ढिंग टांग : सुदाम्याचे पोहे!

नेमकी तीथ सांगावयाची तर ती पौषातील तृतीयेची एक सुंदर सकाळ (पक्षी : दुपारच) होती. शिवाजी पार्काडावरील पक्षीगण हळूहळू किलबिलू लागले होते.
Dhing tang
Dhing tangSakal
Updated on

नेमकी तीथ सांगावयाची तर ती पौषातील तृतीयेची एक सुंदर सकाळ (पक्षी : दुपारच) होती. शिवाजी पार्काडावरील पक्षीगण हळूहळू किलबिलू लागले होते. मॉर्निंगवॉकवाले घराकडे निघाले होते. पार्काडाच्या नाक्यावरील इराण्याकडून आमलेटाचा अवर्णनीय सुगंध दर्वळू लागला होता. त्यामुळे पौषातील सकाळ अधिकच सुंदर भासत होती. तेवढ्यात एक गरीबगुरीब चेहऱ्याचा मनुष्य गोंधळलेल्या (परंतु, शोधक) नजरेने पाहात असताना काही चौकस महाराष्ट्रसैनिकांना दिसला... शिवाजी पार्काडाच्या परिसरात म. सैनिकांचा जागता पहारा असतो. कां की तेथे महाराष्ट्रधर्माचे चालते बोलते प्रतीक निवास करोन आहे. गरीबगुरीब चेहऱ्याच्या गोंधळलेल्या मनुष्याने हातातील चिठ्ठी दाखवत पत्ता विचारला, तेव्हा अवघे पार्काड चपापले. पाखरे किलबिलायची थांबली. इराण्याच्या तव्यावरील आमलेट जळाले!! मॉर्निंगवॉकवाल्यांची पावले थबकली.

‘एवढा फेमस आड्रेस माहिती नाही?,’ एका रहिवाशाने आश्चर्याने विचारले. कुणीही पांथस्थाने पत्ता विचारला की, त्याला अनेक प्रश्न विचारायचे, मगच पत्ता द्यायचा, अशी पार्काडात परंपराच आहे.

‘मी अडाणी माणूस...आम्हाला कसं ठावं असेल?,’ ग. गु. चे.चा अडाणी माणूस म्हणाला. तेवढ्यात दोघा-चौघा महाराष्ट्र सैनिकांनी त्याला घेरले आणि जिथे न्यायचे तिथे नेले. त्याचे असे आहे की, ‘त्या’ विशिष्ट पत्त्यावर सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक जे की मा. राजेसाहेब राहताती, हे सर्वांस ठावकें आहेच. मागे एकदा व्यंगचित्रकार राजेसाहेबांना टॅक्सीचे चित्र काढायचे होते. मॉडेलिंगसाठी टॅक्सी हवी होती. फर्मान सुटल्यावर एक टॅक्सीवाला (पकडून) हजर करण्यात आला. तो उत्तर भारतीय भय्या निघाला!! पण साहेबांनी टॅक्सीचे फोटोबिटो काढून मुळीच खळ्ळखळ्ळ न करता खटॅककन त्याला भाडे देऊन टाकले, अशी बखरीत नोंद आहे. तशाच प्रकारे साहेबांना एखाद्या अडाणी माणसाचे व्यंगचित्र काढावयाचे असणार, हे हुशार नागरिकांनी ताडले!

...तर अशा रितीने, ग. गु. चे. चा अडाणी माणूस अखेर ‘शिवतीर्था’वर पावतां झाला, ही बातमी बाहेर कशी कुणास ठाऊक, पण फुटली! भलताच गवगवा जाहला. सदरील अडाणी माणूस ‘शिवतीर्था’वर चांगला घटकाभर थांबला होता, नंतर आल्यापावली वापस चाल्ला गेला. त्यानंतर खुद्द साहेबांनी गाडी काढली, आणि ते थेट महाराष्ट्राचे उपकारभारी श्रीमंत फडणवीसनाना यांच्या भेटीसाठी रवाना जाहले, हा तपशील बाहेर कळल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली. अडाणी माणसाचे ‘शिवतीर्था’वर काय काम? एक तास अडाणी माणूस तेथे काय करीत होता? तेही अंगारकी चतुर्थीच्या दिवशी? हे काय भलतेच? वातावरण तापले. बांदऱ्यातून जासूद निघाले. पण कुठे जायचे हे न कळल्याने परत बांदऱ्यालाच निघून गेले. अवघा महाराष्ट्र च्याटंच्याट पडला होता...

अडाणी माणूस अंगारकीच्या दिवशी साहेबांना कल्लाकभर कां भेटला? या प्रश्नाने महाराष्ट्राला अस्वस्थ केले. कुणीतरी उत्तर शोधायला हवेच होते. अखेर मनाचा हिय्या करोन आम्हीच मा. साहेबांना पृच्छिले. स्वारी खुशीत होती.

‘गुस्ताखी मुआफ करा, साहेब, पण अडाणी माणसाचे आपल्याकडे काय काम होते?,’ आम्ही प्रचंड अदबीने वांकवांकून विचारले. ‘काही नाही, सहज आले होते...!,’ साहेब उद्गारले. परंतु, मनातल्या मनात ते हसत असावेत, असे वाटले.

‘...तरीही!,’ संशयाने आम्ही घोडे दामटले. त्यावर रोखून पाहात साहेबांनी आम्हाला जवळपास भस्म केले. मग सुप्रसिद्ध धारदार खर्जात म्हणाले-

‘काऽऽही नाही! अडाणी माणूस पुरचुंडीत पोहे घेऊन आमच्याकडे आला होता, म्हणाला, ‘गरीबाकडे लक्ष असू द्या, साहेब!’...एवढंच! कळलं? आता जा!!’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com