
माणसाने काहीही व्हावे, पण कुठल्याही राजकीय पक्षाचा प्रवक्ता होऊ नये. ते वाईट! कुंडलीतले ग्रह दुष्टाव्याने वागतात, तेव्हाच साध्या वक्त्याचा प्रवक्ता होतो, असे माझे मत झाले आहे.
ढिंग टांग : एका प्रवक्त्याची कैफियत!
माणसाने काहीही व्हावे, पण कुठल्याही राजकीय पक्षाचा प्रवक्ता होऊ नये. ते वाईट! कुंडलीतले ग्रह दुष्टाव्याने वागतात, तेव्हाच साध्या वक्त्याचा प्रवक्ता होतो, असे माझे मत झाले आहे. राजकीय प्रवक्ता म्हटले तर शेरडाचे शेपूट डोळ्यासमोर हलते. ‘लाज बी झाकंना, माश्या बी वारंना’ अशी अवस्था. हे मी अनुभवाने सांगत आहे, कारण कालपर्यंत मीदेखील एका पक्षाचा प्रवक्ता होतो. आज मी साधासुधा बेरोजगार नागरिक उरलो आहे.
मी एक बरा वक्ता असल्याचे ओळखून काही वर्षांपूर्वी माझी प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली. तेव्हा पक्षाध्यक्षांनी पाठ थोपटून ‘आगे बढो’ असे आशीर्वाद दिले होते. (बक्षीस म्हणून इन्स्टन्ट ढोकळ्याचे पाकिटही दिले होते.) माझ्या पक्षाची विचारधारा, आणि पक्षश्रेष्ठी यांच्याप्रति माझ्या मनात दुर्दम्य भक्तिभाव होता, अजूनही आहे. कुणीही माझ्या नेत्याबद्दल काही वाईटसाईट बोलले की मी चित्त्यासारखा खवळून तुटून पडत असे. टीव्हीच्या वृत्तवाहिन्यांचे पत्रकार सारखे माझ्या अवतीभवती असत. माझ्या मागे मागे फिरणारे पत्रकारांचे कळप पाहिले असते, तर सिनेस्टार शाहरुख खानलादेखील न्यूनगंड आला असता.
पक्षश्रेष्ठींसोबत मी सेल्फी घ्यायचो, आणि लागलीच समाज माध्यमांवर टाकायचो. मग छोटेमोठे कार्यकर्ते माझ्याबरोबर सेल्फी घेऊन टाकायला लागले. सकाळी उठल्यावर किमान अर्धा डझन चॅनलवाल्यांचे मेसेज येऊन पडलेले असत. - ‘आज आमच्या महाचर्चेसाठी तुम्ही नक्की या हं! गाडी पाठवत आहे!’ मी जायचो. नंतर नंतर मी टीव्हीवर जायचे बंदच करुन टाकले. कारण टीव्हीचे पत्रकार माझ्याच घराच्या अंगणात येऊन उभे राहू लागले.
इतर पक्षांच्या प्रवक्त्यांशी माझे मैत्रीचे संबंध होते. टीव्हीवरील चर्चेच्या वेळी आम्ही एकमेकांची धुणी हिरीरीने जाहीररित्या धुवायचो. एकमेकांचे जमतील तितके अपमान करायचो. पण कार्यक्रम संपला की एकत्र चहा पिताना ‘आज मजा आली! त्या अमक्या च्यानलवर तुला फाडून खातो की नाही बघ! तो आपल्या पार्टीचा चॅनल आहे,’ अशा गप्पा मारायचो. दुसऱ्या पक्षाचा प्रवक्ताही म्हणायचा की, ‘‘अबे, त्या ढमक्या चॅनलवर एवढं तडातडा बोलून दाखव...तिथं आमच्या पक्षाची चालते!’’
एकदा तर मी कुणाच्या तरी रिसेप्शनला जायचे म्हणून टीव्ही चर्चेत भांडण उकरुन काढले आणि निषेध करत माइक काढून निघून गेलो. चर्चा बंद पडली. दुसऱ्या पक्षाचे प्रवक्तेही त्याच रिसेप्शनला आले, आणि त्यांनी मला टाळी दिली. याला म्हणतात लोकशाही!!
गेल्या वर्षी माझी प्रवक्तेपदाची कारकीर्द एवढी गाजली की मला राज्यसभेचे तिकिट आरामात मिळणार, असे लोक म्हणू लागले. पण कसचे काय! साधी विधान परिषदेची आमदारकीसुद्धा नाही मिळाली. एका पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याकडे तक्रार केली तर तो म्हणाला की,‘‘माझंच काही खरं नाही, तुझ्यासाठी मी बापडा काय शब्द टाकणार?’’ जाऊ द्या.
माझ्या प्रिय पक्षाची विचारसरणी आक्रमकपणे मांडल्याबद्दल मला पक्षातून काढून टाकण्यात आले. हे म्हंजे बिल्डरला खंडणीसाठी फोन केल्याबद्दल डॉन दाऊद इब्राहीमने शार्पशूटर सलीम कंघीला डी- कंपनीतून डच्चू दिल्यासारखे झाले! किंवा चांगले आप्रेशन केल्यावर पेशंट बरा झाल्याने इस्पितळाच्या सुप्रिटेंडंटने सर्जनला वॉर्डबॉयची ड्यूटी दिल्यासारखे झाले!! किंवा कर्मचाऱ्याने टार्गेट पूर्ण केल्याखातर सेल्स मॅनेजरने त्याला काढून टाकल्यासारखे झाले! किंवा...जाऊ दे ना.
माझी बाजू कोण ऐकून घेईल? किंवा लावून धरेल? प्रवक्त्याला प्रवक्ता नसतो, हेच खरे.
Web Title: Editorial Article Dhing Tang British Nandi 10th June 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..