ढिंग टांग : यंवसभा, त्यंवसभा वगैरे!

सांप्रतकाळी महाराष्ट्रदेशी सभांचा सुकाळु जाहला असून विविध शहरगावातील खुर्च्यांचे कंत्राटदार सुगीचे दिवस अनुभवू लागले आहेत.
Dhing tang
Dhing tangSakal
Updated on
Summary

सांप्रतकाळी महाराष्ट्रदेशी सभांचा सुकाळु जाहला असून विविध शहरगावातील खुर्च्यांचे कंत्राटदार सुगीचे दिवस अनुभवू लागले आहेत.

सांप्रतकाळी महाराष्ट्रदेशी सभांचा सुकाळु जाहला असून विविध शहरगावातील खुर्च्यांचे कंत्राटदार सुगीचे दिवस अनुभवू लागले आहेत. उत्तरसभा, आक्रोशसभा, संघर्षसभा, वज्रमूठसभा आदी सभांची नावे ऐकली तरी स्फुरण चढते आणि सभेतील खुर्चीसाठी बसण्याचे अवयव उत्सुक होतात. नुकत्याच काही उत्तरसभा झाल्या, वज्रमूठसभाही झाल्या. परंतु, आणखी बऱ्याच सभा होणेचे बाकी आहे.

प्रत्येक सभेचा एक स्वभाव असतो. त्यानुसारच त्याचे नाव ठेवावे लागते. हे येवढे सोपे काम नाही. काही सभांची नावे आणि प्रयोजन आम्ही येथे सुचवून ठेवत आहो. त्याचा येत्या काळात सर्वच पक्षांना उपयोग होईल, अशी अपेक्षा आहे.

उत्तर सभा : हे नाव ऑलरेडी बुक्ड आणि कॉपीराइट असलेले आहे. कोणालाही वापरता येणे कठीण! एखाद्या पक्षाला काही न विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची असतील, त्यांनी ही सभा लावावी! कुणी म्हणेल, ‘प्रश्न’सभाच झाली नाही तर ‘उत्तर’सभा कशी घेणार? पण तशी काही आवश्यकता नसते. प्रश्न काय कोणीही विचारील, उत्तरे द्यायला कुणी बांधील नसते. उत्तर सभेतही उत्तरे द्यायची नसतातच. नुसतीच भाषणे असतात. या सभेला बऱ्यापैकी खर्च येतो, याची संबंधितांनी नोंद घ्यावी. कारण आपली उत्तरे ऐकण्यामध्ये लोकांना प्रचंड इंटरेस्ट आहे, ही हवा निर्माण करणे, हा या सभेचा खरा हेतू असल्याने गर्दी जमा करावी लागते. साधारणपणे पन्नास हजार आणि पुढे अशी पब्लिकची संख्या अपेक्षित असते. व्यासपीठावर सजावट बरी लागते. खर्च तर होणारच!

वज्रमूठ सभा : किमान तीन किंवा त्यापेक्षा अधिक पक्षांनी एकत्र घेतलेल्या सभेला वज्रमूठ सभा असे सर्वसाधारणपणे म्हटले जाते. एकजूट दाखवण्यासाठी ही सभा घ्यावी लागते. याचा अर्थ एकजूट असतेच असे काही नव्हे! सभेतील नेते व्यासपीठावरुन एकमेकांना एकजुटीचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करतात. ‘आपण साऱ्यांनी एकत्र राहिले पाहिजे, अन्यथा, लोकशाहीचे काही खरे नाही’ असे ते एकमेकांना जाहीरपणे बजावून सांगतात. समोर गर्दी असते. पण भाषणे त्यांना उद्देशून नसतातच. एकमेकांमध्येच सारे काही चालू असते. याचा म्हणतात झाकली वज्रमूठ सव्वा लाखाची!! ही सभाही तशी खर्चिक असते. तीन-चार पक्ष एकत्र असल्याने गर्दी आरामात जमते. पण खुर्च्या नेमक्या आणि एका साइजच्या आणाव्या लागतात. अन्यथा कुणाचा तरी पापड मोडू शकतो.

सवाल सभा : ‘उत्तर’सभेच्या उलट या सभेचे प्रयोजन असते. या सभेत सवाल उपस्थित केले जातात. उदाहरणार्थ, अडाणीचे वीस हजार कोटी कुणाचे होते? ‘राफेल’ विमान खरेदीत मलिदा कोणी खाल्ला? नोटबंदीचे काय झाले? इव्हीएममध्ये घोळ कोण करते? चुनाव आयोगाला चुना आयोग का म्हणू नये? असे अनेक सवाल केले जातात. येथे कोणीही उत्तरे देण्याच्या भानगडीत पडायचे नसते. कोणी मागतही नाही!

लाखोली सभा : या सभा छोट्या चणीच्या असतात. त्यासाठी एखादा चौक किंवा गल्ली पुरते. बंगल्याच्या पोर्चमध्ये उभे राहून किंवा गाडीच्या उघड्या टपावरुनही ही सभा संबोधित करता येते. गर्दी जमा करण्यासाठी समाजमाध्यमे पुरतात. फार काही करायची गरज पडत नाही. टीव्ही क्यामेरे बोलावले की झाले! या सभेला खर्च येत नसला तरी ‘कंटेंट’ मात्र कडक असावे लागते. या सभांचा सुळसुळाट येत्या काळात होताना दिसेल.

नमो सभा : ही सभा एकाच माणसाला ऐकण्यासाठी लाखोंच्या संख्येने खुर्च्या आणि माणसे आणून घ्यावी लागते! हल्लीच्या काळात हमखास यशस्वी ठरणारी ही सभा आहे. असो!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com