esakal | ढिंग टांग : पेगाससचा उडता घोडा आन आम्ही!
sakal

बोलून बातमी शोधा

dhing tang

ढिंग टांग : पेगाससचा उडता घोडा आन आम्ही!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी न्यूज नेटवर्क

पेगासस हा ग्रीक पुराणातील उडता शुभ्र घोडा आहे, असे कोणी तुम्हाला सांगेल. ते अर्धसत्य आहे. ही पुराणातली वांगी पुराणातच राहोत. आमच्या माहितीनुसार पेगासस हे दुसऱ्याचे चोरुन ऐकण्यासाठी वापरण्यात येणारे महागडे तंत्रज्ञान आहे. जगभरातील नामचीन व्यक्तींच्या फोनमधील ग्यालरीत असलेले फोटो अथवा अन्य मजकूर, संभाषणांचे ध्वनिमुद्रण वगैरे चीजवस्तू लंपास करण्यासाठी पेगाससचा वापर केला जातो. या तंत्रज्ञानाच्या आधारे जगभरातील दहाएक पंतप्रधान, तीन-चार राष्ट्रप्रमुख आणि हजारो सव्यसाची, निर्भय आणि विशुध्द पत्रकारांच्या फोनवर पाळत ठेवण्याचा उद्योग कुण्या अज्ञात लोकांनी केला आहे.

पंतप्रधान, राष्ट्रप्रमुख, राजेमहाराजे यांच्या फोनचे एकवेळ ठीक आहे. पत्रकारांच्या फोनमधले संभाषण आणि अन्य तपशील जाणून घेऊन (आणि त्यांची नावे प्रसिध्द करुन ) पेगाससला काय मिळाले? म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, परंतु काळ सोकावतो. यापुढे पत्रकारितेच्या विश्वात नवा वर्गविग्रह निर्माण होईल, अशी भीती आम्हाला वाटू लागली आहे. ‘पेगासस पत्रकार’ हा खराखुरा पत्रकार आणि ‘नॉनपेगासस पत्रकार’ पानीकम दर्जाचा असे काही भविष्यात होईल्का? ते काहीही असो, या पेगाससचा खरा बाप शोधून काढण्याची गरज आहे, आणि माशाल्ला आम्ही तो छडा लौकरच लावू! किंबहुना लावल्याशिवाय राहणार नाही. लावलाच पाहिजे! कां नाही लावायचा?

परंतु, सांगावयास अतिशय खेद व मोद होतो की आमचा या यादीत समावेश असण्याची शक्यता आहे. तुम्ही विचाराल, खेद आणि मोद एकाच वेळी कसे शक्य आहे? तर खेद अशासाठी की, या चोरट्या उद्योगांमुळे आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर दाणकन गदा आदळली, आणि मोद अशासाठी की जगातील व्हीआयपींमध्ये आमची जिम्मा होते, हे कळले!! अर्थात, असले पाळतीचे प्रकार आम्हाला नवीन नाहीत. पेगासस छापाची पाळत कुणीतरी आपल्या मोबाइल फोनवर ठेवत आहे, हा संशय आम्हाला आधीपासून होताच.

जरा कान इकडे करा, कुणाला सांगूही नका! हा उद्योग घरातलेच कुणीतरी (पक्षी : कुटुंब, मंडळी, कलत्र, बेटरहाफ वगैरे.) करत असावा, असा आमचा वहीम होता. म्हणूनच घरात शिरण्यापूर्वी आम्ही मोबाइल फोनची ग्यालरी साफसूफ करण्याची दक्षता घेऊ लागलो. फोन कायम उशीखाली ठेवून सुरक्षित ठेवू लागलो. इतकेच नव्हे तर त्यात पासवर्डदेखील टाकून ठेवला. इतर लोक अतिशय गूढ आणि किचकट पासवर्ड ठेवतात. पण ते पेगासस (किंवा पत्नी) ला सहज शोधून काढता येतात. आम्ही पासवर्ड हाच पासवर्ड ठेवला! आता तो कसा शोधणार? ठेंगा!!

बाकी पेगाससच्या गुप्तचराने आमचा फोन चोरुन ऐकल्याने किंवा पाहिल्याने समाजाचा झालाच तर फायदाच होईल, अशी आम्हाला खात्री आहे. कां की, आमच्या मोबाइल फोनमध्ये कोणी डोकावून पाहिले तर त्याला विम्याचा हप्ता भरण्याची, फोनचे बिल भरण्याची किंवा ब्यांकेचा हप्ता चुकल्याच्या मुदतींचे संदेश खोऱ्याने सांपडतील. चोरुन ऐकणारास आणि पाहणारास दाहक वास्तवाचे भान येईल. आमच्या ब्यांक खात्याचा तपशील हाती लागल्यानंतर, आमच्यावर पाळत ठेवणाऱ्या पेगाससच्या गुप्तचराच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. आमचे नेटप्याक वारंवार संपत कळल्यानंतर तर त्याला हुंदकाच फुटेल!

जगण्या-बिगण्याच्या भानगडीत इतक्या समस्या असताना आपण हे थिल्लर रहस्य- कादंबरीछापाचे भंकस काहीतरी करीत आहोत, या जाणीवेने तो पेगाससचा घोडा शरमेने पंख मिटून दिडक्या पायावर शांतपणे उभा राहील, यात काय शंका?

loading image