाण्यास तयार आहे!,’’ असे मोरुने म्हटल्यानंतर मोरुच्या जन्मदाता उठून बसला व त्यास ‘आभारी आहे’ असे मन:पूर्वक म्हणाला. एवंच पितापुत्रसंवाद पार पडल्यानंतर मोरुने उशाखालचा भ्रमणध्वनी काढोन त्यात काही शोधाशोध सुरु केली. मोरुपित्याने पुशिले, ‘‘बाळा, काय शोधताहेस, त्या यंत्रात?’’

‘बाप हो, मी माझी साळा गुगल नकाशावर शोधत आहे! दोन वरसांनंतर म्यां साळेचा रस्ता विस्मरलो की हो!’’ असे म्हणोन मोरु स्वत:ची साळा शोधू लागला. सैपाकघराकडे एक चोरटी नजर टाकोन कुजबुजत्या आवाजात मोरुपित्याने मोरुस त्याच्या साळेचा अचूक पत्ता सांगितला : ‘‘अरे मोऱ्या, त्या अमक्या गल्लीतून थोडके पुढे गेले की ढमका बार लागतो. त्याच्या उजवीकडील रस्त्याने पुढे गेले की आलीच तुझी साळा! आहे काय नि नाही काय! शुभास्ते पंथान संतु:!!’’

धन्य मोरु, धन्य त्याचा पिता!

loading image
go to top