ढिंग टांग : येऊ द्या त्यांना आत...!

येऊ द्या त्यांना आत! शेवटी हे जनतेचं राज्य आहे! या राज्यात नियम आहेत, कायदे आहेत! माणुसकी आहे, स्वाभिमान आहे...
Dhing Tang
Dhing TangSakal
Summary

येऊ द्या त्यांना आत! शेवटी हे जनतेचं राज्य आहे! या राज्यात नियम आहेत, कायदे आहेत! माणुसकी आहे, स्वाभिमान आहे...

स्थळ : जमेल तिथे. वेळ : जमेल ती!

कर्मवीर : (चष्मा सावरत) कोण कोण आहेत बाहेर?

पीए : (दरवाजा किंचित उघडून डोकी मोजत) बरीच आहेत, साहेब!

कर्मवीर : (दोन्ही हात पसरत) येऊ द्या त्यांना आत! शेवटी हे जनतेचं राज्य आहे! या राज्यात नियम आहेत, कायदे आहेत! माणुसकी आहे, स्वाभिमान आहे... (विस्मरण होऊन पीएला विचारत) आणखी काय ऱ्हायलं?

पीए : (डायरीत बघून) गदर म्हणजे बंड, गदर म्हणजे उठाऽऽव! ...तेवढंच राहिलं सर! पण ते इथं नको! इथं इनकमिंगचा कार्यक्रम आहे!

कर्मवीर : आमचे दिवसभराचे कार्यक्रम सांगा बरं जरा पटापट!

पीए : (डायरी बघून घडाघडा सांगत) सकाळी मा. उपमुख्यमंत्रीसाहेबांना फोनवरुन रिपोर्टिंग आणि सल्लामसलत!

कर्मवीर : (घाईघाईने) ते सोडून वाचा हो! सकाळचे कार्यक्रम कसले वाचताय? पुढे!!

पीए : (गडबडून) साहेबांच्या... म्हंजे आपल्या... निवासस्थानी जोरदार इनकमिंग कार्यक्रम!

कर्मवीर : (शांतपणे) कोण इनकमिंग करतंय आमच्या पक्षात?

पीए : (डायरीत नाव बघून) माजी उद्योगमंत्री!

कर्मवीर : (दचकून हर्षभराने) ...काय सांगता?

पीए : (चुकीची दुरुस्ती करत) म्हंजे माजी उद्योगमंत्र्यांच्या मेहुण्याच्या मुलीचा मावसभाऊ, सर!

कर्मवीर : (चेहरा निर्विकार ठेवत) फारच जवळचा माणूस आहे!

पीए : (आज्ञाधारकपणाने) हो, सर!

कर्मवीर : (उजव्या हाताची बोटे हलवत) येऊ दे त्यांना आत! आणखी कोण कोण आहे?

पीए : (पटापट यादी वाचून दाखवत) आपल्या माजी साहेबांच्या घरातल्या स्वयंपाक्याचा चुलतभाऊ, आपल्या माजी पक्षातल्या माजी आमदाराच्या भावकीतले दोन-तीन जण, आपल्या माजी पक्षातल्या बारा नगरसेवकांच्या वॉर्डातले कार्यकर्ते...बरीच गर्दी आहे, सर!

कर्मवीर : (चिंताग्रस्त) एवढी माणसं एकगठ्ठा पक्षात घ्यायची?

पीए : हो, सर! दुपारी जेवणाच्या वेळी डबा घेऊन येणारादेखील आपल्या पक्षात इनकमिंग करणार आहे, सर! त्यानंतर दुपारी नाशिकची काही मंडळी इनकमिंग करणार आहेत, शिवाय चहापानानंतर आपल्या माजी पक्षातल्या खासदारांचा साडू समारंभपूर्वक पक्ष प्रवेश करणार आहेत, सर!

कर्मवीर : (वैतागून) आपला माजी पक्ष, आपला माजी पक्ष...हे काय लावलंय? आपलाच खरा पक्ष आहे, हे विसरु नका!

पीए : (अपराधी सुरात) तो पक्षच आता माजी झाला आहे, सर! म्हणून ‘आपला माजी पक्ष’ म्हटलं, सर!

कर्मवीर : (खुश होत) हुशार पीए आहात! तुमचं लौकरच प्रमोशन होणार! कारण हे जनतेचं सरकार आहे! या राज्यात नियम आहेत, कायदे आहेत, आणि (पुन्हा विस्मरण होऊन) आणखी काहीतरी राहिलं...

पीए : (तल्लख बुद्धीनुसार...) गदर म्हणजे उठाऽऽव!...ते सर!!

कर्मवीर : (खुशीने) एकंदरित आपल्या पक्षात सध्या जोरदार इनकमिंग सुरु आहे!

पीए : ...अगदी ‘फाइव्हजी’चा स्पीडसुद्धा फिक्का पडेल, सर!

कर्मवीर : (अभिमानाने) आम्ही जिथे जातो तिथे लोकांचा गराडा पडतो! लोक म्हणतात, ‘‘साहेब, काहीही होवो, आम्ही तुमच्याकडेच येणार!’’ मी त्यांना कसा नाही म्हणणार? म्हणतात ना, थेंबे थेंबे तळे साचे!!

पीए : (अंगभूत विनम्रतेने) असाच इडीकाडीने पक्ष वाढतो, सर!

कर्मवीर : (दाढीवर हात फिरवत...) अस्सं? मग येऊ दे त्यांना आत...! (बाहेर डोकावून बघत) बाहेर माणसं प्रचंड दिसताहेत!!

पीए : (तत्परतेने) त्याचं काय आहे, लोक इथं चहा प्यायला येतात, सर! चहासोबत इनकमिंगही आपोआप होऊन जातं! गेल्या महिन्यात सव्वा दोन कोटी बिल आलं होतं, आठवतंय?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com