
नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे.) कोजागिरी झाली. टिपूर चांदण्यात भिजलेले आटीव दूध पिण्याची खूप इच्छा होती.
आजची तिथी : श्रीशके १९४४ आश्विन शु. प्रतिपदा.
आजचा वार : मंडेवार!
आजचा सुविचार : चंदा रे चंदा रे, कभी तो जमीं पर आऽऽ…बैठेंगे बातें करेंगेऽऽ…
नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे.) कोजागिरी झाली. टिपूर चांदण्यात भिजलेले आटीव दूध पिण्याची खूप इच्छा होती. पण टिपूर चांदणे कुठले? पावसाचे ढग अजूनही पांगलेले नाहीत. अतिरेक नको, म्हणून आठ-दहा वाट्याच (डोळे मिटून) प्यायलो. एकेकाळी मी पुरणपोळ्यांसोबत…जाऊ दे. गेले ते दिवस.
महाराष्ट्राच्या राजकारणात एवढे घडत असताना मी डोळे मिटून दूध पीत असल्याची टीका होत आहे. हा माझ्यावर धडधडीत अन्याय आहे. महाराष्ट्राच्या समस्या सोडवण्यासाठी मी रात्रंदिवस काम करतो आहे. यांचे निवडणूक चिन्ह गेले, पक्षाचे नाव गेले, याचा माझ्याशी काय संबंध? तरीही आमचे जुने मित्र उधोजीसाहेबांनी (सोशल मीडियावरील स्पेशल मेळाव्यात) माझ्यावरच आगपाखड केली. ते म्हणाले की, आमच्या पक्षाला संपवण्याचं हे कमळवाल्यांचे कारस्थान आहे. ते कधीही तडीला जाणार नाही. सळसळतं रक्त, गारद्यांची अवलाद वगैरे. मीच या सगळ्याच्या पाठीमागचा सूत्रधार आहे, असा आरोप आहे. मला वाईट वाटले. रात्री (दूध पिण्यासाठी) आमचे नवे मित्र कर्मवीर भाईसाहेब आले. मला विचारत होते की, ‘आमच्या साहेबांचं फेसबुकवरचं भाषण ऐकलं का?,’ इतके होऊनही अजूनही यांचे साहेब तेच! तोंड कडवट पडल्याने मी अजून एक वाटी आटीव दूध मागवले.
‘मला चाळीस डोक्यांचा रावण म्हणाले ते! चंगीझ खान काय, तैमूल लंग काय, औरंगजेब काय…शोभते का ही भाषा?,’ मी चिडून म्हणालो. माणसाने शिव्या देणे एकवेळ ठीक आहे, पण एखाद्याला किती शाप द्यायचे?
‘अहो, चाळीस डोक्यांचा रावण मला म्हणाले ते, तुम्हाला नाही! तुम्हाला १०६ डोक्यांचा रावण म्हणाले असते ना?,’ कर्मवीरांनी युक्तिवाद केला. तो तसा पटण्याजोगा होता. मी काही बोललो नाही. ‘पण हे पक्ष संपवण्याचं कारस्थान वगैरे…मी असं करीन का? किंवा मी असं का करीन? राजकारण करुन गेला गाव, आणि फडणवीसनानाचं नाव?,’ मी शंभर नंबरी सवाल केला. ‘कुणास ठाऊक..,’ कर्मवीर खांदे उडवून म्हणाले.
‘तुम्हाला तुमचा पक्ष, चिन्ह वाचवता आलं नाही, याला मी कसा काय कारणीभूत? मी एक साधासुधा वऱ्हाडी माणूस आहे! ओठात एक, पोटात एक असं काही आपलं नसतं...,’ मी सात्त्विक संतापाने म्हणालो.
‘ते जाऊ दे… आपण पुढे काय करायचंय?,’ कर्मवीरांनी विचारले.
‘दूध प्या, दूध!,’ मी हसून म्हणालो.
थोडा वेळ कोणीही काही बोलले नाही. दूध पिताना काय बोलणार? शेवटी बराच वेळ मौन राखून कर्मवीरच म्हणाले, ‘तुतारी घ्यावी की गदा?’ मी दचकलोच.
‘मला वाटतं, तुतारीच घ्यावी…बरी असते! कुठल्याही पक्षाच्या प्रचारसभेत तुतारी वाजतेच. तेवढाच आयता प्रचार होईल! त्यांच्या सभेतही तुतारी वाजणारच ना! हाहा!!’ माझ्या नजरेसमोर चित्रच आले. मा. उधोजीसाहेब भाषणाला उभे राहिलेत, आणि तुतारी वाजतेय! ते भडकले आहेत!..
कर्मवीर आणि मी एकमेकांना टाळी दिली. ‘‘इस बात पे और एकेक वाटी आटीव दूध हो जाय!’ मी म्हणालो. कोजागिरीचा चंद्र आपले शीतल चांदणे आम्हां दोघांवर पखरत होता…
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.