
डिअर सर, कालच कोल्हापूरच्या कामगिरीवरुन (कसाबसा) परत आलो. महाराष्ट्रातील आर्थिक घोटाळ्यांचा तपास करण्याच्या गुप्त कामगिरीवर आपण मला मुंबईत पाठवले, त्याबद्दल आभारी आहे.
ढिंग टांग : तहकिकात : एक रिपोर्ट!
डिअर सर, कालच कोल्हापूरच्या कामगिरीवरुन (कसाबसा) परत आलो. महाराष्ट्रातील आर्थिक घोटाळ्यांचा तपास करण्याच्या गुप्त कामगिरीवर आपण मला मुंबईत पाठवले, त्याबद्दल आभारी आहे. परंतु, एका गूढ व्यक्तीबाबत गंभीर तक्रार करण्यासाठीदेखील हे पत्र लिहावे लागत आहे.
गेले काही महिने महाराष्ट्रात अनेक आर्थिक घोटाळे सुरु असून त्यांचा निकाल लावणे हे आपले कर्तव्यच आहे. घोटाळ्याची बरीच प्रकरणे पेंडिंग आहेत, आणि तपास योग्य दिशेने जात आहे. तथापि, मुंबईनजीक मुलुंड येथे राहणारे एक मि. सोमय्यागोमय्या नावाचे गृहस्थ रोज अर्धाएक डझन फायली कार्यालयात आणून टाकतात, आणि तपास कुठवर आला? असे दरडावून विचारतात. (तरीही त्यांच्या कागदपत्रांनुसारच तपासकाम जोरात सुरु ठेवले आहे.) सुरवातीला मला वाटले की ते सीबीआयचे मोठे अधिकारी असावेत. कारण रोज सकाळी आल्याआल्या ते दैनंदिन कामाचा रिपोर्ट मागत. दिवसाच्या सुरवातीलाच रिपोर्ट कसा द्यायचा? हे कळत नव्हते. मग ‘आधी रिपोर्ट, मग तपासकाम’ अशी पद्धत सुरु केली!
आश्चर्याची गोष्ट म्हणजे कुठल्याही घोटाळ्याची कागदपत्रे सर्वात आधी त्यांच्याकडे पोचतात. किंबहुना, परवा मी एका ठिकाणी रेड मारण्यास गेलो असता काहीही आढळून आले नाही. तेव्हा तेथील (संशयित) व्यक्तीने सांगितले की येथील सर्व आक्षेपार्ह कागदपत्रे आधीच मि. सोमय्यागोमय्या यांनी काढून नेली आहेत! हे गृहस्थ तपास यंत्रणांसाठी एक चिंधी शिल्लक ठेवत नाहीत, परिणामी आमचे छापे निष्फळ ठरतात, अशी माझी गंभीर तक्रार आहे.
हे गृहस्थ रोज सकाळी आज तपासयंत्रणा काय कामे करणार याची माहिती देतात, आणि मोठा पुठ्ठ्याचा हातोडा घेऊन कुठे कुठे दौरे काढतात. पुठ्ठ्याचा हातोडा वगैरे ठीक आहे, पण ते सोबत तीस-चाळीस क्यामेरेवाले पत्रकार घेऊनच हिंडतात. दापोलीला तर ते इतक्यांदा जाऊन आले आहेत की हल्ली तेथील मार्केटमधले लोक त्यांना ‘लोकल’ म्हणून ओळखू लागले आहेत. आमच्या कार्यालयातील काही जणांना तर ते दापोलीचे रहिवासीच वाटू लागले होते. मुलुंडचा पत्ता नंतर उघड झाला. असो.
मध्यंतरी, काही कारणाने सीबीआयच्या कार्यालयात गेलो असता तेथे हे गृहस्थ दिसले. ते कोण? त्यांचा हुद्दा काय? अशी विचारणा मी एका कर्मचाऱ्याकडे केली असता तो म्हणाला की, ‘‘किसको मालूम? शायद इडीका कोई अधिकारी होगा!’’ घ्या! म्हणजे ईडीवाल्यांना ते ‘सीबीआय’चे वाटतात, आणि ‘सीबीआय’वाल्यांना ईडीचे!! दोन्हीकडे संयुक्त चौकशी केली असता कळले की ते ‘एनआयए’चे अधिकारी आहेत. हे मि. सोमय्यागोमय्या नेमके कुठले अधिकारी असावेत, हे कुणालाच न कळल्याने, सगळेच गपचूप त्यांनी सांगितलेली कामे (निमूटपणाने) करत आले आहेत.
दरवेळी हे गृहस्थ कचेरीत आले की सर्व कर्मचारीवर्ग आपापल्या टेबलाशी बसून मान खाली घालून कामे करु लागतात. तरीही हे प्रत्येकाच्या जवळ जाऊन डोळे फिरवत किंचित हसून ‘हिशेब तर द्यावाच लागणाऽऽर’ असे काळीज चिरणारे वाक्य उच्चारतात. त्यांच्या या वाक्याची महाराष्ट्रातील अनेकांनी दहशत खाल्ली आहे. परवा तर एका पोलिस ठाण्यात हे गृहस्थ घुसले, तर तिथल्या फौजदारालाच घाम फुटला! ‘तुमच्याविरोधात काही नाही’ असे वारंवार सांगितल्यानंतरच त्याला थोडे शांत वाटले. असो.
सदरील मि. सोमय्यागोमय्या यांना दौंडला जाण्याचा आदेश मि. राऊत म्हणून आहेत, त्यांनी दिल्याचे समजते. दौंडचे कागदपत्र मि. राऊत यांनी आम्हाला आणून दिले असून ‘मि. सोमय्यागोमय्या यांना द्या’ असे फर्मावले आहे. काय करु? कळावे. आपला. एक आज्ञाधारक तपास अधिकारी.