esakal | ढिंग टांग : जरा मोठ्यांदा...‘मन की बात’!

बोलून बातमी शोधा

Dhing Tang
ढिंग टांग : जरा मोठ्यांदा...‘मन की बात’!
sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

आमच्या मनात जे चालू असते, त्याचा थांग लागणे तसे कठीण. पण आम्हीच ते सांगून टाकतो. आमच्या तोंडात तीळ भिजत नाही, अशी टीका आमच्यावर होत असते. आम्ही दुर्लक्ष करतो. हल्ली ‘मन की बात’ सांगून टाकण्याची चाल आहे. माणसाने मनात काही ठेवू नये. सांगून टाकावे! आम्हीही मनातल्या मनात ‘मन की बात’ करीत असतो. किंबहुना सतत तेच करीत असतो, कारण ‘मन की बात’ ही प्राय: मनातल्या मनातच करण्याची गोष्ट आहे. पण कधीतरी चुकून ती आपोआप मोठ्यांदा होते. ‘मन की बात’ मोठमोठ्यांदा सुरू झाली की गोंधळ उडतो. आमची अवस्था अंमळ अडचणीची होते. आधीच जनलोक आम्हाला ‘फुटकी तपेली’ म्हणतात. त्यात शेलक्या शब्दांची भर पडते. मागल्या महिन्याच्या अखेरीला आम्ही अशीच ‘मन की बात’ जरा मोठ्यांदा केली. म्हंजे केली मनातच, पण नकळत ती मोठ्यांदा उमटली. ‘हल्ली हे वारंवार होते आहे’ असे कडवट मत व्यक्त करुन घरच्या मंडळींनी आम्हाला मानसोपचारतज्ञाला दाखवून आणले. त्याने गोळ्या लिहून दिल्या. ‘महिनाभर घ्या’ म्हणाला. गोळ्या संपताक्षणी व्हायचा तो घोळ झालाच. या महिनाअखेरीस आम्ही पुन्हा मोठ्यांदा ‘मन की बात’ केली. चालायचेच.

गेल्या खेपेला आम्ही परीक्षांची तयारी कशी करावी, यावर मनातल्या मनात (पण मोठ्यांदा) बोललो होतो. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन वगैरे केले होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधायला आम्हाला भारी आवडते. कारण तेच खरे आपल्या देशाचे भविष्य आहे. परीक्षांचा मुळीच बाऊ करु नये, असा सल्ला आम्ही फार्पूर्वीपासून देत आलो आहे. यावेळीही तोच सल्ला दिला. देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांना म्हटले, ‘‘कसलं परीक्षेचं टेन्शन राव! हटा सावन की घटा!’’ विद्यार्थी खूश झाले! आम्ही आमचेच उदाहरण मुलांसमोर आदर्श म्हणून ठेवले. उदाहरणार्थ, आम्ही आमच्या आयुष्यात कधीही कुठल्याही परीक्षेचा बाऊ केला नाही. दिली तर दिली, नाहीतर नाही!! परीक्षा काय दर्वर्षी होत असतात. आम्ही आयएएसच्या परीक्षेचाही कधी बाऊ केला नाही. देण्याचा प्रश्नच नव्हता! परीक्षा येतात, परीक्षा जातात, आपण देत राहावे! हेच सगळे आम्ही मोठ्यांदा बोललो होतो!! असो.

यावेळी आम्ही दुसरी लाट हा विषय घेतला होता. त्याखातर आम्ही देशातील अनेकांशी दूरसंवाद साधला. काही भगिनींना वाटले की, आम्ही ‘पुरी कशी लाटावी’ याबद्दल काही टिप्स देत आहो! दुसरी लाट म्हंजे ‘पहिली लाटून झाली की मग दुसरी लाट’ असे आम्ही सांगू असे त्यांना वाटले असावे. शेवटी नाइलाजाने आम्ही त्यांना पुऱ्या तळण्याचेही मार्गदर्शन (हातासरशी) करून टाकले. असो.

गेल्या दोन्ही ‘मन की बात’ कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असे की, दोन्ही वेळेला आम्ही संवादकाच्या भूमिकेत होतो. ही सूत्रसंचालनाची कला आम्ही पुण्यात शिकलो! पुण्यात खूप सूत्रसंचालक राहतात. किंबहुना तिथे घरटी एक सूत्रसंचालक राहातो. एखाद्याला बोलते कसे करावे? प्रश्न कसे विचारावेत? हे सारे पुण्यात शिकता येते! असो.

परीक्षा असो वा दुसरी लाट... आम्ही निरनिराळ्या लोकांशी संवाद साधला. त्यांच्या ‘मन की बात’ जाणून घेतली. मन तृप्त झाले. यावेळची ‘मन की बात’ जरा जास्तच मोठ्यांदा झाल्याने मानसोपचारतज्ज्ञाने पुन्हा गोळ्या बदलून दिल्या आहेत. पुढल्या महिन्याच्या अखेरीला त्याचे साइड इफेक्ट कळतील! आम्ही काळजी घेतोच आहे, तुम्हीही घ्या!