
राजाधिराज उधोजीमहाराज अस्वस्थतेने अंत:पुरात येरझारा घालत आहेत. एका भिंतीकडून दुसऱ्या भिंतीकडे. तंद्रीत एकदोनदा भिंतीला धडकतातदेखील!
ढिंग टांग : सुरुंग पेरणीचा हंगाम!
स्थळ : मातोश्री महाल. वेळ : युद्धाची जमवाजमव.
राजाधिराज उधोजीमहाराज अस्वस्थतेने अंत:पुरात येरझारा घालत आहेत. एका भिंतीकडून दुसऱ्या भिंतीकडे. तंद्रीत एकदोनदा भिंतीला धडकतातदेखील! कपाळावरील टेंगळे चोळत येरझारा घालणे काही थांबवत नाहीत. मधूनच अदृश्य तलवारीचे हात हवेत करतात. तोंडाने ‘निमकहराम, विश्वासघातकी, शब्दफिरवे, फितुर, गद्दार’ अशा शब्दांची खैरात चालू आहे. अब आगे…
उधोजीराजे : (अचानक गर्रकन मान वळवून) कोण आहे रे तिकडे?
संजयाजी फर्जंद : (लगबगीने येऊन मुजरा करत) आज्ञा असावी महाराज! बंदा हाजिर आहे!! काय सेवा करु?
उधोजीराजे : (वक्र भिवईने) आमची तलवार कुठे आहे?
संजयाजी : (तत्परतेने) आपली दिग्विजयी तलवार पाणी पाजायास नेण्यात आली आहे, महाराज! फारा दिवसात वापर न झाल्याने ती गंजली होती. मुठीकडे थोडी ढिली पडली होती!
उधोजीराजे : (तडफेने) आमच्या सैन्याची जमवाजमव झाली? शिलेदार-शिबंदी, दाणागोटा, दारुगोळा, उंटघोडे, हात्त्यारं- पात्त्यारं…सर्व तजवीज झाली?
संजयाजी : (गुळमुळीतपणे) तसं म्हटलं तर झालीच म्हणायची!
उधोजीराजे : (संशयाने) एवढं गुळमुळीत उत्तर कशापायी? कुठे गेले आमचे सगळे खंदे वीर-शिलेदार?
संजयाजी : (दोन्ही हात पाठीमागे बांधून) मी आहे की एकला! शंभर जणांना पुरुन उरतो की नाही बघा!!
उधोजीराजे : (क्रुध्द नजरेने) बाकीचे कुठे गेले? खरं सांगा!
संजयाजी : (गुळमुळीतपणे) असतील हितंच कुठं तरी!!
उधोजीराजे : आपल्याला एकोप्यानं उभं राहायला हवं!
संजयाजी : (निर्विकारपणे दातातली काडी चावत) चुक चुक!!
उधोजीराजे : (ताडताड पावले टाकत) घोडामैदान आता फार दूर नाही! कुठल्याही क्षणी युद्ध पेटू शकतं! रात्र वैऱ्याची आहे! मराठी दौलतीच्या रक्षणासाठी आणि मराठी अस्मितेचा हुंकार दाखवण्यासाठी हाती तेग घेवोन शत्रूवर तुटून पडणे हे आमुचे कर्तव्य आहे, आणि ते आम्ही पार पाडणारच!!
संजयाजी : (कुजबुजत्या सुरात) घोडामैदानाचा विचार काढून टाका, साहेब! तसलं युद्ध करण्याचा काळ इतिहासजमा झाला! हल्ली शत्रूपक्ष डायरेक्ट बॉम्बहल्ले करतो! सर्जिकल अट्याकशिवाय बात नाही!!
उधोजीराजे : फू:!! बघितले आम्ही यांचे बॉम्बहल्ले! साधी फुसकुली लवंगीदेखील वाजत नाही त्यांची!!
संजयाजी : (गुप्त खबर दिल्यागत) पुढली लढाई अवघड आहे! जुन्या पद्धतीनं युध्द करणं कठीण जाईल!
उधोजीराजे : (प्रगल्भ सेनानी असल्यामुळे…) हे बघा, युद्ध हे युध्द असतं! त्यात नवी पद्धत किंवा जुनी पद्धत असं काहीही नसतं! तिथं कामी येते ती फक्त आणि फक्त मनगटातली मर्दुमकी आणि छातीतली दिलेरी! कळलं?
संजयाजी : (पुन्हा मुजरा ठोकत) महाराजांचा विजय असो!!
उधोजीराजे : (अभिमानाने) असले छप्पन्न गनीम आम्ही जमालगोटा देऊन परत पाठवले आहेत!
संजयाजी : (कुजबुजत) जरा कान हिकडं करा! दिल्लीश्वर मोगलांचे सरदार नानासाहेबांनी रणांगणात सुरुंग पेरल्यात, अशी पक्की खबर आहे!! ‘मातोश्री’नं मोठा विश्वासघात केला, ‘सिल्वर ओक’नं छोटा विश्वासघात केला, असलं बोलायला लागले आहेत ते!
उधोजीराजे : (बुचकळ्यात पडत) क्काय? सुरुंग?
संजयाजी : (दातात काडी कंटिन्यू…) चुक! भुईसुरुंग! पाय पडला की धुडुम!!
उधोजीराजे : (गोंधळून) सुरुंग पेरुन काय होणार?
संजयाजी : (इशारा देत) पाय जपून टाका, राजे! पाय जपून टाका! एक म्हणता, दुसरंच व्हायचं!
उधोजीराजे : (मटकन खाली बसत) होऊन होऊन काय होणार, फर्जंदा? मेलं कोंबडं सुरुंगाला भीत नसतं! गेले सात महिने सुरुंगावरुनच चालतो आहे!!