Dhing Tang
Dhing TangSakal

ढिंग टांग : कुठे कुठे शोधू तुला?

हाय देअर बॅब्स, मे आय कम इन? मी आत येऊ शकतो का?
Summary

हाय देअर बॅब्स, मे आय कम इन? मी आत येऊ शकतो का?

स्थळ : मातोश्री हाइट्स, वांद्रे सोसायटी.

वेळ : निघून गेलेली. काळ : दवडलेला!

चि. विक्रमादित्य : (खोलीचा दरवाजा ढकलत) हाय देअर बॅब्स, मे आय कम इन? मी आत येऊ शकतो का?

उधोजीसाहेब : (मोकळेपणाने) अरे, ये की! त्यात विचारायचं काय? हहह!

विक्रमादित्य : (गोंधळून) मला वाटलं की तुम्ही नको म्हणाल, नेहमीसारखं! मागल्या वेळेला ‘अपॉइण्टमेंट घेऊन या’ असं सुनावलं होतंत!!

उधोजीसाहेब : (आरामात बसत) अरे, छोडो कल की बातें! तेव्हा परिस्थिती वेगळी होती, आताची काहीच्या काहीच वेगळी आहे! आता मी सगळ्यांना भेटणार आहे! चोवीस तास माझे दरवाजे सगळ्यांना उघडे आहेत! हाहाहा!!

विक्रमादित्य : (दुप्पट गोंधळून) अरेच्चा! आर यु ओके बॅब्स!

उधोजीसाहेब : (खुशीत) सगळं ओक्केमध्ये आहे! हो हो हो!!!

विक्रमादित्य : (हाताची घडी घालून सावधपणाने) आता पुढचा काय प्लॅन आहे आपला? आय मीन स्ट्रॅटजी?

उधोजीसाहेब : (उठून कपाटात काहीतरी शोधत) ...सगळ्यांना भेटायचं, जे भेटत नाहीत, त्यांना घरी जाऊन भेटायचं! चहापाणी, गप्पाटप्पा मारायच्या! नेटफ्लिक्सवर कुठला बरा सिनेमा आलाय का इतक्यात? बघून टाकीन म्हणतो!!

विक्रमादित्य : (कसंबसं सावरत) स्ट्रॅटजी...आपल्या पक्षाचं धोरण विचारत होतो मी!

उधोजीसाहेब : (खणातल्या वस्तू बाहेर काढत) तेच सांगत होतो मी! बऱ्याच दिवसात परदेशात नाही गेलो! किंबहुना बांदरा आणि मलबार हिल सोडून कुठेच नाही गेलो! ताडोबाचं जंगल सोड, बोरिवलीच्या उद्यानात नाही गेलो दोन-अडीच वर्षात! सारखं आपलं नुसतं घरात बसून राहायचं, म्हटलं तर कंटाळा येतो ना!

विक्रमादित्य : (चुळबुळत) बॅब्स, मी काय करु आता? मला काहीतरी वेगळा मार्ग शोधावा लागणार!

उधोजीसाहेब : (पलंगाखालची जुनी ट्रंक ओढत) व्वा! तुला तर कित्ती मज्जा करता येईल! मध्यंतरी तू स्वित्झर्लंडलाही जाऊन आला होतास! मलाच जमलं नाही! एकेकाळी तू इंग्रजीत छान छान कविता करायचास, आठवतंय का?

विक्रमादित्य : (चेहरा उजळत) अजूनही करतो...थोड्या थोड्या!

उधोजीसाहेब : (ट्रंकेत काहीतरी शोधत) आता दीर्घकाव्य लिहायला घे!

विक्रमादित्य : (मटकन खुर्चीत बसत) ...असं कसं झालं हो अचानक! सगळं मस्त चाललं होतं! कुणाची तरी...

उधोजीसाहेब : (टेबलाच्या खणात काहीतरी धुंडाळत) ...इथून तर पुढे जाम मस्त होणाराय, बघशील तू!! मला तर इतकं मोकळं मोकळं वाटतंय की विचारु नकोस! शपथ घेताना टेन्शन आलं होतं की आपल्याला जमेल की नाही? कालपासून कसं अगदी रिलॅक्स वाटतंय!!

विक्रमादित्य : मघापासून मी बघतोय, तुम्ही काहीतरी शोधता आहात? इतकं काय शोधताय? मी मदत करु का?

उधोजीसाहेब : (डोळे मिचकावत) नको, ती आमची एकट्याची गंमत आहे!

विक्रमादित्य : (च्याटंच्याट पडत) कमॉन, बॅब्स! सांगा ना!!

उधोजीसाहेब : (कपाटाच्या खालच्या पोकळीतून हात बाहेर काढत) सांपडला! सांपडला!! आता काही चिंता नाही!! हे बघ, मला काय सापडलं!

विक्रमादित्य : (काहीही टोटल न लागल्याने) काय सापडलं बघू?

उधोजीसाहेब : (सद्गदित आवाजात) माझा अनेक वर्षांचा सोबती, जीवाचा सखा! किती वर्षं हरवला होता, आज सांपडला! अरे, माझा हा लाडका क्यामेरा ! आता मी पुन्हा फोटोग्राफीकडे वळणार! पुनश्च हरि ॐ!!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com