ढिंग टांग : मंत्रालयात अंधार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang
ढिंग टांग : मंत्रालयात अंधार!

ढिंग टांग : मंत्रालयात अंधार!

केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रावर विजेचे संकट (विजेसारखेच) कोसळले आहे. केंद्राने वेळच्यावेळी कोळसा उपलब्ध करुन न दिल्याने राज्य सरकारवर ही आफत ओढवली, हे उघडच आहे. केंद्राच्या सूडबुद्धी, सापत्नभाव आणि संकुचित वृत्तीमुळे आज महाराष्ट्राची सारी रयत उकाड्याने हैराण झाली आहे. या उकाड्यावर उपाय काय? याचा विचारपूर्वक निर्णय घेण्यासाठी मंत्रालयात मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला (अवघ्या देशात ‘टॉप फाइव्ह’मध्ये असलेले) माननीय मुख्यमंत्रीसाहेब ऑनलाइन उपस्थित होते. ते हल्ली सारे काही ऑनलाइनच करतात. सदरील बैठकीत, ते ऑनलाइन जोडले गेल्यानंतर पाचच मिनिटांनी मंत्रालयातलीच वीज गायब जाहली! मुख्यमंत्री पडद्यावर दिसत होते. त्यांनी मूठ उगारुन काही निर्णय जाहीर करण्याआधीच शिंची वीज गेल्याने महाराष्ट्र एका मोठ्या निर्णयाला मुकला. बैठकीचे दालन अंधारात बुडाले. या अंधारातील काही आवाज आम्ही टिपले. ते आम्हाला प्रातिनिधिक स्वरुपाचे वाटले. ते येणेप्रमाणे :

आवाज १ : (अंधारात) ग्येली का लाइट? झाऽऽलं, चला आताऽऽ...!

आवाज २ : सगळे जागच्याजागी बसून रहा! खुर्ची जाईल!!

आवाज ३ : (घाबऱ्याघुबऱ्या) कुणीतरी मेणबत्त्या पेटवा रे!

आवाज ४ : (खेकसून) अहो, तुम्ही फायलीनं वारा काय घेताय? कागद उडतायत! महत्त्वाच्या वटहुकुमाचा मसुदा होता तो!

आवाज ५ : (वारा घेत) मरु दे हो! कसला वटहुकूम नि काय! वारा घ्या, वारा!!

आवाज ६ : (सुस्कारा सोडत) फुस्सस्स...ही म्हणे मंत्रिमंडळाची बैठक! ह्यॅ:!! केवढा घाम फुटला...बापरे!

आवाज ७ : (किंचाळून) साहेब, तुम्ही माझ्या खिशात हात का घालताय?

आवाज ६ : (नरमाईनं) सॉरी, रुमाल शोधत होतो...चुकून तुमच्या खिशातला घेतला!

आवाज ७ : (दुप्पट वैतागून) ठेवा आता तुमच्याकडेच! शी: घाम पुसलात तुम्ही त्याला!

आवाज ४ : (अधीरतेनं) काहो, राऊतसाहेब, वीज कधी येणार?

आवाज ८ : (संतापाने) मी काय एमेसीबीचा वाइरमन वाटलो का? मला काय विचारताय? केंद्राला विचारा...!

आवाज ४ : (वैतागून) ह्या:!! ही कसली मंत्रिमंडळ बैठक? सीएमचा पत्ता नाही, एक तर येतात ऑनलाइन जनतेवर उपकार केल्यागत! आता तर लाइटसुद्धा गेली...

आवाज ५ : हळू बोला! सीएम अजूनही लाइनवर असतील! मघाशी मूठ वळवून काही तरी घोषणा करणार होते...

आवाज ६ : (विषण्णपणे) मास्कमुक्तीचा निर्णय घ्यायचा राहून गेला या विजेमुळे!

आवाज १ : (खुर्च्या सरकवल्याचे आवाज ऐकून सावध होत) कुणीही जागेवरुन उठायचं नाही, सांगितलं होतं ना? कुणाची खुर्ची अंधारात गायब झाली तर त्याला सरकार जबाबदार राहणार नाही, आधीच सांगून ठेवतोय!!

आवाज ३ : (संभ्रमात) सीएमसाहेब आहेत का, झाले ऑफलाइन?

आवाज ६ : (खुलासा करत) ते ऑफलाइनच असतात, अधून मधून ऑनलाइन येतात आणि पुन्हा ऑफलाइन होतात! दोन वर्ष हेच चाललंय की!!

आवाज २ : (खवचटपणाने) आता उठायचं का आपण? सीएमसाहेब घोषणा करण्यासाठी मूठ वळवून बोलायला गेले तेवढ्यात लाइट गेली...काय बोलायचं होतं त्यांना?

आवाज ४ : (शांतपणे) आता वीज गायब होईल असंच ते सांगत होते! ती पुन्हा गायब होऊ नये म्हणून घट्ट धरून ठेवा, असं म्हणायचं होतं त्यांना! तेवढ्यात वीज गेली...चला, निघू या!

जय महाराष्ट्र.

Web Title: Editorial Article Dhing Tang British Nandi 13th May 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top