ढिंग टांग : मिनी यूपीए आणि मोठा कार्यक्रम !

सरकारी बंगल्याच्या आवारात शांतता आहे. दारावरचा सुरक्षा रक्षक लागोपाठ तीन-चार कडकडीत जांभया देतो. जांभईचा आवाज पार बंगल्यात आतमध्ये जातो.
Dhing Tang
Dhing TangSakal
Updated on

स्थळ : १२, तुघलक रोड न्यू डेल्ही.

सरकारी बंगल्याच्या आवारात शांतता आहे. दारावरचा सुरक्षा रक्षक लागोपाठ तीन-चार कडकडीत जांभया देतो. जांभईचा आवाज पार बंगल्यात आतमध्ये जातो. आतून भुंकण्याचा आवाज. पाठोपाठ ‘पिदी बी सायलेंट’ असे हुकूम ऐकू येतात. पिदी आणखी जोराने भुंकतो! जांभईचे पिदीला वावडे असावे!!

बंगल्याच्या दाराशी ‘मिनीयूपीए’चे संस्थापक आणि महाविकास मल्टीस्पेश्यालिटी रुग्णालयातील ज्येष्ठ कंपौंडर संजयाजी येऊन थडकतात. दारावरचा सुरक्षा रक्षक भिवई उडवून ‘कोण हवंय?’ असं खुणेनेच विचारतो. संजयाजी हाताची घडी घालून त्याच्याकडे रोखून बघतात. - जणू काही तो सुरक्षारक्षक म्हणजे कुणी टीव्ही पत्रकारच आहे!

‘‘अंदर कळवो, सह्याद्री का बाघ आया है..,’’ संजयाजी डरकाळी फोडून आज्ञा करतात. सुरक्षारक्षक सावरुन बसतो. इंटरकॉमवरुन बंगल्यात वर्दी देतो. आतून ताबडतोब बोलावणं येतं. विजयी मुद्रेने संजयाजी आत प्रवेश करतात. अब आगे…

बंगल्याचं आवार निर्मनुष्य आणि निर्मोर आहे. ‘‘तुमच्या बंगल्याच्या आवारात मोर नाहीत, वाटतं!’’ संजयाजी इकडे तिकडे नजर टाकत विचारतात. पण राहुलजींचं त्यांच्याकडे लक्ष नाही. ते बंगल्याच्या हिरवळीवर येरझारा घालत भारत देशाच्या भवितव्याबद्दल चिंतन करीत आहेत. शेतकऱ्यांसाठी त्यांचं मन द्रवतं आहे. मजदूरांसाठी टाहो फोडतं आहे आणि गरीबांसाठी शतश: विदीर्ण होत आहे. ‘‘होते! अब गए..,’’ राहुलजी तुटकपणे उत्तरतात. पाठोपाठ हळूचकन एक सुस्कारा सोडतात. एकेकाळी डझनभर मोर अंगणात नाचायचे. एकदा तर राहुलजींनी रिक्वेस्ट केल्यानंतर ऐन डिसेंबरात मोर नाचले होते, ते त्यांना आठवतं. हल्ली दिल्लीचे सगळे नतद्रष्ट, लोभी, सत्तालोलुप मोर ‘७, लोककल्याण मार्ग’ नावाच्या बंगल्याच्या आवारात जाऊन तडमडतात!

दिल्लीच्या मोरांना ढोकळ्याची चटक लागावी, ही राष्ट्रीय समस्या आहे, या जाणीवेनं राहुलजींचं मन काळवंडतं. पण ते थोडाच वेळ! ‘झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा...’ हे जुने मराठी गीत गुणगुणत ते पुन्हा हसतमुखाने येरझारा घालू लागतात.

‘क्या कहती है हमारी महाविकास आघाडी?’’ राहुलजी उत्साही आवाजात (दोन्ही हात पाठीमागे बांधून) पेशंटची चौकशी डाक्टरांनी करावी, तशी विचारणा करतात. संजयाजी प्रचंड खुश होतात. कुणीतरी आपल्या आघाडीची चौकशी करतंय, ही भावनाच हृदय उचंबळून आणणारी असते. ‘‘ महाविकास आघाडी ही एक प्रकारची आपली मिनी यूपीएच आहे, साहेब!’’ संजयाजी अदबीने सांगतात. त्यांना दोन वर्षापूर्वीचे दिवस (आणि रात्री) आठवतात. तीन पक्षांनी एकत्र येऊन कमळवाल्यांचा केलेला हणम्या…‘हो-ना’ करता करता राहुलजींनी आघाडीत सामील होण्यासाठी दिलेला होकार…तो लॉटरीचाच क्षण होता…

‘‘इसका मतलब हमारी यूपीए अब मिनी हो गई…हँ?,’’ राहुलजींच्या कपाळावर एक आठी पडते.

‘‘ममतादिदींचे उद्गार कृपया मनावर घेऊ नका! महाविकास आघाडी ही मिनी यूपीएच आहे, आणि तुम्हीच त्याचे प्रमुख आहात! तुमच्याशिवाय आघाडीला काय अर्थ आहे? तुम्ही आहात, म्हणून सगळं चांगलं चालू आहे…यूपीए नसली तरी आपली मिनी यूपीए आहे ना?,’’ एकाच बाटलीत खोकला, ताप, पडसे, पोटदुखी, डोकेदुखी, गालगुंड, जंत आदी व्याधींची औषधे मिक्स करुन देणाऱ्या कंपौंडरप्रमाणे संजयाजी मोठा कार्यक्रम करतात. तो अर्थातच लागू पडतो. लौकरच आपल्या निवासस्थानाच्या हिरवळीवर मोर येतील, या जाणीवेने राहुलजी हसतात. पिदी खुशीने भुंकतो. संजयाजी निरोप घेतात. जाताना सुरक्षारक्षक त्यांना अदबीने सलाम ठोकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com