
ढिंग टांग : ‘हाता’वर पोट!
माननीय महामॅडम (१०, जनपथ, नवी दिल्ली) यांसी, लक्ष लक्ष दंडवत आणि प्रणाम.
अत्यंत किरकोळ कारणासाठी आपल्याला स्मरणपत्र धाडण्याचे धारिष्ट्य करीत आहे, याबद्दल क्षमस्व! महाराष्ट्रातील आम्ही काही आमदारांनी आपणांस एक निवेदन दिले होते, आणि प्रत्यक्ष भेटीची वेळदेखील मागितली होती. त्याला आता पंधरा दिवस झाले. आम्ही अजूनही तिष्ठत आहोत. आमच्याजवळील पैसे संपत आले असून महाराष्ट्र सदनातील वास्तव्य महाग जाऊ लागले आहे. तरी लौकरात लौकर आम्हाला भेट मिळावी यासाठी हे स्मरणपत्र. कृपया राग मानू नये!
मा. महामॅडम, मी एक आपल्या पक्षाचा (महाराष्ट्र) हातावर पोट असलेला, साधासुधा सिंपल असा कार्यकर्ता (निष्ठावान हा शब्द राहिला...) असून गेल्या निवडणुकीत काही तरी चमत्कार घडला, आणि मी निवडून आलो. वास्तविक मी आमदार होण्याचे काहीच कारण नव्हते. परंतु, राजकारणात कधी कधी असे होते! दिवस दिवस गळ टाकून बसावे तर एक मासळी गावत नाही, आणि एखादेवेळा नुसता रुमाल टाकून अलगद मासा पकडता येतो, असा अनुभव येतोच!! असो. माझ्याबाबतचा चमत्कार मा. महामॅडम आणि मा. राहुलजी यांच्या पुण्याईमुळे झाला, असे मला वरिष्ठांनी वारंवार बजावून सांगितल्याने माझा विश्वास बसला! पुढे मी नुसता आमदार न राहिलो नाही, तर कर्मधर्मसंयोगाने चक्क आपला पक्ष सत्तेत आला व मी सत्ताधारी पक्षाचा आमदार झालो!! (येत्या विस्तार आणि फेरबदलात माझा नंबर लागेल, असे आश्वासन मला देण्यात आले आहे.) मा. महामॅडम अतिशय दयाळू असून त्यांच्या कानावर आपल्या मागण्या गेल्या की आपोआपच त्या मान्य होतील, अशी खात्री असल्यामुळेच प्रत्यक्ष भेटीसाठी गेले पंधरा दिवस मी आपल्या ‘१०, जनपथ’ या बंगल्याच्या समोर घुटमळत आहे.
लेखी निवेदन घेऊन प्रत्यक्षच मा. महामॅडमच्या शुभ हातांमध्ये द्यावे, अशी प्रारंभी कल्पना होती. तदनुसार आम्ही दोघे-चौघे ‘१०, जनपथ’ बंगल्यावर येऊन गेलो. तेथील गुरख्याने ‘किधरसे आया?’ असे विचारल्यावर आम्ही ‘महाराष्ट्र’ असे उत्तर दिल्यावर तो कुत्सितपणाने हंसला व त्याने आम्हाला ‘आगे जाव’ असे सुचवले. आगे म्हंजे कुठे? असे विचारल्यावर त्याने ‘६, जनपथ’ असा पत्ता सांगितला. तो आमच्या महाविकास आघाडीच्या जनकाचा, म्हंजे थोरल्या साहेबांचा बंगला होता, हे तेथे गेल्यानंतर कळले!! असो. ‘आलाच आहात तर आता जेवूनच जा’ असे त्यांनी सांगितल्याने एका दिवसाचे जेवण सुटले.
दुसऱ्या खेपेला आपल्या निवासस्थानासमोरील गुरख्याने ‘मैडमजी बिझी है, खालीपिली तंग नही करने का’ असे ओरडून सांगितले. आम्ही परत आलो. तिसऱ्या खेपेला आम्ही मिठाईचा पुडा घेतला, आणि बंगल्यावर आलो. गुरख्याने मिठाईचा पुडा ठेवून घेतला, आणि ‘मैडमजी बिझी है’ असेच पुन्हा सांगितले! असे आणखी दोन-तीनदा घडले. शेवटी गुरख्याने ‘कल पुरणपोली लाना’ अशी ऑर्डर दिल्यावर मात्र आमचा उरलासुरला धीरही खचला. गेल्या पंधरा दिवसात आमचे वजन पाच किलोने कमी होऊन गुरख्याचे तेवढेच वाढल्याचे आमचे निरीक्षण आहे. जाऊ दे.
अखेर आम्ही पक्ष कार्यालयात गेलो असता तेथील एका तरुण (दिसणाऱ्या) ज्येष्ठ नेत्याने दर्शन हवे असेल तर, ‘मा. महामॅडमचा फोटो बघा’ असा सल्ला आम्हाला दिला. आम्ही खचून गेलो आहोत. लौकरात लौकर दर्शन द्यावे ही कळकळीची विनंती. आपले दर्शनाभिलाषी.
‘हाता’वर पोट असलेले निष्ठावान आमदार.
Web Title: Editorial Article Dhing Tang 6th Paril 2022 British Nandi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..