
तारीख जवळ येऊ लागली, तशी इतिहासपुरुषाच्या हुर्द्यात धडधड वाढू लागली. मसलत फसली तर? राजियांची मोहीम फत्ते होणार की शिकस्त खाणार?
ढिंग टांग : चले जाव वि. मत आव!
तारीख जवळ येऊ लागली, तशी इतिहासपुरुषाच्या हुर्द्यात धडधड वाढू लागली. मसलत फसली तर? राजियांची मोहीम फत्ते होणार की शिकस्त खाणार? इतिहासपुरुष रोज रात्री हळदीचे दूध पिऊ लागला, तरीही शांत झोप लागेना. या कुशीवरुन त्या कुशीवर, त्या कुशीवरुन या कुशीवर किंवा कधी पाठीवर पडोन छताकडे पाहात, कधी पोटावर पडून पाय हलवत इतिहास पुरुष निद्रादेवीची आराधना करु लागला. पण कसली ती शिंची निद्रादेवी? लोडशेडिंगच्या विजेप्रमाणे गायब झालेली!! इतिहास पुरुषाच्या हैराणीचे कारणच तसे होते…
शिवतीर्थावरील खलबतखान्यात पेटत्या पलित्यांच्या उजेडात हळू आवाजात बेत शिजत होता. भिंतींनाही कान असतात, पण येथे भिंतींच्या कानातही बोळे कोंबलेले!! इतिहास पुरुषालाही धड ऐको येईना. तरीही अस्फुट काही कानी पडलेच.-
‘ठीक ज्येष्ठ शुद्ध अरण्यषष्ठीला अयोध्येस पोहोचावयाचे! त्यासाठी आपणांस पंचमीलाच पंचक्रोशीत दाखल व्हावे लागेल! सर्वांनी मिळोन येकच गर्दावा करावयाचा…काय?’
राजियांनी भराभरा सूचना दिल्या. आम्ही सारे नवनिर्माणाचे शिलेदार कानाचे द्रोण करोन ऐको लागलो. ‘अरण्यषष्ठी म्हंजे काय रे भाऊ?’ असे आम्ही निरागसपणाने शेजारी उभ्या असलेल्या सरखेल नितीनाजी सरदेसायांना विचारले. नितीनाजी हे नवनिर्माणाच्या आरमाराचे प्रमुख. माहीमचा कोळी फूड फेस्टिवल तेच भरवतात! त्यांनाही बहुधा अरण्यषष्ठी काय ते माहीत नसावे!!
‘अरण्यषष्ठी म्हंजे पाच जून!’ त्यांनी अर्थ सांगितला.
‘राजे, परप्रांतीय ही बहु गरम-मिजाज चीज…हात लावितां भाजेल!’ बाळाजीपंत अमात्यांनी उपरणे सावरत पोक्त सल्ला दिला. परप्रांतीयांना धडा शिकवलाच पाहिजे, यावर पुन्हा एकवार सर्वांचे एकमत झाले. जुन्या आठवणी निघाल्या. ‘‘तसं नव्हे! तेथील एका ब्रिजभूषण नामक परप्रांतीय कमळवीराने सांगावा धाडला आहे की, ‘येता अयोध्या, जाता म्हाद्या!’ बाळाजीपंत काळजीच्या सुरात म्हणाले.
‘ते इथे परप्रांतीय आहेत बाळाजीसाहेब, तेथे ते भूमिपुत्रच नाही का! विरोध तर होणारच!’’ आम्ही उगीचच चर्चेत तोंड घातले. जित्याची खोड! दुसरे काय? दुसऱ्याच क्षणी आमच्या डोक्यावर टपल्यांचा वर्षाव जाहला. ‘गप्प बस लेका’ अशी दटावणी जाहली.
‘आपण अयोध्येत जायचं, पण गनिमी काव्यानं! रात्री गनिम झोपेत बेसावध असताना वेषांतर करोन थेट अयोध्येत शिरायचं, आणि गनिमाची झोप मोडायच्या आत सटकून बाहेर यायचं! जमेल?’ राजियांनी आपला डावपेच शिलेदारांसमोर ठेविला. हरेकाने परप्रांतीयांप्रमाणे कुडता, धोती, गमछा आदी वस्त्रालंकार धारण करावेत, असे ठरले.
दरम्यान सर्वांनी मधल्या काळात प्रत्येकी दोन भोजपुरी चित्रपट पाहून भाषेचा अभ्यास करावा, अशी सूचना करण्यात आली. बेत फक्कड जमला. ‘काहीही होवो, आपण जायचं म्हंजे जायचंच! अयोध्या सर्वांची आहे, कुणाची मजाल आहे आम्हाला तिथे रोखण्याची? असले छप्पन्न ब्रिजभूषण आले तरी आम्हाला पर्वा नाही,’
राजियांनी निर्धार जाहीर केला. कुणीतरी काळजी व्यक्त केली. राजियांनी अंगाला सील करावे आणि मगच अयोध्येत पाऊल ठेवावे, अशी प्रेमळ सूचना पुढे आली. परंतु, शूर राजियांनी या सूचना फेटाळून लावल्या.
‘आम्हांस तुमचे प्रेम कळते! परंतु, परप्रांतीयांसमोर आम्ही कदापि झुकणार नाही, हे ध्यानी असो द्यावे!’ राजे म्हणाले.
‘त्यांनी तिथं आपल्याविरुध्द खळ्ळ खट्याक केलं तर?,’ आम्ही अभावितपणाने म्हणालो. तेव्हा एक खट्याककन आवाज घुमला. पुढले काही कळू शकले नाही. हल्ली आम्हांस डाव्या कानाने कमी ऐकू येते. इति.
Web Title: Editorial Article Dhing Tang British Nandi 11th May 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..