ढिंग टांग : भोंगायन : साधक आणि बाधक ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang
ढिंग टांग : भोंगायन : साधक आणि बाधक !

ढिंग टांग : भोंगायन : साधक आणि बाधक !

सांप्रतकाळी भोंग्यांवरुन यथेच्छ भोंगे वाजू लागले आहेत. त्यापैकी कोणाचा व्हाल्युम कमी करायचा, आणि कोणाचा वाढवायचा यावर भोंग्यांवरुन वाद सुरु आहे. भोंग्यांवरील हे भांडण सामोपचाराने सोडवावे यासाठी लौकरच नियमावली जारी करण्यात येत असल्याचे आमचे परममित्र आणि गृहमंत्री रा. दिलिप्राव वळसे-पाटीलजी यांनी स्पष्ट केले आहे. त्यांची या संदर्भात आम्ही प्रदीर्घ मुलाखत घेतली. म्हंजे प्रश्न प्रदीर्घ विचारले, बहुतेक प्रश्नांची त्यांनी एका वाक्यात उत्तरे दिली. मुलाखतीचा अंश :

प्रश्न : हल्ली भोंग्यांचा सुकाळ झाला आहे. कुणी म्हणतं भोंगे उतरवा, कुणी म्हणतं अजिबात उतरवणार नाही. तुमचं भोंग्यांबद्दल मत काय आहे?

उत्तर : भोंग्यांमुळे प्रदूषण होते का, हे पाहावं लागेल!

प्रश्न : भोंगे तीन-चार प्रकारचे असतात. कर्णे, लाऊडस्पीकर, कागदाचे निमुळते भोंगे, शंख, वगैरे. यापैकी कुठल्या भोंग्यांवर कारवाई करण्याचा विचार आहे?

प्रश्न : भोंगे म्हंजे नेमकं काय, हे पाहावं लागेल!

प्रश्न : तुम्ही एका वाक्यात उत्तरे नका देऊ बुवा!

उत्तर : त्यालाच एकवाक्यता म्हणतात!

प्रश्न : (मुलाखतीत जान फुंकण्यासाठी ) लाथ मारीन तिथे पाणी काढीन, अशा म्हणी जन्माला घालणाऱ्या महाराष्ट्राचेच सामाजिक पाणी सध्या गढूळ झाले आहे. ते कां?

उत्तर : गढूळ पाणी गाळून प्यावे व त्यावर तुरटी फिरवावी! तुंबलेल्या पाण्यात अनाफेलिस डासाची मादी अंडी घालते, त्यामुळे-

प्रश्न : (असहायतेने) भोंग्यांच्या संदर्भात काही लोकांवर तुम्ही कारवाई करणार काऽऽऽ…? (इथे शेवटचा ‘काऽऽऽ..’ भोंग्यावरुन आल्यासारखा उमटला…)

उत्तर : कारवाई पोलिस करतात!

प्रश्न : मग चौकशी तरी करणार का?

उत्तर : चौकशी पोलिस करतात!

प्रश्न : भोंग्यांच्या वापराबाबत अहवाल तयार करणार का?

उत्तर : अहवाल कमिटी तयार करते!

प्रश्न : (उद्वेगाने) मग निर्णय कोण घेणार?

उत्तर : (अतिशय विस्तृतपणे बाईट दिल्यागत) …पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय होईल. ते अहवाल देतील, तो घेऊन मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे जाईन. तिथे दीड तास चर्चा होईल. त्या चर्चेनंतर एक कमिटी बसेल. कमिटी अहवाल देईल. कमिटीचा अहवाल घेऊन मी पुन्हा माननीय मुख्यमंत्र्यांकडे जाईन. तिथे दीड तास चर्चा होईल. सर्व शिफारशी आणि सूचनांचा विचार करुन एक नवीन नियमावली तयार केली जाईल. ती नियमावली घेऊन मी पुन्हा माननीय मुख्यमंत्र्यांकडे जाईन. तिथे-

प्रश्न : तिथे दीड तास चर्चा होईल. असंच ना?

उत्तर : हो!

प्रश्न : पण मग भोंग्यांचं काय?

उत्तर : भोंग्यांचं काय?

प्रश्न : (नाद सोडत ) थेट विचारतो! भोंग्यांविरुद्ध भोंगे वाजवणाऱ्यांवर भोंगे वाजवून कारवाई करणार की राजकीय भोंग्यांचा गोंगाट चालूच राहणार? एका वाक्यात उत्तर द्या-

उत्तर : (नेहमीच्या शांतपणे) नवीन नियमावली जारी झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यापूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत त्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल! त्याआधी माननीय मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होईल. तिथे दीडेक तास चर्चा होईल. त्यानंतर बैठकीतील मुद्द्यांचा परामर्श घेऊन सर्वपक्षीयांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल. ते माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातलं जाईल. त्यासाठी दीड तास चर्चा केली जाईल. मग-

प्रश्न : (अशक्तपणे) मग?

उत्तर : (किंचित हसून) तोपर्यंत भोंग्यांचा प्रश्न मागे पडेलच!

Web Title: Editorial Article Dhing Tang British Nandi 20th April 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top