ढिंग टांग : जीवाची होतीया काहिली…!

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे.) तिकडे महाराष्ट्रात विनाकारण रणकंदन उडाले आहे, आणि मी नेमका इथे मॉस्कोत येऊन पोचलो आहे.
Dhing Tang
Dhing TangSakal
Summary

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे.) तिकडे महाराष्ट्रात विनाकारण रणकंदन उडाले आहे, आणि मी नेमका इथे मॉस्कोत येऊन पोचलो आहे.

आजची तिथी : श्रीशके १९४४ भाद्रपद कृ. षष्ठी.

आजचा वार : नमोवार…याने की गुरुवार!

आजचा सुविचार : माझी मैना गावावर राहिली…. माझ्या जीवाची होतीया काहिली...!!

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे.) तिकडे महाराष्ट्रात विनाकारण रणकंदन उडाले आहे, आणि मी नेमका इथे मॉस्कोत येऊन पोचलो आहे. या घटकेला महाराष्ट्राला माझी गरज आहे. ठरलेल्या कार्यक्रमानुसार मॉस्कोत येऊन पोचलो. माझ्यासोबत भारताचे सांस्कृतिक विश्वदूत विनयजी सहस्त्रबुद्धे आहेत. विमानातही शेजारी होते. त्यांनी मला रशियाची महती आणि माहिती सांगितली. महाराष्ट्राचे मॅक्सिम गॉर्की म्हणून सुविख्यात असलेल्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण माझ्या हस्ते करण्यात आले. अभिमान वाटला! विनयजींकडून आणखीही माहिती घ्यायचे ठरवलेय. हे आमच्या पक्षातले (एकमेव) तत्त्वचिंतक आहेत. वृत्तीनेही संत-प्रकृतीचेच आहेत. त्यामुळे त्यांना आम्ही विनोबाजी असेच प्रेमाने पुकारतो. असो. आमच्या विनोबाजींनी मला मॉस्कोची सैर घडवली. तिथे अनेक पुतळे आहेत. किंबहुना इथे पुतळे आधी बांधून आसपास चौक किंवा इमारती बांधल्या गेल्या आहेत, असे वाटते. शहरात हिंडताना अचानक आमचे नवे मित्र कर्मवीर लोकनाथसाहेब यांचा मला फोन आला. म्हणाले, ‘कलाकार, इथे बरीच गडबड झाली आहे!’

ते मला ‘कलाकार’ म्हणतात, हे खरे म्हंजे मला आवडत नाही. पण मी काही बोललो नाही. त्यांना विचारले, ‘आता कोण फुटलं?’

‘कपाळ फुटलंय! ते वेदांत - फॉक्सकॉनवाले मोठे कलाकार निघाले…आपल्यासोबत मीटिंग करुन गेले. तुम्ही म्हणालात, म्हणून त्यांना चांगले समोसे, पोहे खाऊ घातले. तीन-तीनदा चहा पाजला, आणि उठून ते सरळ गुजरातला निघून गेले ना!,’ कर्मवीरांनी कुरकूर केली.

‘तुम्ही नाही का आधी सुरतला गेला होता!!,’ मी जोरदार टोमणा मारला. जिव्हारी बसला असणार! दोन मिनिटे शांततेत गेली.

‘…पण हे त्यांचं वागणं योग्य नाही! समोसे इथले खाऊन दुसऱ्याकडे जायचे, याला काय अर्थय?, ’ कर्मवीर वैतागून म्हणाले, ‘…एकदा शब्द दिला की मी स्वत:चंसुद्धा ऐकत नाही, हे लोक शब्द देऊनच्या देऊन दुसऱ्याचं ऐकतात!!’

कर्मवीरांच्या बोलण्यात तथ्य होते. त्या कंपनीवाल्यांचे चुकलेच. ‘चला, चहा घेऊ या,’ म्हणून ऑफर देऊन एखाद्याला हाटेलात न्यायचे, आणि बिल देण्याच्या वेळेला पोबारा करुन दुसऱ्या हाटेलात, तिसऱ्या पार्टीसोबत जायचे, असा हा एकंदर प्रकार झाला. मुख्यमंत्री देवदर्शनात रमल्यामुळे चांगला प्रकल्प हातातून गेला, म्हणून विरोधक आरडाओरडा करत आहेत, आणि त्यांना तोंड देणे कर्मवीरांना कठीण होऊन बसले आहे… अशा स्थितीत मी इथे मॉस्कोत काय करतोय? तेही विनोबाजींच्या सोबत!!

‘मी परत आलो की बघू! काहीतरी करु!!,’ मी मोघम आश्वासन दिले. गेल्या गेल्या दिल्लीला फोन लावून काही ट्रबलशूटिंग करता येते का ते मलाच पहावे लागणार आहे. कारण हे सरकार चांगले चालेल, याची जबाबदारी माझीच आहे.

‘त्या वेदांत-फॉक्सकॉनवाल्यांनीही असंच मोघम आश्वासन दिलंय!,’ कर्मवीर करुण आवाजात म्हणाले.

‘कसलं?,’’ मी.

आवंढा गिळून कर्मवीरांनी फोनवरच उत्तर दिले. ते म्हणाले, ‘…ती कंपनी म्हणते की एक प्रोजेक्ट महाराष्ट्राबाहेर गेला, म्हणून इतके खट्टू होऊ नका!...मी पुन्हा येईन!’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com