
ढिंग टांग : पीके की चाल!
पीके यांना कोण ओळखत नाही? अवघा देश त्यांना भारतीय राजकारणातील आधुनिक चाणक्य म्हणून ओळखतो. पीके हे एक जबरदस्त व्यक्तिमत्त्च आहे. निवडणुकीची गणिते-भाकिते यामध्ये ते निष्णात मानले जातात. अनेक पक्षांना त्यांनी आपल्या चाणक्यगिरीने जिंकून दिले आहे. ‘निवडणूक जिंकण्याचे १०१ सुलभ मार्ग’ असा ग्रंथ ते लिहिणार होते. पण तो प्रकाशित झाला तर सगळेच पक्ष आरामात सत्तेत निवडून येतील, आणि देशात अराजक माजेल, या भयास्तव त्यांनी अजून ग्रंथलेखनास हात घातलेला नाही. किती ही दूरदृष्टी?
तसे प्रत्येक राजकीय पक्षाचे एकेक चाणक्य असतात. सर्वसाधारणपणे निवडणुका जिंकून देणाऱ्या नेत्यास चाणक्य ही पदवी देण्याची आपल्याकडे चाल आहे. उदाहरणार्थ, कमळ पार्टीचे चाणक्य आमचे मोटाभाई. गेल्या आठेक वर्षापासून ते कमळ पार्टीच्या चाणक्यपदावर विराजमान आहेत. मोटाभाईंच्या आधी पीके यांनीच कमळ पार्टीचे चाणक्यपद भूषविले होते, परंतु, ते अनधिकृत होते. तेव्हापासूनच भारतीय राजकारणातील हुशार व्यक्तीला ‘तो पक्का चाणक्य आहे’ असे म्हणण्याची प्रथा पडली. विरोधी पार्टीतल्या कांग्रेसला मात्र चाणक्याचा शोध लागायचा आहे. बरीच वर्षे या पार्टीला चाणक्याची गरजच नव्हती. आपल्याला चाणक्यबिणक्याची गरज नाही, या समजात कांग्रेस बरीच वर्षे राहिली. उजाडले, तेव्हा उशीर झाला होता.
पीके हे मात्र स्वयंभू चाणक्य आहेत. ज्या पार्टीकडे चाणक्य नसेल, त्या पार्टीने त्यांचा हेल्पलाइन क्रमांक फिरवायचा. प्रासंगिक करारमदार करायचा, की झाले! संबंधित पार्टीला त्या निवडणुकीपुरता चाणक्य उपलब्ध झालाच म्हणून समजा...पीकेंच्या मनात सर्वच पक्षांबाबत बंधुभाव आहे. कित्येक पक्षांना त्यांनी आपले चाणक्यनीतीचे धडे (थोडक्या द्रव्याच्या मोबदल्यात) देऊ केले. एका निवडणुकीत तर सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही पार्ट्यांचे चाणक्य पीकेच होते. पीकेंनी दोन्ही पार्ट्यांना निवडून सत्तेवर आणले, आणि तिसरी पार्टी शंख करीत बसली!
अशा या बुद्धिमान चाणक्य ऊर्फ पीकेंनी एका अलौकिक क्षणी असा निर्णय घेतला की, आपणच आपली पार्टी स्थापन करावी. कुण्या बिराण्या पक्षाचा प्रचार-प्रसार करण्यापेक्षा स्वत:साठीच आपली बुद्धी वापरावी. हे म्हंजे सुग्रास भोजनथाळी हवी म्हणून स्वत:च लग्नास उभे राहण्यापैकी झाले, हे खरे आहे, पण महत्त्वाकांक्षेपुढे सारे काही थिटे असते. पीके यांनी पक्षस्थापनेपूर्वी तीन हजार किलोमीटर लांबीची पदयात्रा करण्याचा संकल्प सोडिला आहे. तीन हजार किलोमीटर! पदयात्रेसाठी त्यांनी मुक्कामाची ठिकाणे, उघडे सजविलेले रथ, जीपगाड्या, हेलिकाप्टरे यांची उत्तम आखणी केली आहे. अनेकदा पदयात्रा करताना दुर्गम भागात जावे लागते. नद्या आडव्या येतात. कुणी बिगरचाणक्य असता, तर तो अशा नदीतून पोहून पैलतीरी गेला असता. पण चाणक्य बिइंग चाणक्य, त्याने होडीची योजना केली!!
पीके यांची पदयात्रा ही अनेक अर्थाने ऐतिहासिक एवं विक्रमी ठरणार आहे. तीन महिने इज इक्वल टू नव्वद दिवस...तीन हजार किलोमीटर चालायचे! म्हंजे दिवसाला सरासरी तेहेत्तीस किलोमीटर अंतर काटायचे! चालेल का कुणी? आहे का कुणाची बिशाद? दिवसाला तेहेत्तीस किमी म्हंजे रात्रीचे बरेचसे अंतर झोपेतही चालावे लागणार! हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडल्यानंतर पीके यांचा यथोचित सत्कार करण्याचे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने ठरवल्याचे समजते. बाज की नजर, बाजीराव की तलवार और पीके की चालपर संदेह नहीं करते! कभी भी मात दे सकती है...!!
Web Title: Editorial Article Dhing Tang 6th May 2022 British Nandi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..