esakal | ढिंग टांग : आपण आणि...ते!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang

ढिंग टांग : आपण आणि...ते!

sakal_logo
By
-ब्रिटिश नंदी

बेटा : (नेहमीच्या उत्फुल्लतेने) ढॅणटढॅऽऽण, मम्मा, आयम बॅक!

मम्मामॅडम : (कामात अतिशय व्यग्र असूनही...) व्हेरी गुड! आता स्टीम घे, काढा पी, मास्क आल्यासरशी धुऊन टाक, आणि सॅनिटायझर तळहाताला लाव!

बेटा : (कुरकुरत) मला वाटलं होतं, आल्या आल्या मला इथं ‘पास्ता खाणार का?’ असं विचारलं जाईल! पण मला काढा पी, असं सांगण्यात येतंय! हॅ:!!

मम्मामॅडम : (कामात बिझी...) आपण कोरोनाशी लढतोय ना, मग हे सगळं करायला नको का? आपल्याला ही लढाई एकजुटीने जिंकायची आहे!

बेटा : (चिडून) हे जरा ‘त्यांना’ सांगा ना!

मम्मामॅडम : (बुचकळ्यात पडून) कोण ते?

बेटा : (तिरस्काराने) ते...ते...सत्तेत बसलेले भांडवलदारांचे हस्तक!

मम्मामॅडम : (समजूत घालत) ही लढाई आपण आणि कोरोना यांच्यातली आहे! त्यांच्यातली आणि आपल्यातली नाही! ते आणि आम्ही ही भाषा आता बंद करायला हवी!!

बेटा : (सात्त्विक संतापानं) पण हे आधी त्यांना सांग! मी पहिल्यापासूनच भाईचारा आणि प्रेमाची भाषा करतो आहे! काय मिळालं मला बदल्यात? यथेच्छ चेष्टा! हॅ:!!

मम्मामॅडम : (समंजसपणे) जाऊ देत! तू लक्ष देऊ नकोस! हसतील त्याचे दात दिसतील!

बेटा : (रागारागाने) त्या कमळवाल्यांच्या प्रपोगंडाचा हा देश बळी ठरता कामा नये! हे सरकार कोरोनाबळींचे आकडे लपवण्यात फक्त यशस्वी ठरलंय! बाकी सर्व आघाड्यांवर एकदम फेल आहे कारभार! हॅ:!!

मम्मामॅडम : (पुन्हा आठवण करुन देत) मी काय सांगितलं आत्ता? नो टीका, नो ट्विटरटिप्पणी!! असं करुन चालणार नाही! उलट त्यांनी हाक मारली, तर आपण ओ दिली पाहिजे! त्यांनी साद घातली तर आपण प्रतिसाद दिला पाहिजे! त्यांनी मदत मागितली तर आपण दिली पाहिजे! आफ्टरऑल आपल्या पक्षाकडे असल्या संकटांशी झुंजण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे!!

बेटा : (सात्त्विक संतापानं) म्हंजे? हे सरकार टोटल फेल गेलंय त्याबद्दल काहीच बोलायचं नाही? ये तो बहुत नाइन्साफी है! हॅ:!

मम्मामॅडम : (शिकवणी घेत) बोलायचं, पण हळू आवाजात! संकटकाळात धावून जाणं हे आपलं कर्तव्य नाही का?

बेटा : (दोन्ही हात उडवत) कमॉन!! औषधं नाहीत, ऑक्सिजन नाही, इस्पितळात जागा उरली नाही! ही काय व्यवस्था आहे? हेकाय सरकार आहे? निव्वळ जुमलेबाजी चालली आहे! हॅ:!!

मम्मामॅडम : (शांतपणाने) ही वेळ राजकारण करण्याची नाही, बेटा!

बेटा : (दोन्ही खांदे उडवत) गेली दहा वर्ष मी हेच सांगतोय!

मम्मामॅडम : (निर्णायक सुरात) मी पंतप्रधानांना पत्र पाठवून हेच सांगितलं! राजकारण बाजूला ठेवा! ही काही निवडणूक नाही! एकजुटीने संकटाशी सामना करु या!

बेटा : (आश्चर्यानं थक्क होत) तू थेट मोदीजींना पत्र लिहिलंस? कमाल आहे!!

मम्मामॅडम : (प्रगल्भ चेहरा करत) देशावर जेव्हा संकट येतं, तेव्हा आपसातले मतभेद विसरुन एकजुटीने लढायचं असतं! माझी ताजी मुलाखत वाचली नाहीस का? मी देशवासीयांना त्यातून हाच संदेश दिला आहे, शिवाय मुलाखतीचं कात्रणही पंतप्रधानांना पाठवलंय!

बेटा : (थक्क होत्साता) रिअली? मग त्यांनी पत्राला उत्तर दिलं का काही?

मम्मामॅडम : (खुर्चीत बसत) दिलं ना! त्यांनी कळवलंय, सर्वात आधी हा संदेश तुमच्या सुपुत्राच्या कानावर घाला!

बेटा : (मूठ आवळत) हॅ:!!

loading image